बापाची कसरत आणि मुलीची फसगत

किंमत दोन आणे

बापाची कसरत आणि
मुलीची फसगत
(कानपूरचे सुंदराबाई प्रकरण)

इंदोरचे जहागिरदारी दिवाण कृष्णराव पळशीकर यांच्यावर विवाहाची जबरी करून त्यांची इस्टेट लाटण्यासाठी रचलेल्या भिक्षुकी गुप्त कटाचा आश्चर्यकारक मुद्देसुद इतिहास. कादंबरीपेक्षा रसाळ व हृदयरम्य कल्पनेलाही चकविणारे डावपेच. सुंदराबाईच्या वृत्तपत्री करुण कहाणीने विव्हळ होऊन इंदोरचे कोल्हापूर बनवू पाहणाऱ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. “शुभमंगल साssवधान” आरोळ्यात केवढे भयंकर संकट असते हे अखिल हिंदुजनांनी या पुस्तकात पहावे.

लेखक, मुद्रक व प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ,
पुणे शहर
किंमत २ आणे
एप्रिल १९२६

अर्पण पत्रिका
इंदोराधिपती सर तुकोजीराव होळकर यांच्या राज्यसंन्यासाला कारण झालेली परिस्थिती निर्माण करण्याच्या कामी ज्या मढी पत्रकारांनी आपल्या कलमबहाद्दरीची शिकस्त केली; भटी पत्रांची कोल्हेकुई बेगुमान सुरू असता, ज्या क्षत्रिय मराठा पत्रकारांनी, पुढाऱ्यांनी, कौन्सिलरांनी व फंडोबांनी दगडी पुतळ्याचे मौन धारण करण्याइतकी क्षत्रिय तेजाची चमक दाखविली आणि २७ फेब्रुवारी १९२६ रोजी राजसंन्यासाची खबर जाहीर होताच ज्यांना ज्यांना हर्षवायु झाला, त्या सर्व देशी परदेशी संत महंतांना
त्यांच्या स्वाभिमानी देशसेवेबद्दल
हे पुस्तक नाईलाजाने अर्पण केले आहे - लेखक

बापाची कसरत
आणि
मुलीची फसगत
लेखक – केशव सीताराम ठाकरे

शुभमंगल साssवधान. हिंदू समाजात या एकाच उच्चाराने एकाच वेळी अनेक आश्चर्य घडविली आहेत. सुखाच्या स्पर्शाने एक हृदय हासवीत असतानाच, दुःखाच्या चटक्याने त्याने दुसरे अंतःकरण करपविलेले आहे. हिंदू जनांच्या संस्कारजंत्रीत या मंत्राइतके राक्षसी यंत्र दुसरे नाही. लग्नही लागत नाही आणि हे असे होणे शक्य नाही, इकडे कोणाचे सावधानही असत नाही. या ध्वनीने आजपर्यंत कितीक तरी तरुण-तरुणींच्या जीवनातला ध्वनी बदसूर केलेला आहे. या अवैदिक व बेकायदेशीर शंखध्वनीने हजारो जोडप्यांच्या आयुष्याचा अक्षरशः शिमगा केलेला आहे. संसाराच्या येरवड्यात विषम मनोवृत्तीची लक्षावधी स्त्री-पुरुष याने बंदीवान केली आहेत. याने नावडत्या जीवांवर खोट्या प्रेमाची जबरदस्ती लादून त्यांच्या हृद्य भावनेच्या चिंधड्या उडविल्या आहेत. पशू पक्ष्यांनाही वधुवर शोधनाची असलेली निसर्गदत्त सवलत याने माणसांपासून हिरावून नेली आहे. विवाहविधीच्या मांगल्याला याने अमंगलाची कीड लावली आहे. अज्ञान मुलांमुलींवर याने नकळत पतिपत्नित्वाची पोलीसी बळजबरी लादली आहे. धर्माच्या तोंडाला काळे फासून कायद्याला याने सपशेल धाब्यावर बसविले आहे. याने पंडितांच्या पांडित्याचे दिवाळे वाजवून, धर्म मार्तंडांना गाढवाचे व्याही बनविले आहे. याने कुमारिकांचे कौमार्य म्हणजे घोड्यांच्या शर्यतीतला धोक्याचा सौदा बनविला आहे आणि या सौद्याचा धोका बिनबोभाट मान्य करण्याइतका हिंदु समाज अकलेचा खोका करून ठेवला आहे. शुभ मंगल साssवधान्. वा ! केवढी गर्जना, किती तो उंच सूर, काय ती लोकांची परवड. अक्षतांची केवढी ती प्रचंड तोफबाजी. शेवटी, अति समिप सावधान, अति अति समीप सावधान, जय घंटा म्हणून टाळ्यांचा गजर केला, त्यात वाजंत्री ताशे बँडचा कडकडाट भरभक्कम मिसळला, म्हणजे म्हणे लग्न झाले ! कन्यादान नाही, विवाहहोम नाही, आश्वलायन सप्तपदी नाही, लाजाहोम नाही, गृह सप्तपदी नाही, काही नाही आणि साक्षीजनांना पानसुपारी देऊन त्यांची बोळवण करता आणि म्हणता लग्न झाले ?
थूः तुमच्या जिनगानीवर
शास्त्री-पंडितांनो, अरे हे लग्न का चित्र ? तुमचे ठिक आहे म्हणा, नवरा मरो नवरी मरो, भटाला काय ? त्याची दक्षिणेची पोतडी भरली की झाले ! मानवाच्या जिवनातला अत्यंत महत्त्वाचा विवाहसंस्कार सध्या अशा शोचनीय, भ्रष्ट अवस्थेत पार पाडला जात असतो. या संस्काराला कायदेशीर मान्यता येण्यास अवश्य लागणारे कन्यादानादी विधी साक्षीजनांच्या समक्ष मुळीच न होता, ते निघून गेल्यावर कसे तरी, कोठे तरी केव्हा तरी साजरे होतात. तसाच काही कायद्याचा बिकट प्रश्न आला म्हणजे न्याय कोर्टातल्या कायद्याची समजूत करायला
रुपायाला सोळा साक्षीदार
कसेबसे उबवून काढून उभे करावे लागतात. पुष्कळांची अशी समजूत आहे की, भटाने लग्न लावले की ते कायदामान्य झाले. अमूक तमुक विधी मी केला असे त्याने सांगितले, मग दुसरे कोणी साक्षीजन जवळ नसले, फक्त नवरा नवरीने होय म्हणून मान हलविली की न्यायकोर्टाचे समाधान होते. पण ही समजूत