बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 9 of 22

लग्न लवकर करून टाका’ अशा अर्थाचे अर्जावर अर्ज खरडण्यास सुरुवात केली. का ? तर म्हणे मी दिवाणांचा नातेवाईक, म्हणून हितचिंतक व म्हणूनच ट्रस्टी म्हणून ! वामनराव पुरंदऱ्यांच्या जोडीला लवकरच
सोमण आणि अच्युतराव
हे दोघे कारकून वीर गोविंदरावाने मिळविले. हा सोमण पक्का लुटपट्या व खटपट्या दिसतो. कोर्टापुढे याची साक्ष होताना त्याने केलेल्या विधानांची टोलवाटोलवी मोठी विचार करण्यासारखी आहे. क्रॉस प्रश्नांमुळे तो कचरत कचरत अखेर सत्यावर बिनचूक कसा घसरत आला ते पहा –
लग्न होण्यापूर्वी दिवाणांनी मुलगी देण्याची निघोजकर खटपट करती होता, हे मला मुळीच माहीत नव्हते.
निगोजकराला रणदिवे सुपरिटेंडंटकडे मी घेऊन गेल होतो.
दोन तीनदा निघोजकर मला म्हणाले मी लग्नाच्या बाबतीत अर्ज केले आहेत व खटपटीही चालू आहे.
मी निघोजकराला चार वेळा भेटलो होतो. एकदा कार्तिकात भेटलो होतो. त्याने मला स्वप्नातला दृष्टांत सांगून या लग्नाच्या खटपटीत मदत द्या म्हणून विनंती केली होती.
एके दिवशी संध्याकाळी ४ वाजता गोविंदराव निघोजकर व त्यांची मेहुण (बायकोची बहीण, छोटीबाई कांबळे) लेडी डॉक्टर गाडीत बसून माझ्याकडे आले आणि सुपरिटेंडकडे लग्नाची शिफारस करायला चला म्हणून मला त्यांनी सांगितले. (दिवाण वेडे नाहीत, चांगले धडधाकट आहेत, लग्नाला योग्य आहेत, वगैरे डॉक्टरी अभिप्रायाच्या सर्टिफीकीटांची निघोजकरांच्या अर्जाला पुस्ती जोडणारी छोटीबाई खरेतर निघोजकरांची मेहुणीच ! सर्टीफीकेट निस्पृह खरे ?) म्हणून मी त्यांच्याबरोबर सुपरिटेंडंकडे गेलो. निघोजकर वाटेतच उतरून गेले की काय ते मला स्मरत नाही. मी आणि लेडी डॉक्टर सुपरिटेंडंकडे गेलो. निघोजकर आमच्या बरोबर सुपरिटेंडंकडे का आले नाहीत ते मला माहीत नाही. याबबात मी त्यांना काही विचारले नाही. यापूर्वी लेडी डॉक्टरांची व माझी काहीच जानपहचान नव्हती. लग्नाबाबत सुपरिटेंडंटना शिफारस वगैरे मी काहीच केली नाही.
मी सुपरिटेंडंटना सांगितले की निघोजकर हे शामराव नारायण नायब दिवाणांचे पुतणे आहेत. मोठे कुलशीलवान आहेत. यांच्या मुलीचे दिवाणसाहेबांशी लग्न व्हायला काही हरकत नाही.
मी हेडक्लार्क असल्यामुळे सुपरिटेंडंटकडे जाणे मला रास्तच वाटले. मी हेडक्लार्क असल्यामुळे निघोजकरचा पक्ष मी पत्करला. दुसरे कारण काही नाही.
ही सात निरनिराळ्या उद्गारांची सोमणांची सप्तपदी निघोजकर कटाच्या अंतर्रचनेच्या बऱ्याच यंत्रावर उजेड पाडीत आहे. या जबानीवर रा. रणदिवे सुपरिटेंडंट यांच्या जबानीने आणखीही एक मुद्दा बाहेर पडतो. रणदिवे म्हणतात –
सोमण आणि लेडी डॉक्टर यांनी आपल्या बरोबर निघोजकराच्या मुलीलाही (सुंदराबाई वय वर्षे १२) मला दाखविण्यासाठी आणली होती. मी सोमणाला सांगितले की मला कोणी कधी अभिप्राय विचारलाच तर मी ‘मुलगी ठीक आहे’ असे सांगेन. पण या बाबतीत महाराज सरकारच्या खास परवानगीशिवाय कोणालाच काही करता येणे शक्य नाही, हे लक्षात ठेवा, असे मी तेव्हाच दोघांना बजावून ठेवले.” (या विधानाशी ‘रणदिव्यांनी अखेर माझीच निवडणूक केली’ ही सुंदराबाईंची मखलाशी पडताळून पहावी, म्हणजे खोटारडेपणाचा ठाव तेव्हाच लागतो.)
हजार हिकमती करून दिवाणाला जावई करण्याचा निघोजकरी कट पुढे कसकसा वठत गेला, हे पाहण्यापूर्वी सुंदराबाईच्या अर्जातली साळसूद कहाणी वाचकांनी काळजीपूर्वक विचारात घ्यावी, म्हणजे संस्थांनी गुप्त कटाची नारोशंकरी बोंबाबोंब खालसात कोणत्या मायावीपणाने करण्यात येत असते, त्याची त्यांना नीट कल्पना येईल. सुंदराबाई मोठ्या सात्विक व भाविकपणाचा आव घालून लिहितात –
“सहा महिनेपर्यंत वाट पाहूनही जेव्हा अर्जाचे काहीच उत्तर आले नाही तेव्हा माझ्या वडिलांचा मार्ग विशेष बिकट दिसू लागला. हिंदू ज्योतिष शास्त्रामध्ये मुहूर्तांचे महत्त्व फार असते. (ते काय विचारावे ? मुहूर्ताशिवाय हिंदूंचा प्राणसुद्धा जाणार नाही. लग्नाचा प्राण तर मुहूर्तच ! त्याचे महत्व कोण नाकबूल करील) लग्नाचे अखेरचे दिवस म्हणजे मे व जून हे महिने आले. इ. स. १९१५ च्या मे महिन्याच्या २४ व्या तारखेस अतिशय उत्तम मुहूर्त होता. (याच तारखेस सुंदराबाईचे शुभमंगल झाले. मग पुढे सर्व अमंगल फाफटपसारा का झाला? अतिशय उत्तम मुहूर्त ना ?) हिंदू धर्मातील