माझी जीवनगाथा: Page 8 of 277

म्हणून आमच्या देव्हा-यात वीर आणि ब्राह्मण असे दोन चांदीचे टाक अजून पुजले जातात. सत्याची दंतकथा आणि दंतकथेतील सत्य, यापैकी कोणते कितपत खरे, या प्रश्नाचा मी फारसा विचार केलेला नाही. मात्र, प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात ब्राह्मण पुजला जातो. या गोष्टीचा पाराचा कावळा पुष्कळजण करतील. त्याला येथेच उत्तर देऊन ठेवलेले बरे. मी ब्राह्मणाचा द्वेष्टा, अशी कण्डी मत्सरी भटाबामणांनी पिकवलेली आहे. नकली, खोट्या नि दांभिक भटाबामणांचा मी खास द्वेष्टा आहे. तसा द्वेष सगळ्यांनी करावा असे मला वाटते. पण जो खरा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचे सर्व विहित कर्तव्य पाळतो, तो मला केव्हाही वंद्य नि पूजनीय असणार. मात्र ही पूजा गुलामगिरी वळणाची केव्हाही नाही, नाही व नसेल. माझे शेकडो स्नेही ब्राह्मण आहेत. जातीपातीचा विचार न करता, मान्याचा मान न राखण्याइतका पागलपणा माझ्या पदराला चिकटविणारेच बिनचूक पागल नि पाजी म्हणून निवडून काढावे. जन्मतःच कोणी कोणाला द्वेष्टा असत नाही अनुभवाने बरावाईट कोण हे ठरत असते आणि ठरवावे लागते. माझा बालपणाचा शाळकरी जीवनाचा काळ ब्राह्मणी वर्चस्वाच्या उतरंडीचा होता. पेशवाईने चित्पावनांना आलेल्या हंगामी माहात्माची त्यांची धुंदी ओसरत होती. पण नाहीशी झाली नव्हती. एकूणेक ब्राह्मणेतरांपेक्षा आम्ही जन्माने, कर्माने आणि संस्कृती का काय म्हणतात तिने फार वरच्या थरातले आहोत., ही त्यांची आढ्यता कायम होती. बामण मंडळी बामणेतरांना अंशतः अस्पृश्यांच्या धाटणीने वागवायची. एखाद्या ब्राह्मण शाळूसोबत्याच्या घरी प्यायला पाणी मागितले तर तो तपेलीतून आणून, ओटीच्या खाली मला उभा करून, ओंजळीत ओतायचा. शिवाय, ‘तपेली बाहेरच असू दे रे, मी घेईन मग पाणी टाकून’, असे त्याची आई घरातून बजवायची. प्रथम प्रथम मला या निराळेपणाच्या वागणुकीचा बोधच होत नसे. तो जसजसा होत गेला तसतसा पावलोपावली मी त्या बामण शाळूसोबत्यांच्या सोवळेपणाची टिंगल करू लागलो. वयाच्या आठव्या वर्षी तर एक चीड येण्यासारखा मुकाबला घडला. वडलांच्या कचेरीतल्या समव्यवसायी मंडळींनी एका ब्राह्मण बेलिफाच्या घरी धुंदूरमासाच्या प्रातर्भोजनाचा बेत केला. वडलांनी मला बरोबर नेले. तेथे बामण सारे एका बाजूला पंगतीने आणि आम्हा बापलेकांची दोन पाने दूर एका बाजूला. शिवाय भालेराव नावाचा एक कारकून होता. त्याचे पान एकटेच आणखी दूर. कां? तर म्हणे तो आकरामाशा जातीचा. वाढणा-या बाया आम्हाला प्रत्येक पदार्थ किंचित दुरून आणि उंचावरून पानात टाकीत. जेवणे आटोपल्यावर माझे बाबा जेव्हा आमचे खरकटे काढायला लागले तेव्हा मी चिडलो. त्यांनी करायचा तो खुलासा केला. ‘हे बामण जर आपल्याशी असे निराळेपणाने वागतात, तर आपण तरी त्यांच्यासी कशाला आपलेपणाने वागावे? आपल्या घरी त्यांना तसेच वागवावे.’ मी कडकडालो. एकोणिसाव्या शतकातल्या शेवटच्या दशकातला तो काळ. बामण काय किंवा बामणेतर काय, दोघेही जातिभेदाच्या जुन्या कल्पनांचे गुलाम. इतरांना आम्ही निराळेपणाने कां वागतो, हे बामणांना समजत नव्हते आणि आपण त्या निराळेपणाला अपंगाप्रमाणे कां जुमानतो, हे बामणेतरांना उमजत नव्हते. दोघेही रुढीचे बंदे गुलाम. बामणी वरचढपणाचे माझे अनुभव पुष्कळ आहेत. ते यापुढे अनेक टप्प्यांत विखुरलेले आढळतील. पण एक गोष्ट खरी. अगदी बालपणापासून तो आजवर माझ्या अवतीभवती बामणेतर किंवा स्वजातीच्या स्नेही-सोबत्यांपेत्रा बामण मित्रांचा भरणा फार, जातगोतवाले किंवा नातेवाइकापेक्षा माझ्याशी विशेष दिल्दारीने वागणारे ब्राह्मण स्नेहीच माझ्या परिसरात नेहमी अधिक असतात. याचे मर्म एकच, कालमानाप्रमाणे आचार-विचारात झटपट बदल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामणांच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा खास विशेष आहे. संयुक्त कुटुंबाचे तीनतेरा माझे पणजोबा कृष्णाजी माधव ऊर्फ आप्पासाहेब हे पूर्वी पाली येथेच असत. त्यांची मुले जगत नसत. पाठोपाठ सात-आठ मुले मेली पुढे पालीजवळ डोंगरकपाटी कोण्डीदेवी आहे. तिची उपासना केल्यामुळे पुढील चार मुले जगली. तीन मुलगे आणि एक मुलगी. पैकी वडील मुलगा रामचंद्र (माझे आजोबा) हा ‘देवीच्या भिकेचा प्रसाद’ म्हणू त्याचे टोपण नाव भिकोबा असे ठेवले. आजोबांनी भिकोबा धोडपकर