बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 10 of 22

समजुतीप्रमाणे विधुराचे, बायकोच्या निधनानंतर ए वर्षाच्या आत लग्न झाले पाहिजे. नाहीतर दुसऱ्या सर्व वर्षात कुठच्याच धार्मिक कार्यात भाग घेण्याचा त्याला अधिकार नसतो. (पळशीकर दिवाणाचे मुदतीत लग्न न होता तो धार्मिक कार्यात बहिष्कृत राहता, तर त्यात निघोजकरांच्या घरावरची कौले थोडीच उडून जाणार होती ? कोणी ही उठाठेव सांगितली होती ?) २४ तारखेच्या मुहूर्तावर लग्न झाले नाही तर पुढचे वर्ष खोळंबून रहावे लागेल व गीताबीईंनाही तेवढा वेळ वाट पाहणे शक्य नव्हते. तेव्हा या स्थितीत काय करावे याचा माझ्या वडिलांना मोठा पेचच पडला. महाराजांकडून अर्जाचे उत्तर न येण्यास त्यांची आडकाठी होती असे वाटत नव्हते. कारण महाराजांची संमती मिळणे विशेष महत्त्वाचे होते, असेही नव्हते. (जणू काय उपटसुंभ गीताबाई म्हणजे पळशीकर दिवाणांच्या हिताच्या जिम्मेदार. इंदोर सरकार कोणीच नव्हे. जेथे देवीचा दृष्टांत, बापाचा दिवस ठाम ठरला तेथे महाराजांच्या संमतीची किंमत फुटक्या कवडीची ठरल्यास नवल नाही.) कारण महाराजांची संमती म्हणजे दिवाणांच्या दर्जाला शोभेसा हत्ती, घोडे वगैरे लवाजमा मिळणे ही होय. (महाराजांच्या संमतीची व्याख्या पोरीने एवढीच केल्यावर बापाच्या कटाची तयारी व त्यातल्या गुंडोपुंडांच् आत्मविश्वास केवढा दांडगा असेल याची सहज कल्पना होते.) लवाजम्याच्या अभावाने लग्नात मोठीशी उणीव पडेल असेही नव्हते. (खरेच नुसते शुभमंगल झाले की आटोपले !) त्याप्रमाणे खुद्द दिवाण पळशीकर यांच्या मनात लग्न करण्याचे होते. तेव्हा अशा स्थितीत लग्न लावण्यास काहीच हरकत नव्हती. (देवीने दृष्टांत दिला होता, छोटीबाईने सर्टिफीकेट दिले होते व गोविंदरावाने तर चंग बांधला होता.) दिवाणांना लग्नाच्या समारंभात जर फेफऱ्याची लहर आली तर त्यांच्यामुळे सर्व समारोपाचा विरस होईल म्हणून फक्त आवश्यक तेवढे विधीच उरकून घेण्याचे ठरून दिवाण लग्नासाठी माझ्या वडिलांच्या घरी आले.”
आले की फसवून आणले ?
निघोजकर कटाची खरी भिक्षुकी मेख येथेच आहे. त्याचा प्रथम स्पष्ट उलगडा केला पाहिजे. त्यासाठी गोविंदराव निघोजकराने इंदोर कोर्टापुढे दिलेल्या जबानीकडेच आपल्याला वळणे प्राप्त आहे. “गीताबाईने फारच आग्रहाचा गळ घातला म्हणून मी आपली मुलगी देण्यास उद्युक्त झालो.” असे तो पहिल्या प्रथम ठासून बोलला. पण उलट तपासणीत त्याने स्पष्ट कबूल केले की –
“हे लग्न जमविण्यासाठी कृष्णराव रघुनाथ कारकुनामार्फत मी पूर्वीच ५-६ महिने खटपट करीत होतो. नंतर कृष्णराव कारकून माझ्याकडे येऊन मला बराच आग्रह करू लागला. मी त्याला सांगितले की मी महाराज सरकारांकडे अर्ज देतो की जसा हुकूम होईल तसे करीन. लग्नासाठी महाराज सरकारचा खास हुकूम अवश्य पाहिजे. त्याशिवाय काही वऱळणार नाही, हे मी पूर्ण जाणून होतो. विवाहविधीच्या आधी दोनच दिवस लग्नाची तीथ ठरली. (एकदा म्हणतो) दत्त मंदिरात मी दिवाणांना भेटलो व विचारले (पुन्हा म्हणतो) मी स्वतः काही भेटलो नाही किंवा विचारले बिचारले नाही. पण माझी मेव्हणी लेडी डॉक्टर हिने ‘लग्न करता का ?’ म्हणून दिवाणांना विचारले व त्यांनी होकार दिला.... तीथ ठरल्यानंतर सुपरदंट, चीफ मिनिस्टर किंवा महाराज सरकार यापैकी कोणालाच काही कळविले नाही. दिवाणांना माझ्या घरी घेऊन येण्याची जबाबदारी तुमच्यावर लागली असे मी गीताबाईंना बजावले. ती म्हणाली त्याची काळजी करू नका. मी सर्व व्यवस्था लावते.... लग्नाची कुणकुण मी कोणालाच कळू दिली नाही. कारण त्याची सर्व जिम्मेदारी गीताबाईंनी आपल्या शिरावर घेतली... लग्नाच्या वेळेपर्यंत मी दिवाणांना कधीच भेटलो नव्हतो. गीताबाईला मात्र भेटलो होतो. आदल्या दिवशी (२३ मे १९१५) गीताबाई माझ्या घरी आली व म्हणाली की मुहूर्त ठरला. मी उद्या माझ्याबरोबर दिवाणांना येथे घेऊन येईन. तयारीने असा. दुसरे काही भाषण झाले नाही.
प्रश्न – सहा महिने अर्ज करूनही तुम्हाला जर परवानगी मिळाली नव्हती, तर परवानगी कधी तरी मिळेल असं तुम्हाला वाटत होते काय ?
उत्तर – मला तसे वाटले नाही. परवानगी मिळो वा न मिळो मी त्याची पर्वाच केली