बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 12 of 22

पहिल्या प्रथम मी त्याला भेटले. या वेळेपर्यंत मी कोठेही लग्नाची कसलीही खटपट केलेली नव्हती. मी इंदोरास आल्याचे मुलीच्या आईला समजल्यावरून मुलीला घेऊन ती माझ्याकडे आली.
मी इंदोरास जाण्याच्या पूर्वीच दिवाणांना आपली मुलगी देण्याचा निघोजकरांचा विचार होता. दिवाणांना मुलगी द्यायची नाही असे निघोजकर मला बोलला नाही, अगर त्याने नकारही दिला नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी निघोजकर मला भेटला. तेव्हा म्हणाला की (जावयाला) द्यायला माझ्यापाशी काही नाही, मी फक्त मुलगी पिवळी करून देतो. मी ते मान्य केले. मी निघोजकरांकडे २ वाजता गेले व ४-५ वाजता परत आले. दोन्हीकडील (साहित्याची) व्यवस्था करायला मी त्यास सांगितले. ५ वाजता मी निघोजकराच्या घराहून परत निघेपर्यंत लग्नाची कसलीच तयारी झालेली नव्हती. लग्नापूर्वी १ दिवस कृष्ण भटाने मुहूर्त ठरवला. मी (निघोजकरांकडे) जाण्याच्या पूर्वीच तो ठरवला होता आणि तेथे गेल्यावर ‘मुहूर्त उद्याचा ठरला’ असे त्याने मला सांगितले. कृष्णभटाने व हरी शास्त्र्याने मला सांगितले ‘या लग्नासाठी निघोजकर पुष्कळ दिवस खटपट करीत आहेत.’ महाराज सरकारची या लग्नासाठी परवानगी मागितलीच पाहिजे हे जरी मला माहीत होते, तरी ती मागण्याची मी पर्वा केली नाही, कारण सरकार स्वारी त्यावेळी इंदूरात नव्हती. डॉ. शारंगपाणी आणि सुपरिटेंडंट रणदिवे हे लग्नाला आक्षेप घेतील, हे मला माहित असल्यामुळे त्यांनाही ही लग्नाची बातमी मी कळू दिली नाही.”
लग्नाचा कट फुटल्यावर गीताबाई इंदोरहून पळून गेली आणि सुंदराबाई जशी आता सगळ्या भिक्षुकी वृत्तपत्रांतून छापील आक्रंदनाचा तमाशा करीत आहे, तसाच छापील हॅन्डबिल वाटण्याचा गीताबाईंनीही उद्योग चालविला होता. त्यापैकी एका जाहीरपत्रकात या कटबाज बिदुषीने केलेली विधाने वरील जबानीशी वाचकांनी ताडून पहावी –
“अच्युतराव कोठारी (कारकून) आणि (दिवाणांचे सरकारी गार्डीयन) मेजर बोराडे यांच्या मध्यस्थीने मी हे लग्न जुळविले. निघोजकरांची मुलगी मी पसंत केली. पण दिवाणांना अपस्मारचे झटके येतात, कधी शुद्धीवर असतात, कधी नसतात, या सबबीवर निघोजकराने मुलगी देण्याचे साफ नाकारले. अखेर मी निघोजकर याजला गळ घालून व आर्जव करून व फसवून केवळ पुत्र प्रेमाप्रमाणे त्याजकडून त्याचे मुलशी लग्न लाविले.”
या दोन परस्परविरुद्ध जबान्यांवर गीताबाईनी आणखी एक निराळीच कसरत करून ठेवली आहे. लग्नाचा फार्स उरकल्यानंतर २८ जून १९१५ रोजी या बाईने महाराज सरकारला जो एक अर्ज पाठवला त्यात असा खुलासा आहे –
“मी त्यांचे (निघोजकरांचे) घरी एकटी गेले. मुलगी पाहून पसंत केली. दिवाणसाहेबांची इच्छा लग्न करणेची आहे, तर तुम्ही आपली मुलगी त्यास देऊन लग्न करावे असे सांगितले. त्यावर पुष्कळ विचार करून त्यांनी सांगितले की, दिवाणसाहेबांस जर तुम्ही आमचे घरी सुमुहूर्तावर आणिले तर आम्ही आमचे मुलीशी त्यांचे सशास्त्र लग्न करून देऊ. त्याप्रमाणे मीही कबूल केले. त्यांचे व माझे मताने मी मुहूर्त ठऱविला. (मग कृष्णभट मध्येच कसा उपटला ?) मी दिवाणसाहेबास प्रयत्नांनी त्यांचे घरी नले व लग्न केले. माझ्या भाचास म्हणजे दिवाणसाहेबांस जास्त मिरगी येत आहे अशाच केवळ माझ्या एक वेळच्या सांगण्यावरून निघोजकर यांनी आपली मुलगी दिली हे निघोजकर यांचे माझ्यावर फार उपकार आहेत.”
वर्तमानपत्रातून हाकाटी केलेली सुंदराबाईंची सदर साळसूद कहाणी आणि वरील जबान्या यांचा ताळमेळ कसा बसतो आणि वेड्या दिवाणाशी सुंदरीचे लगीन कसेबसे उरकून त्या गडगंज इस्टेटीचा अपहार करण्यासाठी गोविंदरावाने कटाची मांडणी कसकशी केली, हे आतापर्यंत आपण पाहिले. महाराज सरकार यांचे अधिकारी यांना सपशेल धाब्यावर बसवून, अचाट कटाने कसे तरी शुभमंगल उरकिण्याचा निघोजकर कंपूचा बेत येथवर स्पष्ट सिद्ध झाला. आता
लगीन लागले कसे
आणि कटवाल्यांच्या शेवटच्या धडपटी कशा झाल्या, इकडे आपणास वळले पाहिजे. या धडपडीचा पार्श्वभाग सुंदराबाईच्या साळसूद कहाणीनेच छानदार खुलण्यासारखा असल्यामुळे तीच प्रथम येथे उदृत करू. सुंदराबाई म्हणतात –
“यावेळी डॉ. शारंगपाणी हे रजेवर गेले होते व त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन हे कृत्य केले,