माझी जीवनगाथा: Page 7 of 277

ठेवावी, किंवा माझ्या चरित्राचे पारायण करावे अशा भावनेची झुळूकसुद्धा माझ्या मनाला शिवलेली नाही. मी एक नाटक्या आहे. जन्मप्राप्त नि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम वठविण्याची धडपड करणार मी एक धडपडया आहे. मी कोण आहे. माझी भूमिका काय आहे नि माझ्याकडून इतरांनी कशाची अपेक्षा करावी. इत्यादी प्रश्न जीवमान काळात सोडविणे कठीण आहे. माझी जीवनयात्रा मी कशी केली, एवढेच फार तर मला सांगता येईल आणि तेवढेच काम मी करणार आहे. वडिलार्जित परिस्थिती आधीच आमचे ठाकरे घराणे फार गरिबीचे. गेल्या तीन-चार पिढ्यांत आम्हांला कोठे इंचभर जमीनजुमला असल्याचे माहीत नाही. नाही म्हणायला, माझा जन्म झाला त्या पनवेल गावात आमचे झोपडेवजा घर होते. माझा विद्याभ्यास गरिबीतच झाला आणि गरिबीच्या कडेलोट कठोरतेचे यच्चयावत सगळे आघात अनुभवण्याचा मान मला लाभलेला आहे. खडतर काटेरी जीवनाचा मार्ग निश्चित ध्येयाने नि धिटाईने चोखाळीत असता, व्यवहाराचे जे टक्केटोणपे मी खाल्ले, भिन्न-भिन्न स्वभावांच्या हजारो लोकांचा जो बरावाईट अनुभव आला, समाजसेवा करीत असता ठिकठिकाणच्या निरनिराळ्या समाजांची जी पाहणी झाली. मुर्दाड संकटांचा फडशा पाडताना देहमनाची सालटी कसकशी सोलवटली आणि या सर्वांचा माझ्या चरित्राच्या कमावणीवर कसकसा परिणाम झाला, याची माहिती दिली असता, नवीन जीवनाच्या नवीन पिढीला, तो जुन्या पिढीच्या जीवनाचा सर्वांगीण इतिहास उपदेशक किंवा उत्तेजक झाला नाही, तरी निदान मनोरंजक होईल, अशी मला उमेद आहे. पार्श्वभाग चित्राला जसा पार्श्वभाग, तसा व्यक्तीच्या चरित्राला पूर्वजांचा इतिहास. तो कळल्याशिवाय त्या व्यक्तीच्या ब-यावाईट चरित्राचा नि चारित्र्याचा नीट अंदाज लागत नाही. मी कोण. याचा अंदाज मी कोणाचा कोण, यावरून छान ठरविला जाईल. मी बडा बापका बेटा नव्हे हे माझे मोठे सुदैव समजतो. मी ‘बडबड्या’ असेन, नव्हे आहेच आहे; पण ‘बडा’ मात्र खास नाही. माझ्या आजूबाजूच्या मित्रांना नि नातेवाइकांना माझ्यात जे अनेक दोष दिसतात, स्वभावात जी तापट बेफिकिरी नि बेसंसारी चमक आढळते आणि व्यवहाराचे किंवा पैशाअडक्याचे प्रश्न हाताळताना जी त्यागी ऊर्फ उधळी प्रवृत्ती पदोपदी सर्वांना त्रासदायक होते, ती कमाई माझी स्वतःची आहे, का तिचे मूळ माझ्या कोणत्या तरी पूर्वजाच्या कोणत्या तरी स्वभाव-वैचित्र्यापर्यंत जाऊन भिडते. याचाही अंदाज या प्रकरणात घेणे अगत्याचे आहे. आधुनिक शास्त्राज्ञांनी आनुवंशिक संस्कारांची अव्यवहार्यता कितीही सिद्ध केलेली असली, तरी माझा अनुभव तिचे महत्त्व नि आवश्यकताच सिद्ध करीत आहे. जसे बीज तसे फळ, हा सिद्धांत सनातनच समजला पाहिजे. धोडपचा किल्लेदार ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे. तेथे आजही काही ठाकरे घराणी असावीत. पण आमचा व या पालकर ठाक-यांचा आडनावापलीकडे फारसा संबंध कधीच आलेला नाही. धोडपकर असेही आमचे जादा आडनाव आहे. पण आमचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेलो नाही. नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे. तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते. इंग्रजानी या किल्ल्याला वेढा दिला. बरेच दिवस या धोडपकराने त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावर दाणा-वैरण होती तोवर त्याने तग धरला. अखेर निकराच्या चकमकीत तो ठार झाला. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र, सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत. या एका हकिकतीशिवाय धोडप गावाशी आमचा काहीच संबध असल्याचे दिसत नाही. ठाकरे कुळात ब्राह्मण-पूजन दुसरी एक दंतकथा अशी आहे. किल्ला पडण्याची वेळ आली. सगळे सैन्य फडशा झाले. तेव्हा किल्लेदारापुढे एक ब्राह्मण अवचित येऊन उभा राहिला. ‘केलास इतका पराक्रम शिकस्तीचा झाला. किल्ला पडणार. इंग्रजांची सद्दी जोरावर.’ असे म्हणून त्या ब्राह्मणाने धोडपकर किल्लेदाराला आपल्या पाठुंगळी डोळे मिटून बसायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने केले. थोड्या वेळाने ‘उघड डोळे’ म्हणताच पहातो तो, आपल्या पाली येथील वाड्याच्या चौकात! घरातल्या मंडळीना हाक मारुन किल्लेदार मागे वळून पहातो तो ब्राह्मण कोठेच नाही! या गोष्टीचे स्मारक