माझी जीवनगाथा: Page 11 of 277

नसे. समोर जो गरजवंत येईल त्याची तात्काळ भर व्हायची. दोन मुलांना मराठी सहावीची परीक्षा पास होण्यापुरते शिक्षण मिळाले. त्या काळच्या ग्राज्वेटगिरीची हद्द हीच. ती गाठली का सरकारी कारकुनीची कामधेनू आलीच चालत पायाशी. दोघांना कोर्टात नोक-या लागल्या. त्यांची लग्ने झाली. मुलीलाही डहाणूकर जयवंताचे चांगले श्रीमंत स्थळ मिळाले. वंशवेलाचा विस्तार होत असतानाच, आप्पा दिवंगत झाले. ठाण्याहून माझ्या आजोबांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहानसे घर बांधले आणि तेथेच पेन्शन घेऊन मरेतोवर राहिले. धोडपकरांचे आम्ही पनवेलकर बनलो. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले, तरी माझ्या वडिलांनी मात्र, शाळेत नावे घालतानाच ‘ठाकरे’ आडनावाची पुनर्घटना केली. ती आजवर चाललेली आहे. आजोबांची जीवनयात्रा मी देवीचा प्रसाद आहे, ही आजोबांना जाणीव झाल्यापासूनच त्यांचा कल देवीच्या उपासनेकडे वळला. ते भक्तिमार्गी होते. रोज पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी ते खंजेरीवरची भजने मोठ्याने गात असत. तात्यांचे पहाटेचे भजन म्हणजे पनवेलच्या प्रभूआळीतील लोकांचा नियमित अलार्म- गजर समजला जात असे. त्यांनी बावीस वेळा पंढरीच्या आषाढी-कार्तिकी वा-या केल्या होत्या. पण जीवनाचा जोरदार ओढा देवीच्या उपासनेकडे. आमच्याकडे वार्षिक नवरात्राचा महोत्सवर होत असे. तो अक्षरशः सार्वजनिक नवरात्र महोत्सवच व्हायचा आणि अष्टमीला देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी कुलाबा, ठाणे जिल्हे आणि मुंबईहून शेकडो स्त्री-पुरुष मुलांची मोठी यात्राच जमायची. ती हकिकत मी एका स्वतंत्र टप्प्यात देणार आहे. आयुष्यभर तात्यांनी दोनच ग्रंथ भक्तीने वाचले. श्रीधरकृत रामविजय आणि हरिविजय. त्यांचे पोथीवाचन अत्यंत तल्लीनतेने होत असे. वाचताना मधूनमधून त्यांचे हुंदके ऐकू आले की खुशाल कयास बांधावा की रामविजयाचे पारायण चालू आहे. आणि हसण्याचा खोकाट चाललेला असाला, की हरिविजय चालला आहे, असे ओळखावे. चातुर्मासात आमच्या अंगणातील विरुपाक्षाच्या देवळात, किंवा गावतल्या कोणत्याही देवळात भागवताचा सप्ताह असला तर तात्या अगत्याने जात असत. तन्मयतेने आणि अर्थबोध होईल असे वाचन कसे करावे हे मी तात्यांच्या पुराण-वाचन शैलीवरून शिकलो. माझा जन्म होण्यापूर्वीच त्यांनी पेन्शन घेतलेले होते. तेव्हापासून त्यांचे दोन वेळा भजन, पुराण-वाचन, सकाळ-संध्याकाळ पनवेलच्या सर्व देवळांचे दर्शन, गोठ्यातल्या कपिला गाईची सेवा, बागबगीच्यातल्या झाडांना पाणी घालणे आणि पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार करून त्या विकणे, हाच आयुष्यक्रम मी पाहिला. काही वर्षे त्यांनी एक स्टेशनरी दुकानही चालवलेले होते. त्यांचा सारा व्यवहार ओटीवरच्या एका स्वतंत्र खोलीत चालायचा. आंघोळ जेवणासाठी हाक मारली म्हणजेच फक्त घरात यायचे, देवपूजा करायचे आणि हातावर पाणी पडले की, स्वारी खोलीत जाऊन बसायची. कुटुंबाच्या किंवा गावकीच्या कोणत्याही भागगडीत ते पडत नसत. नेहमी आपल्याच कामाच्या तंद्रीत मग्न, कोणी काही बोलायला, सांगायला आला तरी त्याने बोलबोल बोलावे आणि ह्यांनी मात्र नुसते हू हू करावे, असा मामला. तात्यांना स्वच्छतेचे अतोनात वेड. घरात किंवा घराबाहेर केरकचरा साठलेला त्यांना आवडायचा नाही. सकाळचे शौचमुखमार्जन उरकताच म्हातारा हातात खराटा घेऊन झाडीत सुटायचा. त्यावेळी हद्दीचा प्रश्न हद्दपार असायचा. आमच्या घराबाहेरचा कचरा साफ होत असताना त्यांचा खराटा आसपासच्या घराभवतीही चक्कर मारायचा. ते भक्तिमार्गी होते. तरी त्या विषयावर चर्चाचिकित्सा कधी कोणाशी करीत नसत. आपण बरे नि आपले व्यवधान बरे. माझे वडील आणि चुलते विनायकराव अशा दोन पुत्रांचा जन्म होताच त्यांनी आपल्या पत्नीच्या पायांवर एक दिवस अचानक डोके ठेवले आणि ‘वंशाला दोन फळे आली, आता आपण आमच्या मातोश्री’, असे सांगितले. तेव्हापासून तो मरेतोवर तात्या आणि बय (माझी आजी) यांचे संबंध शेजा-यासारखे राहिले. ‘एखादी मुलगी तरी व्हायची होती’ असे बयला वाटायचे. वडील नि चुलतेसुद्धा ‘ भाऊबिजेसाठी आम्हाला बहीण नाही ’ म्हणून कुरबुरायचे. तेवढ्यासाठी आजीने गावातले वकील रावजी महादेव गुप्ते यांची एक मुलगी घरी आणून वाढवली., तीच आमची आत्या. एकदा पनवेल गावात एक संत (दत्तोपासक) आले होते. पुष्कळांनी त्यांचा