भिक्षुकशाहीचे बंड: Page 3 of 94

अनुरागी बनून सकाम कर्ममार्गाला आणि केवळ ब्राम्हचारांना धर्म धर्म म्हणून उराशीं कवटाळून बसणारा खास झाला नसता ! ह्या नंतर ह्या भिक्षुकशाहीच्या बंडाला शह देणारे धर्मवीर म्हणजे रामानंद, चैतन्य, कबीर आणि ज्ञानेश्वरादि महाराष्ट्रीय संतच होत !

आजपर्यंत भिक्षुकशाहीनें सातकुलपांत दडपून ठेविलेले संस्कृत ग्रंथभाण्डार यांनी खुलें करुन आपआपल्या देशीभाषेच्या द्वारे तें आचांडाळ ब्राम्हण वर्गांस वाटून दिलें. आणि हें भाण्डार देवाच्या घरचें आहे, एकट्या भिक्षुकशाहीची मालकी त्यावर नाहीं असें जगजाहीर करून बंडखोरांनीं त्या ग्रंथभांडारावर आजपर्यंत गाजविलेल्या एकमुखी सत्तेचा जोमकस भाषेंत निषेध केला. भिक्षुकशाहीनें त्यांचा बंडास शह देऊन, जन्माच्या पायावर उभारलेल्या जातिभेदाचा आणि मानवी समाजात ह्या जातिभेदामुळें दृढमूल झालेल्या विषमभावाचा धिक्कार करणा-या ह्या सत्पुरुषांचा कसाकसा छळ केला. तें आमच्या वाचकांस आम्हीं आज नव्यानें सांगितले पाहिजे असें नाही. एकनाथाच्या उपदेशानें तर ह्या बंडखोरांची फारच धांदल उडविली. पैठण म्हणजे त्यावेळेच्या बंडखोरांचा पांजरपोळ. तेथलेच भिक्षुक जेव्हा सकामकर्मे नाचारती कोणी । आमुची मिळकत बुडविली । असें म्हणून एकनाथांच्या नावानें खडे फोडूं लागले आणि त्याला आपला ‘दावेदार’ म्हणू लागले, तेव्हा इतर ठिकाणच्या बंडखोरांची दशा काय विचारावी । इतकें झाले तरी ह्या बहाद्दरांनी ज्ञानेश्वरादि भांवडांप्रमाणें एकनाथांचाहि छळ करावयास काही कमी केले नाहीं. यूरोपांतल्या भिक्षुकशाहीप्रमाणें आमच्या देशांतल्या धर्मोद्घारकांना आमच्या देशांतील भिक्षुकशाहीने जाळून किंवा चिणून ठार केलें नाहीं इतकेच; * (* श्री.टिपणीसांच्या या शंकेच्या निरसनार्थ त्यांनी व वाचकांनी ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास पृ-१८६-१७७ व प्रस्तुत पुस्तकांतील पृ-४२ वरचा खुलासा अवश्य वाचावा)बाकी कोणावर पूर्ण बहिष्कार घालुन, तर कोणाच्या अंगावर थुंकून कोणाला मार झोड करुन, कोणाचे ग्रंथ बुडवून त्यांनीं त्यांचा दावा पूरा साधला यांत कांही शंका नाहीं. रामदासांची गोष्ट या उपरिनिर्दिष्ट संतापेक्षां बरीच निराळी होती. त्यांनीं कर्ममार्गाला बरेंच उचलून धरिलें आणि जन्मपात्र ब्राम्हणाला इतरांपेक्षां वरिष्ठ ठरविलें.वारकरी संप्रदायात रामदासांना विशेष मान नसण्याचें आणि भिक्षुकवर्गांकडून त्यांस धन्यवाद मिळण्याचें कारण हेच असावें असें आम्हाला वाटतें. गेल्या शतकांत राजा राममोहनराय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्रसेन, महर्षि देवेंद्रनाथ टागोर, पंडित दयानंदसरस्वती, ज्योतीराव फुले, लोकहितवादी—गोपाळराव देशमुख वगैरे थोर विभूतींनीं ह्या बंडाच्या नाड्या ब-याच ठेंचून टाकिल्या. या महात्म्यांचांहि आमच्या भिक्षुकशाहीनें कांही कमी छळ केला असें नाही. स्वामी दयानंद पुण्यास गेल्यावेळीं ह्या बंडखोरांनी आणि त्यांच्या बहिष्कार शास्त्रात घाबरून त्यांच्या निशाणाचा आश्रय करणा-या नामर्दांनीं त्यांचे कसेकसे धिंडवडे केले आणि आज त्यांचेच पुत्रपौत्र स्वामीजींच्या कट्ट्या शिष्याच्या कशा मिरवणुकी काढीत असतात, ह्या गोष्टी आज सर्वांस महषूर आसल्यामुळे येथें त्यांचे विशेष विवेचन करीत नाहिं. ज्योतीराव फुले आणि लोकहितवादी देशमुख यांच्यावर हल्ले करून भिक्षुकशाहीची तळी उचलून धरण्याचा कार्यांत प्रतिभाशाली जोमदार लेखक कै.विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीं आपली अर्धी अधिक हयात खर्ची घातली. आता काळ बदललेला आहे. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार मोठ्या नेटानें जरी नाही तरी सर्वत्र होऊ लागला आहे. दळणवळणाचीं साधनें वाढून लोक त्यांचा उपयोग जारीनें करीत असल्यामुळें, आमची कूपमंडूक वृत्ति आतां अस्तंगत होऊ लागली आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळें, भोळसट कल्पनांना कायमचा तिळांजळी मिळण्याचा समय नजीक येऊन ठेपला आहे. पुराणें. स्तोत्रें, महात्म्यें आणि व्रतकथा यांचा फोलकटणा आता जनतेच्या निदर्शनास येऊ लागला आहे. अशा वेळी लोकमान्य टिलकांसारख्या विद्वानाने जरी ख्रिस्त्यांच्या हाताचा चहा घेण्यांत आणि पुनर्विवाहाच्या प्रसंगी पानसुपारीला जाण्यांत पातक नाही असें ठरविण्याकरितां शंकराचार्यांच्या प्रतिनिधी समोर आरोपी म्हणून उभे राहून आणि आपल्या बचावाकरितां धर्मग्रंथाचे शेंकडों आधार त्यांच्यापुढें मांडून अथवा देशाला स्वराज्य मिळविण्याकरितां केलेल्या जलप्रवासाबद्दल प्रत्यक्ष प्रायश्यित घेऊन, पर्यायानें बंडखोर भिक्षुकशाहीचें महत्व कितीहि वाढविलें असलें, तरी यापुढें अज्ञानांध:काराबरोबरच भिक्षुकशाहीच्या बंडाचाहि नायनाट झाल्यावांचून खास रहाणार नाहीं. रा. ठाकरे य़ांनी आपल्या प्रस्तुत पुस्तकाच्या १०० व्या पृष्ठावर कै. टिळकांच्या प्रायश्चित्ताच्या बाबतींत निस्पृहपणानें टीका केल्याबद्दल महाराष्ट्र—साहित्यकाराच्या स्पष्टोत्कीची तारीफ केली आहे. प्रस्तावना लिहण्याचें