भिक्षुकशाहीचे बंड: Page 5 of 94

म्हणणें म्हणजे शुद्ध दंडुकेशाही आहे; असेच ब्राह्मणेतरांचे आणि सत्यशोधकांचे म्हणणें आहे. ज्या ब्राह्मणांना तें मान्य आहे ते भिक्षुकशाहींचे बंड मोडण्याच्या कामी आज देखील त्यांना मदत करीत आहेत. सत्यशोधक समाज निघाला त्याचवेळीं निदान आपल्या महाराष्ट्रांत तरी हा ब्राह्मण ब्राह्मणेतरांचा वाद अलीकडच्या काळात चालू झाला. ह्या पुर्वी भिक्षुकशाहीनें ब्राह्मणेतरांना अनेंक प्रकारें छळले. पण तो ऐतिहासिक भाग बाजूला सारला तरी प्रस्तुत वाद चालूं होऊन आज पन्नास वर्षे झालीं, असें असता सरकारी अधिका-यांच्या चिथावणीनेंच. हे पक्ष झाले वगैरे कुस्तित कल्पना जनतेच्या मनांत भरवून आपल्या वाटेस कोणीहि न जाईल असें करणे हा भिक्षुकशाहीचा कावा आहे. सध्यांच्या काळीं ह्या वादाचे मूळ काय आहे, ब्राह्मणेतर जें म्हणतात त्यांत कोठे चूक आहे, बंडखोर भिक्षुकशाहीच्या म्हणण्यांत कितपत सत्य आहें, हे पहाण्य़ाचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे ब्राह्मणेतरांप्रमाणेंच ब्राह्मणांनीहिं सत्यशोधक बनून आजच्या धार्मिक सामाजिक, बौद्धिक वगैरे गुलामगिरीतूंन प्रथम आपल्या बांधवाची सुटका केली, तरच राजकीय गुलामगिरीतूंन सर्वांची सुटका होईल. रा. ठाकरे यांच्या पुस्तकांत ह्या गोष्टीचें यथोचित विवेचन असून त्यांनी आपल्या विवेचनास आधार म्हणून टीपेंत दिलेले उतारे अत्यंत चिंतनीय आहेत. रा. ठाकरे यांनी पुस्तकारंभी हातांत धरलेली लेखणी पुस्तक अपुरेंच पुरें करुन खाली ठेवली असावी असें दिसतें. ही लेखनशैली कितीहि प्रतिभा द्योतक असली तरी, वाचकांस कंटालवाणी होते. ह्यापेक्षां त्यांनी जर ह्या पुस्तकाचे भाग पाडले असतें तर विषयप्रतिपादन कंटाळवाणें न होतां, अधिक व्यवस्थित आणि पुनरुक्तीदोषरहीत असें झाले असतें. स्त्रियांचे अज्ञानच भिक्षुकशाहीच्या बंडाचे विशेष पोषक आहे असे सांगून त्याचें विवेचन स्वतंत्र पुस्तक रुपाने देण्याचें रा. ठाकरे यांनी योजिल्यामुळें त्यांचे हे प्रस्तुतचें पुस्तक अपूर्ण स्थितीत अर्थात मध्येंच पूर्ण झाल्यामुळें वाचकांची निराशा झाल्यावांचून रहात नाहीं. ‘ब्राम्हणेतरांची चळवळ’ या लोकमान्य शब्द योजनेनें आतां सुप्रसिद्ध होत असलेल्या सुधारकांचा कटाक्ष ब्राह्मण म्हणविणा-या समाजाविरुद्ध नसून या भिक्षुकी कारस्थानाविरुद्ध आहें. ( पृ.४७ ) असें जें. रा ठाकरे यांचे म्हणणें आहें तें अगदी बरोबर आहें. आम्ही वर एके ठिकाणी आपला अभिप्राय याप्रमाणेंच नमुद केला आहे. रा ठाकरे यांनी जरी ह्या भिक्षुकीकारस्थानाविरुद्धच लिहिण्याचें योजिलें असले आणि ‘ब्राम्हण म्हणविणा-या समाजाविरुद्ध’ लिहिण्याचा जरी त्यांचा हेतु नसला तरी त्या कारस्थानाचा परिपोषाचा विचार चालूं असतांना आणि विशेषत: ह्या कारस्थानी मंडळीकडून वांरवार पुढें ढकलण्यांत येंणारे बीज क्षेत्राचें घोडें किती लंगडे आहे हें सांगताना सामान्यत: ब्राम्हण जातीवर तुटून पडल्यासारखे दिसतात पण ब्राह्मणाच्या कुळांत जन्मल्यानें कोणीहि गुणकर्माने ब्राम्हण होऊ शकत नाहीं. तसाच क्षत्रियांच्या कुळांत जन्मल्यानें जसा कोणी गुणकर्मानें ब्राह्मण होऊ शकत नाही तसाच क्षत्रियांच्या कुळांत जन्मल्यानें कोणीहि खरा क्षत्रिय होऊ शकत नाहीं. ब्राह्मण जसे महारादि हीन मानलेल्या जातींना अस्पृश्य मानितात तसेच क्षत्रियादि इतर वर्णांचे लोकहिं त्यांना अस्पृश्य मानितात. ह्या गोष्टी लक्ष्यांत घेतल्या तर भिक्षुकशाहीचा बंडाला ब्राम्हणांइतकेच इतर समाजांकडूनहि प्रोत्साहन मिळत आहे ही गोष्ट कोणालाहि अमान्य करिता येणार नाहीं. रा. ठाकरे यांच्या प्रस्तुतच्या पुस्तकाचा वाचनानें भिक्षुकशाहींचे कारस्थान कसें उभारलें गेले आणि ह्या कारस्थानी लोकांनीं धर्मग्रंथात स्वत:चे स्तोम माजविण्यासारख्या गोष्टी दडपून ब्राम्हणादि सर्वच वर्णांच्या गळ्यांत बौद्घिक गुलामगिरी कशी बांधली ह्या गोष्टी चांगल्याच समजतील. रा. ठाकरे कोणत्याहि पक्षाचे नाहींत. ब्राम्हणांच्या पक्षाचे नाहींत कीं ब्राह्मणेतरांच्या पक्षाचे नाहीतं. ते सत्यशोधक आहेत पण सत्यशोधक समाजाचे सभासद नाहींत किंवा त्या समाजाविरुद्ध दौरा काढणारेहि नाहिंत. राजकीय बाबतींत त्यांची मते कोणत्या पक्षाचीं आहेत हें जरी आम्हाला माहीत नाही, तरी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या बाबतींत ते जहालांतले जहाल असल्यामुळें राजकीय बाबतीत देखील फारसे मवाळ असतील असें वाटत नाहीं. अशा विचाराच्या आणि मताच्या विद्वानाकडून लिहिल्या गेलेल्या पुस्तकांत उपरिनिर्दिष्ट काहीं दोष असले तरी ते सात्विक त्वेषाचे द्योतक आहेत, असे समजून वाचक वर्ग त्यांतील गुणांचेंच ग्रहण करतील