बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 13 of 22

सबब ते बेकायदा आहे, असा माझ्या वडिलांवर न्यायाधीशांनी आरोप केला. (अरेरे ! किती दृष्टपणाचे कृत्य हे !) परंतु डॉ. शारंगपाणी यांची या लग्नाला काहीच हरकत नव्हती, असे मागे म्हटल्याप्रमाणे दिसूनन येते. (याला पुरावा काय ? तर कटवाल्यांचे विधान.) गीताबाई दिवाणांना घेऊन जात असता आसपासच्या अधिकाऱ्यांची काहीच हरकत नव्हती. (हुजरे कारकून मोतद्दार हेच ना आसपासचे अधिकारी ? ते सारे तर कटात सामील, त्यांची हरकत कशाला असेल ?) परंतु महाराजांकडून त्यांना ठपका मिळू नये व त्यांच्या रागाला ते बळी पडू नयेत म्हणून गीताबाईने दिवाणांना पानसुपारीला घेऊन जाण्याचा बहाणा केला. (बहाणा ? कट नव्हे बहाणार ? काय सोवळा शब्द !) लग्न लागत असता ठाकूर लछमनसिंग, पोलीस अधिकाऱ्यांसह तिथे आले व त्यांनी गीताबाईंना लग्नाबद्दल प्रश्न केला. गीताबाईनी या लग्नाची सर्व जबाबदारी आपल्यावर आहे असे सांगितले. त्याप्रमाणे खुद्द दिवाणांनी ‘निघोजकरांच्या मुलीशी मी स्वतः आपल्या इच्छेने लग्न करीत आहे, तेव्हा तुम्हाला हरकत घेते येणार नाही,’ असे लछमनसिंगांना सांगितले व कार्य पुढे चालविण्याबद्दल उपाध्यायांना विनंती केली. ठाकूर लछमनसिंगांनी या बाबतीत दिवाण बहादुरांचा सल्ला घेतो, असे म्हणून ते पोलीसांना तिकडे घेऊन मोटारीमधून निघून गेले व पुन्हा एका तासाने येऊन त्यांनी लग्न समारंभ शेवटास नेण्यास सांगितले. हिंदू लग्नातील मुख्य विधी ‘सप्तपदी’ झाल्यावर लग्नसमारंभाची सांगता झाली.”
वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली सुंदराबाईची ही साळसूद कहाणी वाचणाऱ्या कोणत्याही वाचकाला या कहाणीमागे असलेल्या गुप्तकटाच्या तंत्रयंत्राची पुसट कल्पना सुद्धा येणे शक्य नाही. कहाणीचा झोक तर असा सफाईत ठेवून दिला आहे की जशा काही सर्व गोष्टी सहाजिक घडल्या. नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे झाल्या, त्यात लप्पछप्प काही नाही, धडधडीत गुप्त कटाला ‘बहाणा’ नाव देणे आणि एखाद्या व्रात्य गंगाभागीरथीने केवळ आपल्या भगव्या वस्त्रपरिधानावर सती म्हणून मिरवणे, या दोन गोष्टी एकात धाटणीच्या अथवा कारवाईच्या होत. असो. आपल्याला या विचारांतच रमता कामा नये. तिकडे लोधीपुऱ्यात गीताबाई भरल्या घंगाळात घटकापात्र टाकून ‘शुभमंगल’ची वाट पाहत बसल्या आहेत. तेव्हा आपण तिकडेच वळावे हे बरे. कारण प्रत्यक्ष लग्नापेक्षा त्यांच्यासाठी रचलेल्या कपटनाटकातल्या अनेक पात्रांच्या घालमेली आपणास पहावयाच्या आहेत.
पळशीकर दिवाणांना काहीतरी सबबीवर २४ मे १९१५ रोजी गोविंदराव निघोजकरांच्या घरी नेऊन सुंदराबाईसारख्या अल्पवयी मुलीकडून त्यांच्या गळ्यात माळ घालून एकदा ‘शुभमंगल जयघंटा’ वाजविली की महाराज सरकारची परवानगी, दिवाणांची परवानगी, सुप्रिटेंडंटची मनधरणी, दरबाराचा कायदा, पार सगळ्या गोष्टी आपोआप बसतील हात चोळीत. गळ्यात माळ पडल्यावर ब्रह्मदेव खाली उतरला तरी तो काय आमच्या सुंदरीचे दिवाणीपण थोडेच हिसकावून घेतो ? मग काय (पान क्रमांक ३३, शेवटची ओळ)
पळशीकर राजा सुंदरी राणी
गोविंदराव दिवाणांचे दिवाण ! एवढ्यासाठी पळशीकरांचे संरक्षक मेजर बोराडे यांच्या हातावर तुरी देऊन दिवाणांना पळवून नेण्याचा (abduct) व्यूह गीता-गोविंद कंपूने कसा आखला तो पहा.
ता. २३ मे १९१५ रोजी सायंकाळी कोठारी (कारकून) पळशीकर दिवाणांना गाडीत घेऊन संध्याकाळची रपेट करून हवेलीवर परत आला. तेथे त्याला सुपरिटेंडंटचा निरोप आला की, एप्रिल महिन्याच्या हिशोबाचे कागदपत्र घेऊन या. ‘मेजर बोराडे रजेवर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाणांना गाडीतून फेरफटका करायला नेण्याचे काम अच्युतरावांकडेच आले होते. अच्युतराव बोराड्यांना भेटला व त्यांना सुपरिटेंडंटला निरोप कळविला. त्यावेळी बोराडे रजेर होते. त्यांनी अच्युतरावाला सांगितले की, “उद्या (२४-५-१९१५) मला दिवाणांच्या हवेलीवर येता येणार नाही. सकाळच्या फेरफटक्यासाठी दिवाणांना गाडीत घेऊन तू जा. वाटेल तर गीताबाईला बरोबर घे. दिवाणांना शहरात फिरायला घेऊन जाण्याची गीताबाईंची इच्छा असेल तर जाऊ दे, पण तू मात्र त्यांच्या बरोबर रहा.” अच्युतराव तेथून सुपरिटेंडंटच्या शंकर केशव कारकुनाकडे गेला व त्याला सांगितले की, “मला उद्या सकाळी तुमच्या निरोपाप्रमाणे हजर राहता येणार नाही, मला दिवाणांच्या बरोबर राहिले पाहिजे.” शंकर केशव म्हणाला, “मला काय करायचे ! सोमण हेडक्लार्कने निरोप सांगितला