बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 22 of 22

कोण ? निमित्तमात्र !
“निमित्तमात्रचि अन्या करूनी मीचहि क्रंतिकर्ता”
असा जो ‘मी’ तो या इंग्रजी राज्य व्यवस्थेत कोणीच कोठे नाही. आमचे परमप्रिय बादशहा, पार्लमेंट, स्टेट सेक्रेटरी, व्हाईसरॉयपासून ते थेट पंचप्राणासाठी पाच रुपड्यांवर जगणाऱ्या पोलीस पाटलापर्यंतचे सर्व अधिकारी केवळ निमित्तमात्र. राज्य शकटाच्या यंत्रातली लहान मोठी चक्रे. निर्गुण निराकार महामायेच्या प्रेरणेनुसार ठराविक गतीचे दास. या पलीकडे काही नाही. एखाद्या बऱ्यावाईट पापपुण्याच्या जबाबदारीचे बोट कोणाकडे निश्चित दाखविताच येत नाही. साराच प्रकार निर्गुण आणि निराकार. प्रत्येक अधिकारी बापडा निमित्तमात्र. कार्य करूनही अकर्ता ! कत्तल करूनही निर्दोषी, अन्याय करूनही न्यायी, हव ते बरळूनही मुका आणि पाहू नये ते पाहूनही आंधळा. बरे, केले तरी पुण्य नाही, वाईट केले तरी पाप नाही. जे जे घडते किंवा बिघडते त्याची घटना किंवा विघटना कोठे कोण का कशी केव्हा जन्माला घालतो याचा पत्ता इंग्रजी राज्य व्यवस्थेत कोणालाच लागणे शक्य नाही. थेट पारमेश्वरी मामला. एवढ्यासाठीच इंग्रगजांचे हिंदुस्थानावरील राज्य म्हणजे “अनादिमध्यांतमंनंतवीर्यमंनंतबाहु” अशा निर्गुण निराकार देवाचे राज्य मानण्याचा भाविक शिरस्ता आहे.
आज घडीला उरल्या सुरल्या, लहान मोठ्या, बऱ्या-वाईट, हिंदू-मुसलमान, देशी संस्थानांची स्थिती यांच्या अगदी उलट आहे. इंग्रजी राज्यसत्ता निर्गुण निराकारी, तर देशी सत्ता सगुण आणि साकारी. एक महासागरासारखी अफाट, तर दुसरी डबक्यासारखी चिमुकली. इंग्रजी सत्तेचा दबदबा बोल घुमटातल्या बोलाप्रमाणे घुमतो. देशी सत्ता म्हणजे माजघरातले कोनाडे. इंग्रजी सत्तेचा देव निर्गुण निराकार असल्यामुळे भक्तजनांच्या हाका आरोळ्यांना अरण्यरुदनाचे ऐश्वर्य प्राप्त होते. देशी सत्तेचा देव सगुण साकारच असल्यामुळे सगळ्या पाप-पुण्याचा शेंदूर बेधडक त्याच्या माथी भक्तांना थापता येतो. इंग्रजी आमदनीत संकटक्षालनार्थ भक्तांच्या अरण्यरुदनाला प्रतिध्वनी पलीकडे देव पावल्याचे जरी कोणी पाहिले नाही, तरी देशी आमदनीत भक्तांचा देव देवळीतच असल्यामुळे आपल्या बऱ्या-वाईट पापपुण्याचा कचरा त्याच्या माथी सावडण्याला भक्त जनांना बरेच सोईस्कर असते. जगात कोठेही निर्दोष अशी राज्यपद्धती नाही. दिव्याखाली अंधार सर्वत्र असायचाच. मानवी समाजात सत्कृत्ये व दुष्कृत्ये अहर्निश चालूच आहेत. निर्गुण निराकार इंग्रजी सत्ता असो, नाहीतर सगुण साकार देशी सत्ता असो, कोणाच्याही बापाला कारस्थानांचे वणवे, गुप्त कटाचे अत्याचार, लोभी लोकांची दुष्कृत्ये टाळता येणे शक्य नाही. फरक एवढाच की खालसातल्या महासागरात या गोष्टी अंगवळणी पडल्याइतक्या ‘रोज मरे त्याला कोण रडे’च्या वाटतात आणि देशी राज्यांतल्या तसल्याच परांचा कावळा होतो. असल्या प्रकरणांचे खापर फोडायला खालसात मुळी देवच ठिकाणावर नसतो आणि देशी राज्यात वाटेल त्या पापाचे माप पदरात घालायला देवळातच देव सापडतो. सुंदराबाईसारख्या प्रकरणांना खालसात काही दुष्काळ नाही. पण या प्रकरणाची जन्मभूमी एक देशी राज्य झाल्यामुळे या सर्वसामान्य टिमकीतून नगाऱ्याची गर्जना कटवाल्यांना काढता आली. पूर्वी कोकाळी अगस्ती नावाच्या भटाने एका आचमनात महासागर प्राशन केल्याचे पुराणे सांगतात. त्याच अगस्तीच्या वंशजांना इंग्रजी सत्तेच्या महासागराचा थेंबही फडशा पाडण्याची आज ताकद नसली, तरी वेळी अवेळी असल्या प्रकरणांची आचमने भुरकून देशी ब्राह्मणेतर संस्थानांची डबकी सुकी ठाक पाडण्याचा प्रयत्न, केवळ वाडवडिलांच्या लौकीकासाठी, त्यांना करणे प्राप्तच आहे. मुसलमानी संस्थानात मात्र भटी मंत्रांचा प्रभाव चालत नाही, म्हणून गुलबर्ग्यासारखी भयंकर प्रकरणे भटी पत्रात तडका फडकी वाळून तेव्हाच माजी ठरतात. आणि अशा प्रकरणांवर साऱ्या भटी पत्रांची रणे पडतात. याचे कारण
काळाचा महिमाच असा !