भिक्षुकशाहीचे बंड: Page 10 of 94

नाहीं. निसर्ग प्रवृत्ति कधींही एका ठिकाणीं थांबून स्तब्ध उभी राहत नाहीं, किंवा कोणी तिची मान कापली तरी पुढें टांकलेले पाऊल ती मागें घेत नाहीं. तिची धांव नेहमीं पुढें पुढेंच असते. मानवी प्रवृत्ति नाठाल बैलाप्रमाणें मध्येंच कोठें तरी उठवणीस आल्याचें ढोंग करुन पुढें पाऊल टांकण्याचें साफ नाकारते; यामुळें या दोन प्रवृत्तींच्या प्रगमनशीलतेंत नेहमींच शेंकडो मैलांचे अंतर पडलेलें दीसून येतें. निसर्गप्रवृत्तीच्या ज्या ठिकाणीं किंवा ज्या प्रदेशांत आज संचार चालूं असतो, तें ठिकाण किंवा तो प्रदेश उद्यां तिच्या सभोंवार दृष्टीस पडत नाहीं. मानवी प्रवृत्ति निसर्गाच्या हिसकाहिसकीमुळें आणि कालोघाच्या सोंसाट्यामुळें विसाव्या शतकाच्या मैदानांत येऊन जरी दाखल झाली, तरी तिला १४ व्या किंवा १५ व्या शतकांतल्या कल्पनाच्या शिळ्यापाक्या झुणका भाकरीचा मोह सुटत नाही. निसर्गप्रवृत्ति आगगाडीसारखी आहे क्रिस्ती शतकाच्या पूर्वी ज्या ज्या परिस्थितीच्या स्टेशनांवरुन ती भरधांव जात होती, तीं स्टेशनें आज कालपटलामागें अदृश्य झालीं असून, त्यांच्या अंधुकपणाबरोबरच तत्कालीन् परिस्थितीचे निरनिराळे रंगसुद्धां आजला दृष्टीगम्य नसल्यामुळें, तीक्ष्णतम दृष्टीसामर्थ्याची घमेंड मारणा-या मानवी प्रेक्षकांच्या नेत्रांना त्यांच्या इतिहाससिद्ध सगुणत्वाला निर्गुणत्त्वाच्या कोटीक्रमाचा बाप्तिस्मा देऊन, आपल्या निरीक्षण—कौशल्याची अब्रू कशीतरी बचवावी लागतें. कमींत कमी गेल्या चार सहा हजार वर्षांच्या अवधींत या आगगाडीनें इतक्या दूरवर झपाट्यानें प्रवास केलेला आहे की मानवी सृष्टीची प्रगमनप्रियता तिच्या प्रगतीच्या तडफेपुढें क:पदार्थ बनली आहे. निसर्गाच्या मेलगाडीनें जें स्टेशन एकदा मागें टांकले, त्याकडे ती पुनश्च कधींहि परत वळत नाहीं. उलटपक्षी, मानवी प्रवृत्तीची मालगाडी परंपरेच्या कोत्या अभिमानाच्या ठोंकरीमुळें वारंवार कोठल्या तरी मधल्याच स्टेशनावर ‘शंट’ करुन ठेवावी लागते. निसर्गाच्या मेलगाडीच्या इंजिनांत नवविचारांचा धगधगीत अग्नि भडकलेला असतो. मानवी प्रवृत्तीच्या मालगाडीच्या इंजिनाला सदर्न मराठ्याप्रमाणें लांकडांच्या ढलप्यांवर व जीर्ण साल्यापांचोळ्यावर आपली भूक भागविण्याची संवय लागलेली अलल्यामुळें, हरदाशी कंठाली घोड्याप्रमाणें तिची गती असते. निसर्ग प्रवृत्ति ही जात्याच एखाद्या सार्वभौम राजाच्या पट्टराणीसारखी नखरेल आणि तालेवार आहे. एकदा नेसलेली पैठणी ती पुन्हां कधींहि नेसत नाहीं. एकदां वापरलेल्या चंद्रहाराला ती पुनश्च केव्हांहि आपल्या वक्षस्थळाचा स्पर्श होऊं देत नाहीं. एकदा चाखलेले पक्कान्न तिच्या अधरोष्टच्या स्पर्शाला केव्हांहि पुन्हा पात्र हेत नाहीं. फार काय, पण श्रृंगारलीला केलेल्या आजच्या रंगमहलांत घडीभरानें ती पाऊलसुद्धां टाकणार नाहीं. तिच्याइतकी नव्यानवाईची भोक्ती सा-या विश्वांत तिची तीच. तीला दररोज नव्यानव्या पैठण्या पाहिजेत; नव्यानव्या फॅशनचे नवीन नवीन रत्नांनी गुंफलेले रत्नहार पाहिजेत; नवी नवी रुचकर पक्कान्ने पाहिजेत आणि रोजच्या रोज शुंगारलेले महाल पाहिजेत. जुन्यांकडे ती ढुंकूनसुद्धां पाहत नाहीं किवा त्यांची तिला आठवणसुद्धां होत नाही. रुचिवैचित्र्यांत निसर्गप्रवृत्ती जरी इतकी तालेवार आहें, तरी तिचा स्वभाव मात्र फार धिम्मा आणि तिंचे वर्तन कांटेतोल पद्धतशीर आहे. मानवी कौशल्यानें बनविलेलीं घड्याळें आणि तालयंत्रे वेळी पुढें मागे होतील – नव्हे, होतातच, --- पण निसर्गप्रवृत्तीची गति ठराविक ताळामेळानेंच अखंड चालूं आहे. वेदपूर्व काळ, वैदिक काळ, तत्त्वज्ञानाची उच्च भरारी मारणारा उपनिषत्काळ, पौराणिकी कांदब-यांचा काळ व ऐतिहासिक काळ, अशा अनेंक निरनिराळ्या क्षेत्रातून तिने पद्धतशीर संचार केला आणि आजला ती विचारशक्तिसंपन्न नव्या मन्वंतराच्या विसाव्या शतकांत नवजीवनाच्या रुचिवैचित्र्यांनीं खमंग बनलेली नवविचारांचीं पक्कान्नें सेवन करीत झपाट्यानें पुढें चाललीच आहे. वैदिक काळांत आल्यावर वेदपूर्व काळांतील आचाराविचारांकडे तिनें ढुंकून पाहिलें नाहीं; उपनिषत्काळांतील क्षत्रियांच्या छातिठोक तत्वशोधनांनी प्रदर्शनें पाहून ऋग्वेद काळांतील साध्या भोळ्या पारमार्थिक कल्पनांची तिनें टर उडविली नाही; किंवा पौराणिकी काळांतील काल्पनिक कथोपकथांचा बेगडी बृट्ट्याचा शालू पांघरतांना, उपनिषत्कांळच्या शुभ्र तलम मलमली वस्त्रांची तिला आठवण झाली नाही. ऐतिहासिक काळांत गोवळकोंडी कोहीनुरांची कंकणे मोठ्या अभिमानानें आपल्या हातांत चढलेली पाहूनसुद्धा, मागील पौराणिक काळांतील तकलादी दागदागिन्यांची तिनें कधिं निंदा केली नाहीं; किंवा ऐतिहासिक काळांतील ठुशांचा घांट प्रचलीत नव मन्वंतरांत अज्जिबात कां बदलला ? म्हणून तिनें कधिं कोणास प्रश्नहि विचारला नाहीं. कारण तिला