भिक्षुकशाहीचे बंड: Page 8 of 94

इंग्रजी नोकरशाहीच्या कृष्णकृत्यांची जितकी चीड ब्राह्मणांना येत आहे, तितकी ब्राह्मणेतरांना येत नाहीं, असे म्हणणें म्हणजे वस्तुस्थितीचा जाणूनबुजून शुद्घ विपर्यास करण्यासारखे आहें. गुलामगिरीच्या जोंखडाखालीं उत्साहानें मान देणारा अधम प्राणी या विसाव्या शतकांत हिन्दुस्थानांत औषधालासुद्धां मिळणार नाहीं. ब्राह्मणेतरांच्या चळवळींच्या मुळांशी गुलामगिरीची चीडच मुख्यत: आहे, हें लक्षांत असावें. गुलामगिरी-मग ती उन्मत्त इंग्रजी नोकरशाहीची असो, नाहींतर मदोन्मत्त भिक्षुकशाहीची असो, ती एकदां कायमची झुगारुन द्यायची व राजकीय, धर्मिक सामाजिक सर्वच बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करुन घ्यायचें, हाच मुख्य उद्देश ब्राह्मणेतरांच्या चळवळीचा दिसतो. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर ब्राह्मणांनी आपल्या हातीं असलेल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, असें मोठ्या कष्टानें म्हणणें भाग पडतें इतकेंच नव्हे तर उदार मनानें पूर्वींचे दोष उघड कबूल करुन त्यांचे योग्य परिमार्जन करण्याऐवजीं त्या दोषांची तरफदारीच करण्याकडे कांहीं मूठभर व्यक्त्या बाद करुन ब्राह्मणवर्गाची प्रवृत्ति अजून सुद्घां इतकी तीव्र आहे कीं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादाचा समेट नुसत्या शाब्दिक वादाविवादानें घडून येईल किंवा नाहीं, याची जबरदस्त शंका येते. खरें म्हटले तर वादाविवादाचें युग संपून या तंट्याचे पाऊल प्रत्यक्ष प्रतिकाराच्या क्षेत्रांत पडून सुद्घां चुकले आहे. हल्लीं ठिकठिकाणी ब्राह्मणेतरांच्या ज्या चळवळी सुरु झाल्या आहेत, त्यांच्या मुख्य हेतू जर कोणता असेल तर तो तीनच शब्दांत सांगता येतो. Down with priests (भिक्षुकशाहीला खाली ओढा. या चळवळीची साधनें (methods) किंवा त्यांचे वर्तन ( conduct) अगदीं सोळा आणि सात्विक नसतील आणि एकदा युद्धालाच तोंड लागले की कवायतीच्या शिस्तीची समरभूमीवर फारशी कोणीं पर्वा राखीत नाहीं. ! –तरी पण त्यांच मूळ उद्देश जो भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीचा नायनाट त्याबद्दल त्यांना कोणीहि समंजस मनुष्य जबाबदार धरणार नाहीं. आमच्या मतें ही चळवळ भिक्षुकशाहीच्या उन्मत वर्तनाची कांटेकोर प्रतिक्रिया आहे. आघाताचा प्रत्याघात आहे. कृतकर्मांचे प्रायश्चित आहे. कसाहि आणि कितीहि विचार केला तरी या चळवळी बंद पाडण्याचें कार्य विरोधानें घडणें शक्य नाहीं. विरोधानें विरोधच वाढणार ! भिक्षुकशाहीच्या कृत्रिम वर्चस्वाविरुद्ध उघड उघड चढाई करणा-या या व्यक्त चळवळीपेक्षां ठिकठिकाणीं असल्या अनेंक अव्यक्त चळवळी आहेतच. त्यांची वाट काय ? वा कां अस्तित्वांत आल्या ? त्यांचे ध्येय काय ? त्यांचा परामर्ष सामोपचारांनी घ्यायाचा की वितंडवादांनीं कलाहाग्नि भडकवून द्यायाचा ? याचा विचार प्रथम व्हावयास पाहिजे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उदात्त कल्पनांच्या वातावरणात उंच उंच भरा-या मारणा-या गरुडांनी पृथ्वीतलावरील आपल्याच घरची आपलीच भावंडे समर्थांच्या घरच्या श्वानांनी किंवा श्वानांच्या घरच्या समर्थांनी गुलामगिरीच्या वरवंट्याखाली ठेंचण्याचा संप्रदाय चालूं ठेवलेला पाहून सुद्धां किंचित् खाली उतरुं नये, यावरुन कोणाला काय बोध घेतां येण्यासारखा असेल तो घ्यावा ! नरसोबाच्या वाडीला तेथील भिक्षुकांनी मुंबईवर दैवज्ञांवर केलेली प्राणघातक दंगल, नगरच्या नागझरी कुंडावरची मारामारी, बोरखळास झालेला तिरस्कारणीय पोरखेळ, सज्जनगडावरचा हलकट दंगा, औंध संस्थानांत सध्यां सुरुं असलेली पंतांची डायरशाही व या सर्व प्रकरणांचे खापर एनकेन प्रकारेण ब्राह्मणेतरांच्या माथी फोडण्याची राष्ट्रीय कंपूची चतुराई व कारवाई पाहून वारा कसा व कोणत्या दिशेला वाहत आहें, हें सांगायला नको. हे असले प्रकार आजला ठिकठिकाणी घडत आहेत. ते पाहून कोणाहि समतौल भावनेच्या मनुष्याचें मन खिन्न झाल्याशिवाय राहाणार नाहीं; मग भिक्षुकशाहीच्या नकली वर्चस्वाविरुद्घ आधींच खवळलेल्या आडदांड सत्यशोधकांनी कांही दंडेली केलीच, तर त्यांचा कान कसा पकडतां येईल? अत्याचार केव्हांहि झाला, कोणीहि केला तरी तो निंद्यच; परंतु आपला दाम खोटा असून परक्यांशीं झगडा करणें मूर्खपणाचें आहे, एवढी जाणीव जर भिक्षुकशाहीला होईल, तर या वादाचा शेवट हां हां म्हणतां होईल यांत मुळींच संशय़ नाहीं, आमच्या आजपर्यंतच्या सर्व ग्रंथांना महाराष्ट्रीय बंधु भगिनीनीं फारच चांगला आश्रय दिलेला आहे; इतका कीं आमच्या प्रत्येक ग्रंथाची प्रथमावृत्ति बोलबोलता महिना पंधरा दिवसांतच खलास होत आली. या आश्रयाबद्दल आमचा विनम्र माथा त्यांच्या चरणीं कृतज्ञतापूर्वक सदैव ठेविला आहेच.