भिक्षुकशाहीचे बंड: Page 6 of 94

अशी आशा आहे मुंबई, हनुमान जयंति शके १८४३ गोविंद गोपाळ टिपणीस वज्रप्रहार ग्रंथमालेचा उद्देश. ।। सत्यात् नास्ति परोर्धम: ।। मानवजातीच्या संसारात उदारमनस्कता, व्यापकता व पूर्ण स्वातंत्र्य आणणें, म्हणजेच पृथ्वीवर परमेश्वराचें साम्राज्य स्थापन करुन नराला नारायण स्वरुपाचा साक्षात्कार पटविण्याइतकें पुण्यकर्म आहे. हें पुण्यकर्म निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेत ज्ञानाचा प्रसार अधिकाधिक करण्याबद्दल द्विधामत असणें शक्य नाहीं. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्दते ही जगदगुरु श्रीकृष्ण भंगवताची आज्ञा आहे. हल्ली महाराष्ट्रांत ‘मतांमतांचा गलबला’ सर्वत्र धुमश्चक्री घालीत असतां ‘कोणी पुसेना कोणाला’ अशी अनावस्था पदेपदीं प्रत्येकाच्या प्रत्यायास येत आहें. आखिल भरतखण्डांत पुरुषांच्या निवळ साक्षरतेचे (विद्वत्तेचे किंवा विचारक्षमतेचें मुळीच नव्हें) प्रमाण शेंकडा फक्त सहा असून, स्त्रियांच्या साक्षरतेचें प्रमाण हजारीं तरी एक पडेल की नाहीं, याची वानवाच आहे. अस्पृश्य व अवनत (डिप्रेस्ट) बांधव ७ कोटींच्याहि वर असून त्यांच्या निरक्षरतेचें प्रमाण शेंकडा ९९.५ आहे. उच्चत्वाची शेखी मिरवणा-या समाजांकडून या मुक्या दुबळ्या समाजावर होणा-या जुलमांपुढें व अन्यायापुढें नादीरशहा तैमुरलंगाच्या तलावारीसुद्धां बोंथट पडतील, इतकें त्या जुलमांचें स्वरुप क्रूर, अमानुष व माणुसकीच्या तोंडाला काळे फासणारे आहें. २०,७१,४७,०२६ हिन्दुजनांच्या समुदायांत दोन कोटी साठ लक्ष निरक्षर विधवा असून त्यांच्या आपत्तींचे स्वरुप अवनत बांधवांच्या दुदैवापेक्षां खचित कमी निद्द व चिळस आणणारें नाहीं. येणेंप्रमाणें आमच्या बुद्घिमत्तेची व नीत्तिमत्तेची वाट लागली. शारिरीक सुस्थितीबद्दल तर लिहिण्याची सोयच नाहीं. वैवाहिक संस्कारांतल्या बालविवाहाच्या अमानुष जुलमामुंळे शेंकडा २५ अबला अकालीं मृत्युमुखीं पडत आहेत व विवाहविधी व्यापारी धोरणांवर किंवा ‘पुरवठा व मागणी’ च्या तत्वांवर चालू असल्यामुंळें शेंकडा २५ ते ३५ स्त्रिया प्राणघातक शारिरीक व्यंगामुळे जिंवत असून नसून सारख्याच होत आहेत. लहान मुलांच्या मृत्यूचें प्रमाण हजारी २११ असून, शेंकडा पंचवीस मुलें एका वर्षाच्या आंतच आपल्या पणजोबाच्या भेटीची तांतड करतात संपन्नतेच्या बाजूला पाहिले तर या २० व्या शतकात अन्नापाण्यावांचून तडफडून प्राण सोडणा-या हिन्दी बांधवाची संख्या सात कोटीच्या वर आहें. व्यापारधंद्याच्या नांवानें केवढा मोठा शंख दुर्देवाच्या अडणीवर बसला आहे, तो बोट न दाखविता कोँणलाहि दिसणारा आहे. अशा अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक जखमांत आणखी जातिमस्तरांच्या प्राणघातक किड्यांचा भयंकर बुजबुजाट झाल्यामुंळें हिंन्दु विराटपुरुषाचें हिडीस चित्र रंगविण्याच्या कामी विश्वकर्म्याच्याहि चित्रकौशल्याचा हात टेंकण्याचा प्रसंग सांप्रत आला आहे. अशा या मरुं घातलेल्या विराटपुरुषाच्या सडलेल्या कोठ्यांत लोकशाहिचें रसायन कोणी कितीहि शहाणा धन्वंतरी असला तरी चुटकीसरसें मुळींच पचनी पाडूं शकणार नाहीं, असें आम्ही कोणाच्याहि निंदास्तुतीची पर्वा न करतां स्पष्ट म्हणतों. लोकशाहीचीं पुराणे झोडायला व ऐकायला जरी कांहीं श्रम पडत नाहींत व त्यांचा गोंडसपणानें जनता जरी घटकाभर आनंदाने बेहोष होऊन नाचूं लागेल, तथापि लोकशाही हे मृगजल आहें व तें हिंदूंची तहान सध्यां तरी मुळीच भागवूं शकत नाहीं, असे आमचें प्रामाणिक मत आहें. गुलामगिरीत खितपत पडणा-या लोकांना स्वातंत्र्याची पुराणें आकर्षक व मधुर वाटणें, यात अशक्य असें काहिंच नाहीं, तो निसर्गाचा नियमच आहे. पंरतु गुलामगिरींतून निसटून स्वातंत्र्याच्या क्षेत्रांत येण्यापूर्वी आपल्याच दुष्कर्मांमुळें आपल्य़ा हातापायांत पडलेल्या अनेक पोलादी श्रुंखळा दांतांनीं कुरतडुन तोडण्याचे महायत्न करावे लागतात, हें विसरतां कामां नये. गुलामगिरीचें स्वातंत्र्यांत होणारे दिव्य पर्यवसान म्हणजे आधुनिक नाटकांतला ट्रान्स्फर सीन नव्हे. लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक स्वदेशी शाह्यांच्या दौती लाथाडून जमीनदोस्त कराव्या लागतील व केल्या पाहिजेत. पाश्चिमात्य असुरी मायेचा(जिला महर्षि रविंद्रनाथ टागोर नॅशनॅलिझम असें सार्थ नावं देतात, तिचा) प्रतिकार करण्यापूर्वी, खुद्द आमच्याच देशांतल्या देशांत ज्या अनेक असुरी शाह्यांच्या जुलमी लीलाचे धांगडधिंगे आज अनेक शतकें चालुं आहेत, त्यांना चेंचून जमीन दोस्त केल्याशिवाय हिंदुस्थानाला व विशेषत: हिंदुजनांना सुखाची व शान्तीची प्राप्ती खास होणार नाहीं, असें आम्ही कोणाचीहि भीडमुर्वत न धरता स्पष्ट म्हणतों. गेली वीस वर्षे स्वाध्याय, मनन व निरीक्षण करीत असतांना