भिक्षुकशाहीचे बंड: Page 9 of 94

प्रस्तुत वज्रप्रहार ग्रंथमालेला असाच आश्रय देऊन आमच्या सत्यप्रेमी बंधु भगिनी आमच्य़ा स्वतंत्र प्रवृत्तीच्या नवमतवादी निस्पृह वाङमयसेवेचें योग्य चीज करतील अशी फार उमेद आहे. सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा. याचें कारण आतांपासून आमच्या सर्व ग्रंथाचें प्रकाशन करण्याचें कार्य आम्हीं आपल्या स्वत: च्याच हातीं आहे. प्रकाशकांच्या बाबतींत आम्हांला अत्यंत कटु अनुभव आला आहे. प्रकाशकपणाचा शेंदूर फांसलेले दगडधोंडे अखेर आपल्या जन्मप्रवृत्तीवर गेले; अर्थात् हातीं घेतलेल्या कार्याच्या महत्त्वापुढें या दगडोबांना लाथाडून आमचा मार्ग आम्हांला खुला करुन घ्यावा लागला. एक खप्पी प्रकाशक तर आम्हांला असे भेटले आहेत कीं सतत दहा वर्षे हाडांचीं काडे करुन लिहिलेला आमचा ग्रंथ ते जे दडवून बसले आहेत तो परत करण्याची बुद्धीच त्यांना होत नाहीं. कारण काय ? तर म्हणें तो कोठे ठेविला आहे तो सांपडत नाहीं ! आतां या दीर्घ स्मरण्या गृहस्थांना लोकमान्य टिळकांची शपथ घालायचें मात्र राहिलें आहें; बाकी, ग्रंथावर पाणी सोडण्यापलीकडे दुसरें गत्य़ंतर उरलें नाहींच, असो. या उप्पर आमच्या सर्व जुन्या नव्या ग्रंथांबद्दल पत्रव्यवहार करणें तो फक्त आमच्याच नांवानें करीत जावा. पूर्वींच्या नामधारी प्रकाशकांचा व आमचा कांही एक संबध उरलेला नाहीं किंवा त्यांच्या हातीं आमच्या ग्रंथांबद्दल कसलाहि अधिकार ( पूर्वी दिलेच नव्हते !) उरलेले नाहींत. प्रस्तुत पुस्तकाच्या संकल्पावस्थेपासून तो त्याचा आज जन्म होईपर्यंत आमच्या अनेक मित्रांनी आम्हांला परोपरी सहाय केले. त्यांच्या सहायाच्या तुलनेनें आमचें नुसतें शाब्दिक आभार प्रदर्शन अगदीच कमतोल ठरणार हें उघड आहे. आभार प्रदर्शानाचे काम मोठें बिकट असतें. त्यांच्या सक्रीय सहानुभूतिमुळेंच एखादें कार्य तडीला नेण्यास आपण शक्त होतो, त्या सहानुभूतीचा प्रत्युपकार फेडण्याचें सामर्थ्य नुसत्या शब्दांत तरी खास नाहीं, हें उपकार करणारा प्रत्युपकाराचा प्रयत्न करणारा दोघेहि जाणत असतात म्हणून आमच्या सर्व प्रेमळ सहायकांच्या चरणीं आम्ही कृतज्ञ भावनानें मस्तक ठेवितो, या पलीकडे ह्रद्यस्थान भावनेचें व्यक्तीकरण करण्यास अन्य मार्ग या क्षणी तरी आंम्हाला आढळत नाही. प्रेमळ मित्रांनी उत्तेजन दिलें, परोपरी सहाय केलें व ग्रंथकारानें आपल्या ब-यावाईट पद्घतीनें ग्रंथ लिहून काढला; पण तो छापून निघाल्याशिवाय उपयोग काय? हल्ली मुंबईत छापखान्यांवर महागाईची व कामगारांच्या तुटवड्याची वक्रदृष्टी भयंकर असतांनाहि तत्त्वविवेचक छापखान्याचे तरुण उत्साही व सत्यप्रेमी मालक श्री. यशवंतराव काशिनाथ पडवळ व व्यवस्थापक श्री तुकारामजी शेट यांनीं हा ग्रंथ फारच मेहनतीनें उत्कृष्टपणें छापून दिला. याबद्दल त्यांचे उपकार कोणत्या शब्दांनीं व्यक्त करावे? आम्ही त्यांचे फार आभारी आहोंत ता. ९ मे सन १९२१ सोमवार श्रीशिवजयंति, वैशाख शु.२ शके १८४३ वज्रप्रहार ग्रंथमाला कचेरी २०, मिराडाची चाळ, दादर मुंवई नं, १४ दोशबंधुभगिनीचा दासानुदास कोशव सीताराम ठाकरे. ॐ भूर्भुव: स्व : तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि ।। धियो यो न : प्रचोदयात् । भिक्षुकशाहींचे बण्ड “आम्हा हिन्दु लोकांना अनेक शतकांपासून अनेंक प्रकारच्या जुलमांखालीं रहावयाची सवय झाल्यामुळें आमच्या समाजांतील नीतिबल अगदीं नाहीसें झालें आहे. राजकीय जुलूम, आचार्यांचा जुलूम आणि सामाजिक किंवा जातीचा जुलूम अशा तीन प्रकारच्या जुलुमांखालीं आम्ही इतके दडपून गेलों आहों की, आम्हांस मान वरच करता येत नाहीं.” डॉ. भांडारकर. जुनें तेवढें सोने, ही म्हण सोन्याइतकीच जरी मोहक आणि उत्कृष्ट असली, तरी सृष्टीक्रमाने निसर्गसिद्ध कायद्यांशीं विरोध करणारी आहे. अर्थात् या म्हणीच्या सांवलीखालीं फक्त जणिर्मतवाद्यांनी –म्हणजे अप्रगमनशीलांनींच–काय तो आश्रय ध्यावा, मानवी सृष्टीत हरहमेश मोठमोठाल्या चळवळीं, प्राणघातक तंटे, मस्तकें भाणाणून सोडणारे घातपात, ह्रदयाचें पाणी पाणी करुन टांकणारीं बंडें सत्याला असत्याचा आणि असत्याला सत्याचा मुलामा चढवून जीवसृष्टीचा संहार करणारी अमानुष युद्धें व कत्तली यांचा धुमाकूळ अखंड चालूं असूनसुद्धां निसर्गदेवतेचा कारभारी अगदीं कांटेतोल समतेनें अव्याहत चालुंच आहे. इतकेंच नव्हे, तर झपझप चालण्यास नेहमींच नाखुष असलेल्या मानवी प्रवृत्तीलाही तो आपल्या बरोबर पुढें पुढें खेंचीत नेण्यास सोडीत