बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 8 of 22

दिवाण साहेबांस मुलगी देण्याचा जो तो लोभामुळे आपला स्वतःचा फायदा व्हावा असा मुळीच नाही. (छे छे ! कोणत्या कांचनभटाला आजपर्यंत स्वार्थ शिवला आहे ?) तर पळशीकर दिवाण यांचे घराणे कदीमपासोन प्रख्यात नामांकित आहे व याच घराण्याकडेस जहागिर इंग्रजांकडील व होळकर शाहीकडील फार वर्षांपासोन चालत आली आहे व याच घराण्याकडेस इंदोरची कायमची दिवाणगिरी व सरदारी आहे. या घराण्याचा मानमरतबा इंदोर व इंग्रजी राज्यात चांगला राहात आहे. हल्ली या घराण्यात प्रस्तुतचे दिवाणसाहेब श्रीमंत कृष्णराव रामराव हे आहेत. यांचे घरी कळकळीची काळजी घेण्यासारखे व त्यांची उन्नती व्हावी अशी इच्छा करणारे ममतेचे कोणी नाही (अवघ्या इंदोरात दिवाणाच्या कळवळ्याचा गिरसप्पा गोविंदरावालाच यावा, हा केवढा निष्काम कर्मयोग बरे ?) तेव्हा त्यास आपली मुलगी देऊन या नामांकित घराण्याशी आपला संबंध व्हावा व दिवाणसाहेब यास उर्जित दशेस आणावे व त्यांचा वंश विस्तार व्हावा हाच मुख्य हेतू आहे. श्रीमंत सरकार साहेबांनी व आपण या प्रसिद्ध नामांकित घराण्याचा अभिमान धरून त्यांचा पुढे वंश चालविण्याकरिता यांचे दुसरे लग्न करण्याबद्दल हुकूम सत्वर दिला पाहिजे. दिवाणसाहेब यास कधी कधी (कधी कधी नेहमी नव्हे, वेडेपणाचा तर आरोपच. म्हणजे डॉक्टर व गोविंदराव शहाणा ?) मिरगी येते असल्याचे समजते. याशिवाय अन्य रोग यांस नाही. मिरगी हा रोग दैवी उपायाने व वैद्य हकीम ( इंग्रजी डॉक्टर, विशेषतः डॉ. शारंगपाणी या कामी बिलकूल निकामी तीवर लग्नाचे पलीस्तरच गोंदविले) वगैरे औषध उत्तम प्रकारे दिले गेले तर जाण्याजोगा आहे.”
मार्च १९१५ च्या या अर्जापर्यंत तरी गीताबाईंचा गळ कोठेच अटकलेला किंवा लटकलेला दिसत नाही. इतकेच नव्हे तर २० मे १९१५ पर्यंत ही कारस्थानी भवानी हा बळेपावेतो इंदोरासही आलेली नव्हती. अर्थात गीताबाईंच्या गळाची सुंदराबाईची सबब म्हणजे जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा पाजी प्रयत्नच नव्हे काय ? स्वतःच्या कन्येचे बलीदान करून दिवाण्या दिवाणाची दिवाणगिरी पटकविण्यासाठी गोविंदराव निघोजकराने जो देवभोळ्या मायावीपणाचा कट रचला, त्यात गीताबाईची धाडशी फोडणी पडण्यापूर्वी
छोटीबाई कांबळे
या डॉक्टरीण बाईची खटपट गोविंदरावांने उपयोगात आली होती. एवढा मोठा अचाट बुद्धीचा व्यूह रचना, तेव्हा त्याची सुलभ प्रसूति करायला कोणीतरी एक पटाईत सुईण पाहिजेच होती. पण या नर्शिणीचा उल्लेख सुंदराबाई मात्र कोठेच देत नाही. आणि त्यांच्या वकीलांनाही बाईची उलट साक्ष घेण्याचे नाकारले, हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. गोविंदरावाने २६ जानेवारी १९१५ रोजी चीफ मिनिस्टरला जो अर्ज पाठविला, त्या सोबत या सुईणीचे एक सर्टिफिकीटवजा अनाहूत पत्रही जोडले होते. वास्तविक या पत्राच्या लुडबुडीची काहीच आवश्यकता नव्हती. पण दरबारात नुसत्या अर्जाची दाद लागत नाहीसे दिसताच, गोविंदराव शिकस्तीच्या प्रयत्नांची एकेक पायरी चढू लागला. छोटीबाईची मध्यस्थी ही पहिली पायरी होय. या आंग्लवैद्यक-सुईणपणीपटू बाईच्या पत्रातला सारांश असा होता की, - “मेजर बोराड्यांच्या बरोबर दिवाणसाहेब गुरुवारी दत्त मंदिरात भेटले. त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे खाडखाड दिली. दत्ताची स्तोत्रे उत्तम पाठ म्हटली. हे चांगले तरुण आहेत. त्यांची प्रकृती चांगली धडधाकट आहे. ते चांगले तरतरीत आहेत. मुळीच वेडे नाहीत. त्यांचे लग्न व्हायला कसलीच हरकत नाही, असा माझा ठाम अभिप्राय आहे. गोविंदराव निघोजकरांचा उद्देश स्तुत्य आहे. दिवाणांचे घराणे कांबळे आणि माझेही तेच. गोविंदरावांच्या मुलीचे लग्न दिवाणाशी लावण्यास आपण परवानगी द्याल तर दिवाणांची प्रकृती बेमालूम सुधारण्याचा जिम्मा मी मजकडे घेईन. इ. इ. ” (दिवाणांची प्रकृती जर धडधाकट व तरतरीत होती, तर ती आणखी बेमालुम सुधारण्याच्या आश्वासनाची गरज काय ?) छोटीबाई कांबळे सुईणीच्या या शिफारसपत्रावरचं गोविंदराव थांबले नाही. त्याने आपल्या कटाचे जाळे खुद्द दिवाणाच्या कचेरीतील ब्राह्मण कारकुनांवरही टाकून त्यांना आपल्या बेतात सामील करून घेतले. सुपरिटेंडंटच्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्या
वामनराव पुरंदरे
नावाच्या दिवाणाच्या एका नातेबाईकाने तिऱ्हाईतपणे परस्पर सुपरिटेंडंट, जनरल मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर यांना ‘दिवाणांचे