भिक्षुकशाहीचे बंड: Page 4 of 94

कबूल केल्यावर पुस्तक वाचीत असतां हा भाग आमच्या अवलोकनांत आला. पूर्वी येता तर आम्हीं रा.ठाक-यांच्या आग्रहालाहि बाजूस सारुन हें प्रस्तावना –लेखनाचें कार्य आंगावर खचित घेतलें नसतें. जलपर्यटनाबद्दल प्रायश्चित्त घेणारी व्यक्ति कोणीहि असो, प्रायश्चित्ताच पोंचटपणा लोंकाच्या निदर्शनास आणून देणें हें लोकशिक्षणाचें ब्रीद बाळगणा-या पत्रकाराचें कर्तव्य आहे असें आम्हाला वाटतें. लोकमान्य टिळकांनी विलायतेस गेल्याबद्दल प्रायश्चित्त घेतलें आणि तो प्रंसग साधून आम्ही प्रायश्चित्तासंबंधाचे आमचे विचार निर्भिडपणें लोकांसमोर मांडिले. जर तो लेख अशा सार्वजनिक महत्वाचा नसता, व केवळ व्यक्तिश: टिळकांवरच जर ती टीका असती, तर त्यांच्या निधनापुर्वीच ती छापून तयार असता निरुपायानेंच कां होईना, त्यांच्या निधनानंतर आम्ही ती खास प्रसिद्ध केली नसती. हा लेख अशा रीतीनें प्रसिद्ध झाल्यानंतर आतां कोणी वर्तमानपत्रांत आमच्यावर कुत्सित टीका करोत, खासगी पत्रें पाठवून आम्हाला शिव्या देवोत, किंवा महाराष्ट्र –साहित्याला बहिष्कार घालोत अथवा रा.ठाक-यांप्रमाणे आमचें अभिनंदन करोत, कर्तव्यानंदापुढें आम्हाला ह्या निंदास्तुतीबद्दल दु:ख अथवा सुख दोहोंचीहि विशेष पर्वा वाटत नाहीं. प्रायश्चित घेतल्याबद्दल लोकमान्यांवर आम्हींच टीका केली होती असे नाहीं समाजकल्याणापुढें आणि स्वत:च्या कर्तव्यापुढें लोकमान्याची मुरवत न बाळगणा-या अनेक पत्रकर्त्यांनीं आमच्या पूर्वी आणि आमच्यापेक्षांहि जास्त निस्पृहतेने त्यांचा समाचार घेतला होता. रा ठाकरे यांच्या अवलोकनांत जर नगरच्या दीनमित्रानें केलेली टीका आली असती तर त्यांनी महाराष्ट्र –साहित्याकाराच्या निस्पृहतेबद्दल त्यांस इतके धन्यवाद दिलेच नसते.! भिक्षुकशाहीच्या बंडाचा आतांपर्यंत आम्हीं वर जो इतिहास दिला आहे त्यावरून हे बंड केवळ ब्राह्मणेतरांविरुद्घ आहे असें म्हणता येणार नाहीं. ब्राह्मणेतरां इतके जरी नसले, तरी त्याचा दुष्परिणाम ब-याच ब्राह्मण म्हणवणा-या जातींना व गृहस्थ-ब्राह्मणांनाहि भोगावे लागले आहेत व लागत आहेत. तसेंच तें मोडण्याचा कामीं ब्राह्मणेतरांस ह्या गृहस्थवर्गांतील ब्राह्मणांना अनेंकवेळां मोठी महत्त्वाची मदत केलेली आहे आणि आजहि ते तशा प्रकाराची मदत त्यांना करीत आहेत. फार कशाला इतिहास कालीं ह्या बंडखोरांवर पहिला हल्ला चढविणारा ज्ञानेश्वर जन्मानें ब्राह्मणच होते; त्यानंतर तीनशें वर्षानीं या बंडखोरास त्राहि भगवान म्हणावयास लावणारा एकनाथहि जन्मत: पैठणचा अस्सल ब्राह्मणच होता एकंदरीत विचार करिता भिक्षुकशाहीच्या समाजविध्वंसक बंडाविरुद्घ बोलणें किंवा लिहिणें म्हणजे हल्ली जिला ब्राह्मणेतरांची चळवळ म्हणून म्हणतात त्या चळवळींत सामील झाल्याचें अघोर (?) पालक करणें असें जर कोणी म्हणत असेल तर तो त्याचा मतलबी वेडेपणा आहे, असे आम्हाला वाटते हल्लींच्या जन्मसिद्ध जातींची उभारणी वर्णाच्या पायावर झाली असें म्हणतात पण गुणकर्मविभागात उत्पन्न झालेल्या चार वर्णांचा आणि सध्यांच्या आमच्या चार लाख जातींचे कांहीं एक संबंध नाहीं. असा संबध असता तर सर्वच धर्मांतील समाजांत आमच्या हिंदु समाजाप्रमाणें जाति मानण्यांत आल्या असत्या. पुस्तकसंग्रहांत ज्याप्रमाणे ऐतिहासिक शास्त्रीय, वाङमयविषयक इत्यादि विषयवारीनें पुस्तकांचे वर्गीकरण करितात त्याप्रमाणे हिंदुसमाजात मनुष्याच्या आंगच्या गुणांवरून आणि त्यांनें दाखवलेल्या कर्तबगारीवरुन वर्गीकरण केलेलें आहे त्यालाच वर्णपद्धति असें आमच्या प्राचीनतमपूर्वजांनी म्हटलेले आहे अर्थात ही वर्णपद्धति नावानें जरी नसली तरी सर्व धर्माच्या आणि सर्व देशांतील समाजांत अस्तित्वांत आहेच आणि यापुढेंहि ती तशीच अस्तित्वांत रहाणार याबद्दल आम्हांला तरी बिलकुल शंका वाटत नाहीं. हिंदुस्थानांतल्या भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांनीं मात्र आपलें श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याकरीतां तिला जातींचे स्वरुप दिलें आणि जाती जन्मावरुन ठरविल्या ! जन्मावरुन मनुष्यांचे उच्च निचत्व ठरवावयांचें आपल्याच धर्मबंधूस, फारतर काय पण त्यांच्या सावलीस देखील, अस्पृश्य मानावयाचे; असले गाढवाचे गोंधळ अद्वैतवादी आद्य शंकराचार्यंच्या शिष्टत्वांत धन्यता मिरविणा-या आमच्या समाजांत केवळ ह्या भिक्षुकशाहीच्या बंडामुळेंच उत्पन्न झाले आहेत. हे कृत्रिम भेद मोडून काढा, कोणालाहि अस्पृश्य मानूं नका, कामना सिद्धीची लालूच दाखवून तीर्थ यात्रा, व्रतवैकल्यें, श्राद्घपक्ष इत्यादिकांच्या फे-यांत भोळ्या समाजाला पाडूं नका; वेद ईश्वरप्रणित असोत किंवा मनुष्यप्रणित असोत, इतर ग्रंथाप्रमाणें ईश्वराच्या सर्व लेकरांची अखिल मनुष्य जातीची, त्यांवर सारखीच सत्ता आहे; आपली जात तेवढी श्रेष्ठ आणि तिलाच वेदपठणाचा अधिकार असें