माझी जीवनगाथा: Page 5 of 277

केव्हाही वंद्य नि पूजनीय असणार’ आपल्या देव्हा-यात ‘वीर’ आणि ‘ब्राह्मण’ असे चांदीचे दोन टाक पुजले जातात असे सांगणारे व जातीपातीचा विचार न करता मान्यवरांचा मान राखणारे प्रबोधनकार ब्राह्मणांविषयी प्रशंसोद्गार काढताना म्हणतातः ‘कालमानाप्रमाणे आचारविचारात झटपट बदल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामणांच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा खास विशेष आहे. बालपणापासून तो आजवर माझ्या अवतीभोवती ब्राह्मणेतर किंवा स्वजातीच्या स्नेहीसोबत्यांपेक्षा ब्राह्मण मित्रांचाच भरणा फार.’ आहे की नाही गंमत? प्रबोधनकारांच्या ह्या आत्मवृत्तात त्यांच्या सहानुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता नि संयम यांचे चांगले दर्शन घडते. ते स्वतः कलावंत, रसिक, रगेल नि रंगेल असल्यामुळे ‘जीवनगाथे’च्या लेखनात आकर्षक रंग व रेषा भरल्या आहेत. त्यात कृत्रिमता नाही; ते बुद्धया खुलवून, सजवून लिहिलेले नाही. शैली नि कलाकृती एकरूप झालेली आहेत. भाषा सरळ व सुबोध, कसदार नि ओघवती आहे. तीवर प्रबोधनकारांनी नाटक कंपन्याबरोबर नि व्याख्यानासाठी केलेल्या भ्रमंतीत ज्या बोली ऐकल्या त्यांचाही परिणाम झालेला आहे असे वाटते. ती उपहास करते तरी विखारी नाही. ती आहे ढंगदार नि वीरश्रीयुक्त. ही ‘जीवनगाथा’ कृतज्ञतेने ओसंडलेली आहे. प्रबोधनकारांनी लोकहितवादींना परात्पर गुरू मानून त्यांना मानाचा पहिला मुजरा केला आहे. त्यांनी गुरूपदाचा मान ‘केरळ कोकीळ’कार कृष्णाजी नारायण आठल्ये यांना दिला आहे. आपल्या बौद्धिक प्रगतीचे श्रेय त्यांनी देवासमधील व्हिक्टोरिया हायस्कूलच्या गंगाधर नारायण शास्त्रीबुवा यांना दिले आहे आणि मार्गदर्शकाचा मान वडिलांचे मामा राजाराम गडकरी वकील यांना दिला आहे. गंगाधर शास्त्रीबुवा यांनी गोल्डस्थिमचे ‘डेझर्टेड व्हिलेज’ इतक्या तन्मयतेने शिकवले की पुढे प्रबोधनकारांच्या ‘शेतक-यांचे स्वराज’ ह्या ग्रंथातून ती शिकवण प्रगट झाली. ह्या ‘जीवनगाथे’तील राजर्षी शाहू छत्रपती यांचे नेतृत्त्व नि व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊराव पाटलांचे शैक्षणिक कार्य, कृष्णराव गोरे यांच्या गाण्याचा तबकड्या, ब्राह्मणेतर चळवळीतील ‘कोंबडझुंजी’, इतिहासकार राजवाड्यांच्या जात्याभिमानी लेखनाचा ब्राह्मणेतर चळवळीवर झालेला परिणाम, डॉ. दत्तात्रय कृष्ण कोल्हटकर यांच्या मुलीचा अमेरिकेतील पुर्नजन्म, नाथमाधवांचा आजारीपणा व लेखन, गांधीजींच्या दोन गाठी-भेटी, फैजपूर काँग्रेस यांची वर्णने मुळातच वाचावी. ‘सत्यनारायणाची पूजा’, ‘व्यंकटेशस्तोत्र’, ‘शनिमहात्म’ आणि महाराष्ट्रीय संताचे कार्य ह्यांविषयी प्रबोधनकारांची मते अवश्य वाचावी. हिंदु समाजाची पुनर्घटना व हिंदु संघटना ह्या विषयांवरील त्यांचे विचार मननीय आहे. प्रबोधनकारांनी लहानमोठे सुमारे पंचवीस ग्रंथ लिहिले. त्यांतील ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘खरा ब्राह्मण’ (नाटक), ‘ग्रामण्यांचा इतिहास’, ‘रंगो बापूजी’, ‘वक्तृत्व शास्त्र’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे त्यांचे ग्रंथ विख्यात आहेत. इतर ग्रंथ व पुस्तिका त्या त्या काळी गाजल्या तथापि साहित्यातील झब्बुशाहीने ह्या व्यासंगी विद्वानाला नि निःस्पृह साहित्यिकाला साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान काही दिला नाही. प्रबोधनकारांच्या आत्मकथेत दोन व्यसनांचा उल्लेख आहे. एक ‘बुकबाजी’चे व दुसरे तपकिरीचे, व्हिस्की वा ब्रँडी यांच्या आहारी न जाता, ती सोडावी असे वाटते तेव्हा जुने वस्त्र टाकावे तशी ते ती टाकतात. ‘जीवनगाथे’त प्रबोधनकारांच्या स्वतःच्या संसारातील घरगुती स्वरुपाच्या व गृहप्रपंचाच्या गोष्टींवर भर दिलेला नाही. त्याचे कारणही तसेच संयुक्तिक दिसते. त्यांच्या पत्नीनेच सारा गृहप्रपंच चालविला. जे काही मिळवायचे ते पत्नीच्या स्वाधीन करावयाचे की काम संपले! नातलग, पै पाहुणे यांची सरबराई गृहणीने यथाशक्ती करावयाची. प्रबोधनकार आपले सदानकदा लेखनात, मैत्रांशी नि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात गर्क, शिवाय एकत्र कुटुंब पद्धतीतील वडीलधा-या मंडळीसमोर पाळावयाची त्या काळची काही बंधने व लेखनातील संयम हेही एक कारण असू शकेल. प्रबोधनकार वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा फारसे त्रासिक, उदास व असमाधानी दिसत नाहीत. ते शरपंजरी पडले असले तरी त्यांचे मनोबळ नि उत्साह वाखाणण्यासारखा आहे. विजिगीषू पुत्रांचे वाढते वैभव, नेतृत्व व कर्तृत्व आणि सुनेची शालीनता, सुशीलता व सत्कार्यप्रवृत्ती पाहून त्यांना धन्यता वाटत असते. निवृत्तीचे सुख समाधानाने उपभोगीत असले, तरी ते मूलतः प्रवृत्तीमार्गी असल्यामुळे कार्यकर्त्यांना नि तरुणांना सतत प्रेरक व पोषक असाच उपदेश करीत असतात. प्रचंड मेणबत्तीसारखे शेवटच्या अंकापर्यंत त्यांनी आपले सर्वस्व वेचून ती तन्मयतेने वठविली