माझी जीवनगाथा: Page 6 of 277

आहे. ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध करून सोमैया प्रकाशनाने मराठी आत्मचरित्र वाङ्मयात ठसठशीत व मोलाची भर घातली आहे. धनंजय कीर दि. ३ सप्टेंबर १९७३ ७७, भागेश्वर भुवन, दिलीप गुप्ते रोड, माहीम, मुंबई-१६ प्रकरण १ ले सिंहावलोकन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला मी आदमी ( जन्म दिनांक १७ सप्टेंबर १८८५. पनवेल, जिल्हा- कुलाबा) वयाच्या ७ व्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचण्याचा छंद लागला. त्या काळी ‘मुंबई वैभव’ हे मराठी ‘रोजचे पत्र’ पनवेलीस माझ्या (मातुल) आजोळी यायचे. त्याशिवाय ‘इंद्रप्रकाश’, हरिभाऊ आपट्यांची ‘करमणूक ‘, ‘केरळकोकीळ’ मासिक, ठाण्याचा ‘जगत्समाचार’ अशी काही पत्रे कोणा ना कोणाकडे येत असत. ती पत्रे आई मागवून आणायची नि माझ्याकडून वाचवून घ्यायची. म्हणजे १८९२ पासूचन स्मरणशक्तीला धार लागत गेली. आजही मी त्या काळापासूनचा महाराष्ट्रातील घडामोंडीचा इतिहास स्मरणाने छान सांगू शकतो. त्याकाळची वृत्तपत्रे काय किंवा मराठी लहानमोठी पुस्तके काय, आत्तासारखी एकमेकांचा शिमगा कणारी नसत. इतरांनी शिकवून शहाणे व्हावे, एवढ्यासाठी त्याकाळचे लेखक व वक्ते लिहीत-बोलत असत. आत्ताचे, आम्ही किती जाडजूड शहाणे आहोत, याचे प्रदर्शन करण्याकरिता लिहीत-बोलत असतो. गेल्या ८० वर्षात म-हाठी समाजाची विलक्षण स्थित्यंतरे झाली. लोकांचे आचार विचार खाणेपिणे, रहाणी इतकी आरपार बदलली आहे की, गतकाळातली काही समाजचित्रे आज जर त्यांच्यापुढे धरली तर आमचे बापदादे खरोखरच का इतके मूढ, गलथान, अडाणी आणि हव्या त्या परिस्थितीत अल्पसंतोष मानणारे होते? असा अचंबा व्यक्त केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. पायांत जोडा अगर चप्पल घालून रस्त्याने चालण्याची त्याकाळच्या महिलांची काय छाती होती! उन्हाळ्याचा भर कडाका का असेना, बायकांनी अनवाणीच चालले पाहिजे, असा सभ्यांचा दण्डक असे. असे न करणारी बाई बेधडक हुंडगी किंवा वेश्या सदरात पडत असे. माझ्या आयुष्यात मी पाहिलेली, अनुभवलेली समाजचित्रे कितीतरी आहेत. प्रसंगोपात स्नेहीमंडळींच्या बैठकीत वरचेवर त्यांची शब्दचित्रे मला काढावी लागतात. दिवंगत अनेक थोरथोर लोकांच्या परिचयाचा लाभ मला झालेला आहे. गोव्यापासून नागपुरापर्यंत बहुतेक महाराष्ट्रात मी फिरलो आहे. लहानमोठ्या खालच्या मधल्या नि वरच्या थरांतील अनेक समाजांचे प्रत्यक्ष निरिक्षण केले आहे. त्यांच्या गुणदोषांनी माझ्या आठवणींच्या बटवा भरगच्च भरलेला आहे. भेटीला येणा-या अनेक स्नेहीसोबत्यापुढे वरचेवर वानगीदाखल कधीमधी त्यातल्या चिजा मला बाहेर काढाव्या लागतात. त्यांनी ऐकल्या म्हणजे ‘ठाकरे, तुम्ही लिहा बुवा एकदा आपले आत्मचरित्र आणि त्यात येऊ द्या हे सारे मनोरंजक तपशील’ अस आग्रह आज गेली निदान पंचवीस-तीस वर्षे सारखा होत असतो. माझ्यासारख्या सामान्यातला सामान्य माणसाचे आत्मचरित्र आणखी ते काय असणार? चरित्र लिहिण्यासारखे असे काय आहे माझ्यात? या भ्रांतीमुळे आजवर मी त्या आग्रहाकडे पाठच फिरवून बसलो होतो. तथापि, तोही माझा पिछा सोडीना, म्हणून मध्यंतरी जुन्या आठवणी आठवणीतील तशा लिहून काढल्या आणि दैनिक ‘लोकमान्या’त छापण्याचा उपद्व्याप केला. अलिकडे चिरंजीवांच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकातही देण्याचा उपक्रम केला. सगळीकडून त्या अखंड चालू ठेवण्याबद्दल आग्रहाची शेकडो पत्रे येत असतात. कारण काय? तर त्यात जुन्या जमान्यातला समाजचित्राचा ‘इतिहास’ असतो. तो टिकवला पाहिजे. गेल्या पाऊणशे वर्षांत महाराष्ट्राने सामाजिक, राजकारणी, धार्मिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रात कोणकोणत्या स्थित्यंतरांतून प्रवास केला, याचा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला, अनुभवलेला इतिहास, चरित्र म्हणा, आयुष्यातले टप्पे म्हणा, अथवा सिंहावलोकन म्हणा, त्यात लिहिला जावा, ह्या स्नेही मंडळींच्या सूचनेवरून हा उद्योग मी करीत आहे. आयुष्याच्या अखेरच्या सीमारेषेवर मी उभा असल्याचा भास मला होत आहे. दृष्टीसकट इतर शरीरावयांची नि माझी झपाट्याने फारकत झाली आहे. नित्य होत आहे. लिहिणारा उजवा हात तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच राम-राम ठोकून लंजूर झाला. इंग्रजी, म-हाठी टाइपरायटर हे दोघे आजवर इमानी दोस्तांप्रमाणे माझ्या हाकेला हाक देत असतात. त्यांच्या सहाय्याने ही आठवणींच्या फुलांची ओंजळ मराठी जनताजनार्दनाच्या चरणांवर यथाशक्ती यथाकाळ वाहण्याचा उपक्रम करीत आहे. श्रीगणेशा मी म्हणजे कोणी मोठा वीरपुरूष आहे, जगाने माझी आठवण