बापाची कसरत आणि मुलीची फसगत: Page 11 of 22

नाही. पूर्वी मी अर्ज केला त्याचे कारण दिवाणांच्या घरात त्यांच्यातर्फे वडीलधारे माणूस कोणीच नव्हते. पण अचानक जेव्हा गीताबाई दिवाणांच्या घरी आल्या, तेव्हा परवानगी मिळविण्याची मला आवश्यकताच उरली नाही. (हा कायद्याचा डावपेच पहा. कटवाले कायद्यातही निपूण असावे लागतात !) दिवाणांच्या लग्नाबाबत पुरंदरे प्रयत्न करीत होता की नाही हे मला माहित नाही. त्याची माझी २५ वर्षांची ओळख आहे. वाटेल ते करून हे लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. (पण देवीचा आग्रह, त्यात गीताबाईंची गळ मग काय करतो बिचारा भोळा ब्राह्मण) मी गीताबाईंला सांगितले होते की तुम्ही दिवाणांना माझ्या घरी आणा, माझ्या मुलीशी लग्न करता का म्हणून त्यांना मी विचारीन, त्यांनी हो म्हटले तर मी पुढे विधी चालवीन... यापूर्वी माझी व गीताबाईंची मुळीच ओळख नव्हती. लग्नानंतर सहा महिने गीताबाई माझ्याच घरी राहत होती... मी गीताबाईंना सांगितले की लग्नाच्या परवानगीसाठी मी अर्ज केला आहे. परवानगी मिळताच मी लग्न लावीन. पण गीताबाईंनीच सर्व जबाबदारी पत्करल्यावर महाराज सरकारच्या परवानगीची मला जरूर वाटेनाशी झाली. गीताबाईने मला सांगितले की ‘मी दिवाणांची मावशी आहे आणि त्यांचे लग्न करण्याचा मला पूर्ण अखत्यार आहे. महाराज सरकारच्या परवानगीची काही जरूर नाही.’ गीताबाईंचे हे म्हणणे मी खरे धरून चाललो.
वाचकांना पळशीकर दिवाणांच्या टोलेजंग लग्नमंडपात घेऊन जाण्यापूर्वी या भिक्षुकी कटातील
मुख्य नायिका गीताबाई
या साध्वी कोण ? याचा थोडा परिचय करून दिला पाहिजे. यांचे विस्तृत सचित्र चरित्र आजला उपलब्ध नाही. कदाचित ते सुंदराबाई पुढे मागे लिहून प्रसिद्ध करण्याच्या खटपटीत असतील. आम्हाला जेवढी माहिती आहे ती एवढीच. सन १९१५ च्या मे महिन्यात श्रीमंत होळकर सरकारची स्वारी माथेरानास गेली होती. तारीख २० मे १९१५ रोजी डॉ. शारंगपाणी रजा घेऊन बडोद्याला गेले. जाताना पळशीकर दिवाणांच्या सर्व व्यवस्थेचा चार्ज मेजर भगवंतराव बोराडे यांस समजावून दिला. कारकून अच्युतराव कोठारी यांस योग्य त्या सूचना देऊन ठेवल्या व सुपरिटेंडंट रणदिवे यांनाही कळविले. डॉ. शारंगपाणी यांचा पाय इंदोरबाहेर पडताच त्याच दिवशी संध्याकाळी (२० मे १९१५) एक विधवा बाई दिवाणांची मावशी म्हणून अचानक पाहुण्या येऊन दिवाणांच्या घरी उतरल्या. या मावशीबाई म्हणजेच लग्न कटाग्रणी गीताबाई. दिवाणांच्या येथे कोणी पाहुणा आला किंवा काही विशेष घडले तर अच्युतराव कोठारी कारकुनाने ती गोष्ट सुपरिटेंडंट रणदिवे यांना ताबडतोब कळवावयास पाहिजे होती. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तारीख २० मे रोजी गीताबाई नावाची मावशी पाहुणी आल्याची बात अच्युतरावाने ता. २३ मे पर्यंत रणदिव्यांना मुळीच कळविली नाही. २४ तारखेला तर लग्नाच्या फार्साचा कट साजरा झाला. यावरून गोविंदराव निघोजकराने आपल्या कांचनमटी गुप्त कटात कोणकोण लोक कसकसे फितवून ठेवले होते हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. या कटाच्या प्रकरणी बडोदे येथे कमिशनर पुढे गीताबाईंनी दिलेली साक्ष तिच्या साळसूदपणाची व या कटाच्या धाग्यादोऱ्याची उत्तम साक्ष पटविते. खालील तारीख लक्षात ठेवून गीताबाईंची गीता वाचावी.
ता. २० मे १९१५ गीताबाई इंदोरास येते
ता. २३ मे १९१५ ती आल्याची वर्दी सु. रणदिवे यांना समजते
ता. २४ मे १९१५ लग्नाचा फार्स साजरा होतो
अवघ्या ४ दिवसात सगळा बार उडतो. पण गीताबाई काय म्हणतात ते पहा –
“लग्नापूर्वी आठपंधरा दिवस मी दिवाणसाहेबांच्या घरी गेले. लग्न जुळविण्यासाठी मी काहीही खटपट केली नाही. मी इंदोरास गेल्यावर गोविंदरावने आपली मुलगी मला व दिवाणसाहेबांना आणून दाखविली. ती पसंत झाली व लग्न ठरले. लग्नाच्या वेळेसच गोविंदराव मला प्रथमतः भेटला. लग्नापूर्वी दोन दिवस मी त्याला भेटले. मुलीच्या आईने मुलीला आम्हास दाखविण्यासाठी दिवाणांच्या घरी आणले. बाप आला नव्हता. दिवाणांच्या घरी मी आल्याबद्दल निघोजकराला मी कळविले नव्हते. लग्नापूर्वी ४ दिवस दिवाणांच्या घरी मुलगी दाखविण्यास आणली होती. लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी मी निघोजकरांकडे गेले होते. याच वेळी