माझी जीवनगाथा: Page 4 of 277

‘म्हणून प्लेग झाला, ही अज्ञानी समजूत ठाण मांडून बसली होती. हुंडा पद्धतीने अनर्थ उडविला होता. जरठ-बाला विवाहांनी कहर उडविला होता. ह्यांची माहिती व कहाणी या जीवनगाथेत भरपूर आहे. आपण वकील व्हावे अशी महत्त्वाकांक्षा प्रबोधनकारांनी आपल्या विद्यार्थीदशेत बाळगली होती. वडिल बेलीफ. घरची परिस्थिती नेहमीच ओढघस्त, ‘हातावर मिळवायचे नि तळहातावर खायचे’ शिक्षणासाठी अनेक ठिकाणी त्यांना अतिशय धडपड करावी लागली. अत्यंत दुःख नि अडचणी सोसाव्या लागल्या. परंतु, ह्या हुशार, हुरहुन्नरी नि बुद्धीवान विद्यार्थ्याचा दुदैवाने सर्वत्र पाठलाग केला. प्रवेश फीत दीड रुपया कमी पडल्यामुळे त्यांची मॅट्रिकची परिक्षा हुकली! तथापि प्रबोधनकारांची ज्ञानलालसा एवढी प्रचंड, तळमळ एवढी प्रबळ की, त्यांनी स्वाध्यायाच्या बळावर जे ज्ञान संपादन केले ते विश्वविद्यालयाची डॉक्टरेट संपादन केलेल्या दोनचार पंडितांच्या व्यासंगाएवढे आफाट आहे. आपल्या मासिक वेतनाचा मोठा भाग त्यांनी ग्रंथ विकत घेण्याच्या छंदात उधळला. शेक्सपियरच्या वाङमयातील सुभाषितांचा नि वचनांचा कोश करणारा हा व्यासंगी! दुर्मिळ ग्रंथ नकलून घेण्यासाठी सफरी करणारा हा ज्ञानी पुरुष! याचा पगाराचा दिवस उजाडला की आईआजीच्या पोटात चिंतेचा गोळा उठे, हा ज्ञान वेडा ‘दादा’ आज पुस्तकाच्या ‘पिठ्यात’ जाऊन बेहोष होईल आणि त्या धुंदीत पगाराची पुरी वाट लावील, म्हणून आजी दादाच्या मित्राच्या घरी जाऊन त्याला सायंकाळी गुंगवून, मथवून घरी आणावयास विनवणी करी. वाडिया महाविद्यालयात व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे इतिहास संशोधन मंडळ यांची ग्रंथसंग्राहालये त्यांच्या अखंड ज्ञानयज्ञाची ग्वाही देत राहतील. प्रबोधनकारांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे त्यांना वकील होता आले नाही. त्यामुळे त्यांचे काही बिघडले असे नाही. ‘माणसाने एकमार्गी नसावे’ अंगात हरहुन्नर पाहिजे. पडेल ते काम अंगमेहतीने पार पाडण्याची शहामत पाहिजे’ असा त्यांचा बाणा. तो बाणा अक्षरशः पाळून त्यांना आपल्या लेखणीने वक्तृत्त्वाने व कर्तृत्त्वाने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. त्यांना वकील होता आले नाही तरी त्यांनी आपल्या निष्काम बुद्धीने, तळमळीने, हिरीरीने अस्पृश्य गणलेल्या बंधुजनांची, गरिबांची, दलितांची, कामगारांची नि शेतक-यांची सेवा केली हे त्यांना भूषणास्पद आहे. दैविक, चित्तथरारक चमत्कार करणारे प्रबोधनकारांचे आजोबा हे एक उपासक, साधुशील, भक्तीमार्गी पुरुष होते. आजन्म लोकसेवेचे व्रत घेतलेली त्यांची आजी एक बेडर नि बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. महाराची सावली पडली तर मनुष्य महार होतो, मग ब्राम्हणाची सावली पडली तर तो ब्राम्हण होतो काय, अशी ती खोचक प्रश्न विचारी. काही वर्षांपूर्वी प्रचंड खळबळ उडविणा-या ‘खरा ब्राह्मण’ ह्या प्रबोधनकारांच्या नाटकाचे बीज त्यांच्या आजीच्या ह्या शिकवणीत आहे. त्यांचे वडील बेलीफ होते पण प्रवृत्तीने ते होते कलाकार. दरसाल गणपती-उत्सवात ते कळसूत्री देखावे करून लोकांची करमणूक करीत. आजी, आजोबा व वडील यांच्यापासून प्रबोधनकारांना लोकसेवा, धर्मसेवा व कलोपासना यांचे धडे मिळाले, परंतु, त्यांच्या जीवनावर मातेच्या तेजस्वी स्वाभिमानाचा व कडक शिस्तीचा मोठा प्रभाव पडलेला आहे. ते मातृभक्त आहेत. आपल्या मातेविषयी ते मुक्तकंठाने म्हणतात, ‘सामाजिक, बौद्धिक नि सार्वजनिक पातळीवर आम्ही आहोत. त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीच्या कर्तबगार व कडक शिस्तीला आहे. खोट्याची, दंभाची, अहंतेची नि कोरड्या फुशारकीची तिला मनस्वी चीड यायची’ प्रबोधनकार म्हणतात, ‘आपला पिंड राजकारणी नसून समाजकारणी आहे.’ आणि समाजकारणात जो ढवळाढवळ करतो त्याचा वर्णवर्चस्ववादी ब्राह्मण तिरस्कार करतात. जे जे सामाजिक समतेच्या महान मूल्याच्या प्रस्थापनेसाठी झगडले ते ते लोकाग्रणी ब्राह्मणांच्या रोषास पात्र ठरले. लोकहितवादी, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, बाळशास्त्री जांभेकर नि सावरकरही त्यामुळे अप्रिय झाले, मग प्रबोधनकारांचा त्यांनी द्वेष केला या नवल ते काय? त्याविषयी प्रबोधनकार आपल्या ‘जीवनगाथे’त म्हणतातः ‘मी ब्राह्मणांचा द्वेष्टा, अशी कण्डी मत्सरी भटांनी पिकविलेली आहे. नकली, खोट्या नि दांभिक भटाबामणांचा मी खास द्वेष्टा आहे. तसा द्वेष सगळ्यांनी करावा असे मला वाटते. पण जो खरा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचे सर्व विहित कर्तव्य पाळतो, तो मला