माझी जीवनगाथा: Page 10 of 277

घालायचे प्रवाश्यांनी एखाद्या प्रशस्त झाडाच्या छायेत तळ ठोकायचा. दशम्या, लाडू बाहेर काढायचे. गार वा-यात विश्रांती घ्यायची, तास दीडतास गेल्यावर पुन्हा प्रवास चालू व्हायचा. लांबच्या प्रवासातल्या अडीअडचणींची यादी वडीलधा-या मंडळींना अगदी तोंडपाठ असायची. पुरुषांची यादी निराळी, बायकांची निराळी, त्याप्रमाणे आधी आठआठ दिवस तयारीची धामधूम चालायची. लोणच्याची बरणीसुद्धा विसरता कामा नये. प्रवासात अमुक बरोबर आणले नाही, असे होता कामा नये. ही सगळ्यांची मुख्य विवंचना. पालीचा नि आमचा संबंध कायमचा तुटलेला होता, तरी एक भक्तिमार्गी नि देवीउपासक साधुपुरूष म्हणून आजोबांची कीर्ती कुलाबा. ठाणे जिल्ह्यात चांगलीच फैलावलेली होती. कोण्डीदेवीच्या दर्शनासाठी आम्ही येत आहोत, अशी पत्रे पालीच्या काही मंडळींना गेली. भाड्याच्या बैलांचा खटारा, आमचा खासगत छकडा, अशा थाटाने पेणमार्गे पाली यात्रेला आम्ही निघालो. आजा, आजी, आई, वडील (मातुल) आजोबा वामनराव पत्की आणि दोन भावंडे (मी आणि यशवंत) वाटेत कलेखिंडीत पी. डब्ल्यू. डी. च्या नोकरीत असलेले विनायकराव काका येऊन आम्हाला मिळाले. दोनतीन ठिकाणी तासा दीडतासाचे मुक्काम करीत, दुस-या दिवशी दिवेलागणीला आम्ही पाली गावात प्रवेश केला. आधी पाठविलेल्या इसमाने तेथील धर्मशाळा झाडून सारवून स्वच्छ ठेवली होती, तेथे आमचा तळ पडला. नजीकच्या विहिरीवर हात-पाय तोंड धुऊन बायका स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. आप्पा धोडपकरांचे चिरंजीव भिकोबा आले ही बातमी गावात हा हा म्हणता गेली. खेडेगावातल्या बातम्या टेलिप्रिंटरपेक्षा अधिक झपाट्याने फैलावल्या जातात. तेथला प्रत्येक असामी रॉयटरचा बाप. झाले. भराभर गावकरी नि जुन्या ओळकीपाळखीचे गृहस्थ तात्यांच्या भेटीला येऊ लागले त्यांत दोघे वृद्ध पालकर-ठाकरेही आले. तात्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. पालकर-ठाकरेः आपण आलात आणि उतरला धर्मशाळेत, हे काय? लोक आम्हाला काय म्हणतील? वाडा आपला आहे तेथे चला. तात्याः त्या वाड्यावर मला कसा काय हक्क सांगता येईल? आणि तेथे मी उतरणार तरी कसा? आप्पांची तलाख विसरून कसे चालेल मला? सांगा! इतर गावक-यांनीही खूप आग्रह केला. वाड्याचे मालक म्हणून नव्हे, पण आमचे पाहुणे म्हणून येथे यायला काय हरकत आहे ? पुष्कळच आग्रह झाल्यावर, रात्री नवाच्या सुमाराला ठाकरे वाड्यात गाशा नेण्याची तात्यांची आज्ञा झाली. आमची छावणी तेथे गेली. सकाळ उजाडताच, तात्यांनी माझा हात धरून सबंध वाडा दाखविला. पडझड झालेल्या कित्येक ठिकाणी पूर्वी काय होते, त्याच्या आठवणी सांगितल्या. पुष्कळ जुन्या घटनांची त्या दोन वृद्ध ठाक-यांबरोबर तात्यांनी चर्चा केली. पालीचा गणपती म्हणजे अष्ट विनायकांपैकी एक. महाराष्ट्राचे एक जागृत दैवत. तो मूळ ठाकरे घराण्याचा. पण पुढे भाऊबंदकीच्या भानगडीत हातचा गेला आणि सार्वजनिक झाला. त्यांबाबतही विचारपूस केल्यावर. गरम होऊन तात्या पालकरांना म्हणाले, ‘ सगळं घालवलंत, एवढा कुलदैवत गणपतीसुद्धा राखता आला नाही तुम्हाला? आमच्याप्रमाणे त्यालाही घालवला घराबाहेर? सारांश, कृष्णाजी माधवांच्या इस्टेट-त्यागाची कहाणी केवळ दंतकथा नसून शुद्ध सत्य असल्याचा पुरावा मला प्रत्यक्षच पहायला-ऐकायला मिळाला. खुर्चीचे वकील आप्पा ठाण्याला आल्यावर तेथे इंग्रेजी अदालतीत वकिली चालू केली. त्यावेळी कंपनी सरकारचे ठाण्याला नुकतेच स्थिरस्थावर होत होते. निस्पृहपणाने फक्त सत्यासाठी झगडायचे आणि गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा, लुच्चा, लफंग्या कारस्थान्यांना ओसरीवरही येऊ द्यावयाचे नाही, खोटेनाटे करायचे नाही आणि त्याचा पाठपुरावाही करायचा नाही, असे आप्पांच्या वकिलीचे धोरण असल्यामुळे, पोटापुरते देई मागणे लई नाही, हेच त्यांच्या प्राप्तीचे मान राहिले. पण याच त्यांच्या तत्वनिष्ठेने सरकारात मात्र त्यांचा मानमरातब वाढला. कंपनी सरकारने त्यांना ‘खुर्चीचे वकील’ केले. म्हणजे त्यावेळी फक्त न्यायाधीश एकटाच खुर्चीवर बसायचा, बाकीच्यांना खाली जाजमावर बसावे लागे. आता कृष्णाजी माधवांना न्यायाधिशाच्या बरोबरीने खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला. तो त्या काळी फार मोठा मानला जात असे. धोडपकरांचे पनवेलकर बनलो सरकार-दरबारी आणि समाजात आप्पांचा महिमा केवढाही मोठा असला, तरी धनसंचयाकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेच नाही. वकिलीची खिशात आलेली प्राप्ती घरापर्यंत सुखरूप पोहोचेलच, अशी शाश्वती