माझी जीवनगाथा: Page 277 of 277

पक्ष समितीला सोडून गेलेला त्यावर मी ‘समितीचा कॅन्सर गेला’ या मथळ्याच्या लेख लिहिला. हा पिचक्या पाठकण्याचा पक्ष जेथे जेथे जाईल तेथे तेथे पक्षस्वार्थासाठी हवा तो विश्वासघात करायला चुकणार नाही. म्हणूनच समाजवादी पक्ष यांना वरचेवर ठोकरून दूर ठेवतो. शिवसेनेला हा अनुभव चांगलाच आलेला आहे. बाकीचे कम्युनिस्टांसारखे पक्ष अगदी धुतल्या तांदळाचे अवतार होते अशातला प्रश्न नाही. खाली मुंडी मुलूख धुंडी हा त्यांचा खाक्या. समिती पूर्व काळी सगळ्या पक्षांचे पंख फिसकटलेले होते, समितीत घुसल्यामुळे त्यांना ते सावरता आले, हाच त्यांच्या पटाईत बुरखेबाजीचा मोक्ष त्यांना लाभला. सगळी वाताहत लागली तरी समितीचा कट्टर अभिमानी एकटा आचार्य अत्रे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा महोत्सव साजरा करण्यासाठी, अत्रे आणि मी दोघांनी स्थापन केलेल्या ‘जनता आघाडी’ने सगळा खर्च केला. इतर कोणीही दमडा दिला नाही, तरीही हा उत्सव समितीच्या नावानेच करण्याची होड अत्र्यांनी घेतली. मलाही माझा विरोध बाजूला ठेवून त्याला मान्यता द्यावी लागली. त्या उत्सवानंतर मी सगळ्याच चळवळीचा संन्यास घेतला. जीवनगाथेचा शेवटला अध्याय गेली ९-१० वर्षे टप्प्याटप्प्यांनी मी ‘जीवनगाथा’ खरडीत आहे. खरे म्हटले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनात वैयक्तिक असे लिहिण्यासारखे काय आहे? पण माझा जन्मच मुळी १९ व्या शतकाच्या अखेरच्या दीड दशकातला. वयाच्या ७व्या वर्षापासून मी मराठी वर्तमानपत्रे वाचू लागलो. आजूबाजूच्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीत अगणित नि कल्पनातीत होत गेलेले सारे बदल मी अनुभवले. एकेक घटना अशा घडत गेल्या का त्या माझ्या आठवणीत जाम चिकटून बसल्या. त्या आठवणींतही समाजाच्या स्थित्यंतराचा इतिहास असतो. तो कोणीतरी सांगितला नाही, लिहिला नाही, का सफाचाट पसरून जायचा. १८९६ सालचा दुर्गादेवी दुष्काळ, त्याच काळातली महाराष्ट्रावर आलेली टोळधाड, या घटना आताच्या पिढीला कुणीतरी सांगितल्या पाहिजेत. माथेरान स्टीम ट्रामवे आदमजी पीरभाईंनी स्थापन केली, हे कित्येकांना माहीत आहे? ‘जीवनगाथे’त माझ्या चरित्रातील महत्त्वाच्या घटना सांगत असतानाच, आजूबाजूच्या शेकडो घटनांचा मी सविस्तर विचार केलेला आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा जीवनगाथेचे लेखन माझ्या आजारपणामुळे बंद पडे, तेव्हा तेव्हा आग्रहाची अनेक पत्रे मला लोक पाठवायचे. आता मात्र वृद्धपणाच्या (८८) दडपणाखाली सा-या शक्ती मंदावल्या. अपंगावस्था आली. म्हणून वाचक भगिनी-बांधवांनी माझा अखेरचा मुजरा घ्या. ।। जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण असो ।।