माझी जीवनगाथा: Page 9 of 277

हेच आपले नाव आमरण चालविले. आप्पा त्यावेळी घराण्यात वडील होते. वाडवडिलार्जित शेतीवाडी, वाडा, गुरेढोरे, इस्टेट चांगली धनत्तर होती. आप्पांना धाकटे दोन तीन भाऊ असावे असे समजते. आप्पांची मुले जगत नव्हती, तोवर सारे भाऊ समाधानाने एकत्र राहत होते. पण आप्पांची मुले जगू लागली असे पहाताच त्या भावांच्या अंगात वाटपाची वेताळपंचविशी फुरफुरली. इस्टेटीची वाटपे करा. असा भावांचा ससेमिरा चालू झाला. अशा वेळी कज्जेदलाल ग्रामकंटकही, एकदा ही बाजू तर एकदा ती बाजू, असा मृदंगी थापडेपणा करू लागले. आप्पांचे म्हणणे असे की, ‘वडिलोपार्जित इस्टेटीचे तुकडे पाडू नका आणि जगाला विभक्तपणा दाखवू नका. वाटेल तर प्रत्येकाने एकेक कारभार मुखत्यारीने करावा. मी नुसता सल्ला मसलत देत जाईन देखरेख करीन. पण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एका वाड्याच्या छपराखाली एका पंक्तीला जेवावे. ‘ आप्पा घराण्यात वडील असल्यामुळे, ते आपल्यावर सामायिक रहाण्याची निष्कारण सक्ती करीत आहेत. आशा गैरसमजाने आणि ग्रामकंटकाच्या चिथावणीने घरात कुरबूर नि धुसफूस चालू झाली. त्यात बायकांनी अगदी जळफळता भाग घेतला. तंटा कसा मिटवला? एका सणाचा योग साधून आप्पांनी सगळ्या नातेवाइकांना, गावकरी शिष्ठांना, मित्रांना आणि कुळांना मेजवानी देण्याचा बेत केला. भोजनोत्तर पानसुपारीसाठी सर्व बसले असता, आप्पांनी एक हृदयस्पर्शी भाषण करून पुढारी पंचापुढे एक दस्तऐवज ठेवला व त्यावर साक्षीच्या सह्या करण्याची विनंती केली. त्या दस्तात, ‘मी आज रोजी राजीखुषीने वाडवडिलार्जित इस्टेटीच्या माझ्या भागाचा राजीनामा लिहून दिला आहे. मी आणि माझ्या स्वतःच्या वंशीच्या कोणीही या पालीच्या इस्टेटीत हक्क सांगायला येणार नाही. येईल तो माझ्या रेताचा नव्हे’ अशी त्यावर तलाख घातली. हो लोकविलक्षण प्रकार पहाताच. भावांचा मत्सराग्नी खाडकन विझला आणि ग्रामस्थ लोकांची तोंडे उतरली. कारण आप्पा हेही एक वजनदार ग्रामस्थ पुढारीच होते. समजूत करण्याइतके आप्पांनी काही ठेवलेच नव्हते. सर्वांबरोबर आपणही पानसुपारी घेऊन आप्पा तसेच बाहेरच्याबाहेर बायको आणि तीन मुले घेऊन सड्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले, ते बैलगाडीने ठाणे येथे येऊन दाखल झाले. माझ्या पणजोबांचा आत्मसंतोषाचा हा त्याग सामान्य म्हणता येईल काय? आत्मसामर्थ्याच्या कडेलोट विश्वासाशिवाय असले धाडस कोण आडमाडू करील? वाडवडिलांच्या कमाईवर चैनीत दिवस काढण्यापेक्षा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर मिळेल ती ओली कोरडी भाकर खाण्यातच खरा पुरूषार्थ आहे. हाच त्यागवृत्तीचा संतोष माझ्या प्रवृत्तीत अतिशय प्रबळ आहे. त्यापायी माझा संसार मी वेळोवेळी धुतलेला आहे आणि स्वाभिमानासाठी मोठमोठ्या सरकारी नि सावकारी नोक-यांवरही लाथा मारलेल्या आहेत. सत्याचा पडताळा पटला एक दिवस आजोबांना मी विचारले, ‘तात्या, आपल्या जातीत प्रत्येक घराण्यात काही ना काही शेत-जमीनजुमला आहेच आहे. पण आपल्याला या चंद्रमौळी घराशिवाय कुठे एक इंचभरसुद्धा जमिनीचा तुकडा नाही. हे प्रकरण काय आहे ?’ त्यावेळी त्यांनी आप्पांच्या इस्टेट त्यागाची कथा मला सांगितली. पण तीतले सत्य प्रत्यक्ष पडताळून पहाण्याचा सुयोग लवकरच आला. सन १८९४-९५ च्या सुमारास, कुलस्वामिनी श्री जगदंबा कोण्डीदेवीच्या दर्शनाला जाण्याचा तात्यांनी बेत केला. लहानपणी पाली सोडली. त्यावर सारी हयात लोटली. दोन करते सवरते मुलगे नि दोन नातूही झाले. पण देवीचे दर्शन होण्याचा योगच आला नाही. तो आता म्हातारपणीतरी साधावा, उमलत्या पिढीला तो इतिहास कळावा, एवढ्यासाठीच हा बेत झाला. त्याकाळचा प्रवास तो. बैलगाड्यांचे युग चालू होते. बैलांचा छकडा म्हणजे मोठे जलदगतीचे वाहन, घोड्याचे टांगे फक्त शहरात नि क्वचित तालुक्याच्या ठिकाणी. पण लांबच्या प्रवासाला ते कुचकामी. आत्ताच्या सारखे घेतली बॅग का चालले मोटार-आगगाडीतून, या घटानांची स्वप्नेही नव्हती कोणाला पडलेली, मुंबईच्या बाजूला आगगाडी असल्याचे आम्ही नुसते ऐकायचे. पहाण्याचा योग येणार कुठून ? मुंबईला घोडयांच्या ट्रामगाड्या अवघ्या एक आण्यात माणसाला एका टोकाहून दुस-या टोकाला नेतात, हा फार मोठा नवलाचा मामला असे. बैलांचा खटारा खटर्र खटर्र करीत चालला आहे. दर दहा मैलांवर विसावा. गाडीवान बैलांना पाणी वैरण