भिक्षुकशाहीचे बंड: Page 7 of 94

आमच्या मनावर जे जे संस्कार झालें, बुद्घीला जीं जी तत्त्वे विचारांती पटलीं व प्रवासांत ठिकठिकाणाच्या विद्वानांशी चर्चा करुन आमच्या हिंदु समाजांतल्या सामाजिक, धार्मिक व नैतिक अनेक अन्यायांची आम्हांला जी प्रत्यक्ष प्रचिति आली, त्या सर्वांचे नि:पक्षपणानें, स्पष्टोत्कीनें यथाशक्ती उदघाटन करण्याचा आम्हीं निश्चय करुन, नवमतवादाचा पुरस्कार करणार ही वज्रप्रहार ग्रंथमाला गुंफण्याचे कार्य हाती घेतलें आहे ‘सत्यात् नास्ति परोर्धम ; सत्यापरता नाहीं धर्म । सत्य हेंचि परब्रह्म ।। हें आमचें ब्रीदवाक्य आहे. आम्हांला राजमान्यतेची चाड नाहीं, लोकमान्यतेची पर्वा नाहीं, स्वकीय परकीयांच्या निंदास्तुतीची अगर वर्तमानपत्री चित्रगुप्तांच्या शिखंडी हल्ल्यांची दिक्कत नाहीं. उच्चनीचत्वाचा भेद आम्ही साफ झुगारुन देऊन, सर्व देशबांधव एकाच दर्जाचे आहेत, या भावनेनें आम्ही कोणाच्याहि रागलोभाची पर्वा न करतां सत्य गोष्टी स्पष्ट बोलून दाखवूं कोणी कितीहिं प्रतिकार केला तरी यांत खंड पडणार नाहीं. आमची लेखणी व जिव्हा थांबविण्याची शक्ति एक मृत्यूमध्यें आहें. इतर कोणाच्याहि मानवी शक्तीचें ते सामर्थ्य नव्हे ! मानापमानाचा पूर्ण संन्यास करुन आमच्या देशबांधवात सत्य तत्वाची जागृति उत्पन्न करण्यासाठीं आम्ही अन्यायांवर वज्रप्रहार करण्याचा भगवान् श्रीकृष्णाच्या प्रेरणेनें दृढ संकल्प केला आहे. जेथें जेथें अन्याय होत आहे किंवा असेल, खोडसाळ असुरी कल्पनांच्या मायेची जाळीं पसरलीं गेलीं आहेत, जात आहेत व पुढें जातील, त्या त्या ठिकाणीं आमचा वज्रप्रहार दत्त म्हणून उभा आहेच असें समजा. ज्यांना आमच्या मतांशी सामना द्यावयाचा असेल त्यांनी प्रामाणिकपणानें व विशेषत: सभ्यपणानें टीकास्त्रांनी खुशाल विरोध करावा; आम्ही त्या सज्जनांच्या विधानांना अत्यंत प्रामाणिकपणानें सरळ सरळ प्रत्युतरें आमच्याच पुस्तकांतून देऊं; वर्तमानपत्रांचा कधींहि अवलंब करणार नाहीं, बीभस्त विपर्यासी, पौरसवदा किंवा संदेशी धाटणीच्या टीकाकारांना आम्ही कदापिहि प्रत्युत्तर देणार नाहीं. शिखंडीवर शरसंधान रोखणे क्षत्रियांचें ब्रीद नव्हे ! ध्येय जरी एकच असलें तरी कार्य करण्याच्या पद्घति प्रत्येकाच्या भिन्नभिन्न असतात रोगाच्या निदानाच्या बाबतींत वैद्य डॉक्टरांचें जरी एकमत झालें, तरी प्रत्येकजण आपपल्या मताप्रमाणेंच औषधयोजना करणार. डॉक्टर टिंक्चराकडे धावणार, वैद्य काढ्या निकाढ्याच्या सप्तकाची योजना करणार, होमिओपाथ मोहरीएवढी एकच गोळी बादलीभर पाण्यांत विरघळवून एकेक मिनिटाला चमचाचमचा आचमनाची रोग्याला संथा देणार आणि सर्जन म्हणणार ‘हें काहीं नको; या रोगावर शस्त्रप्रयोगच केला पाहिजे.’ असा मतामतांराचा धांगडधिंगा नेहमींच चालत असतो. अर्थात् आमच्या पुस्तकांतली विवेचनसरणी जरा विशेष स्पष्ट तिखट कां असते, याला आमचें उत्तर हेंच की आमच्या मताप्रमाणें हीच पद्घति आतां आवश्यक आहें. हिन्दुसमाजांतील ज्या अनेक दोषांवर आम्ही कडकडीत टीका केली आहे, त्यापेक्षां अधिक खरमरीत भाषेंत त्यांचे वाभाडे काढणारे आमच्यापेक्षां सवाई शिकंदर ग्रंथकार अनेंक झाले, आहेत व होतील. अमूक एक दोष हा भंयकर आहें, इतकें खात्रीलायक पटल्यावर त्याला आमूलाग्र उखडून टांकण्यासाठी शस्त्रप्रयोगाची मनाची निष्टुरता न दाखवितां, त्यावर नुसत्या घोंटीव मलमाच्या मलमपट्ट्या बांधीत बसणें म्हणजे मनाचा दुबळेपणा व्यक्त करणें होय. भिक्षुकशाहीच्या बण्डाचें गळूं या असल्या तोंडपुज्या मलमपट्ट्यांनी अगदीं पूर्ण पिकलें आहे. पिकवणीचे काम झालें. आता त्यावर तीक्ष्ण शस्त्राचा टोला मारुन त्याला तोंड पाडलें पाहिजे, म्हणजे आपोआप त्याची सर्व घाण बाहेर पडूं लागेल. राष्ट्रांतील सर्व गोष्टीची पुनर्घटना होऊं घातली असतां, अमूक एक प्रश्न सध्यां बाजूला ठेवा असें म्हणणें केव्हांहि न्याय्य होणार नाहीं. पुनर्घटना करायचीच असेल तर सर्वागीण तरी करा. नुसत्या राजकीय पुनर्घटनेच्या प्रश्नानें हिन्दुस्थानांतले सर्व वादग्रस्त पश्न मिटतील, असे आम्हाला मुळींच वाटत नाहीं. राजकीय बाबतीत ब्राह्मणेतरांचा ब्राह्मणांवरील विश्वास अज्जीबात उडालेला आहें आणि सामाजिक व धार्मिक व बाबतींतल्या ब्राह्मणांच्या वर्तनाचा गतेतिहास अत्यंत जुलमी, बेदरकार व उर्मट असल्यांची साक्ष स्पष्ट व ठळक आहे. अशा स्थितींत धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतलीं उच्चनीचत्त्वाचीं लहान मोठीं टेकाडीं जमीनदोस्त करुन हिन्दुसमाजांतील सर्वच क्षेत्रांची भूमिका ताळेबंद समप्रमाणांत आणल्याशिवाय नुसत्या कोरड्या राष्ट्रीयत्वाचा पुराणांना अत : पर कोणीहि भाळणार नाहीं.