भिक्षुकशाहीचे बंड: Page 11 of 94

पक्के माहीत आहे कीं Old order changeth giving place to new . “जुनी पद्धति बदलुनि जाते नवीस जागा द्याया. “ आता मानवी प्रवृत्ति पहा. ही स्वत:स फार शहाणी समजते. हिला आपल्या दूरदृष्टीची घमेड फार. भूत वर्तमान व भविष्य या तीनहि काळांच्या नाकांत माझ्या एकमार्गी धोरणाची वेसण घालून मी त्यांना वाटेल तशी नाचवीन किंवा वाटेल तिकडे वळवीन, असा तिला मोठा आत्मविश्वास वाटतो. भूतकाळाचा आत्मा वर्तमान काळाच्या देंहात घालून त्याला भविष्यपुराणें सांगण्यास भाग पाडण्याची शक्ति माझ्यामध्यें आहें, असें तिला निश्चयपूर्वक वाटतें. मानवी प्रवृत्ति प्रगमनशिलतेचा मोठा आंव आणते खरी, परंतु जन्मदारभ्य तिच्या गळ्यांत अडकलेले. परंपरा—प्रियतेचें लोढणें आज गेल्या पांच सहा हजार वर्षांत तिला काढून टांकतां आलें नाहीं, ही एकच गोष्ट तिच्या पंगूपणाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. परंपरा ! होय परंपराच ! ! या परंपरेच्या केत्या अभिमानानें मानवी प्रवृत्तीची जगाच्या इतिहासांत जितकी बदनामी झाली आहे, तितकी तिच्या इतर कोणत्याही दुष्कृत्यांनी झालेली नाही. काळाच्या धांवत्या गतीबरोबर आणि निसर्गप्रवृत्तीच्या अप्रतिहात फोंफावत जाणा-या सिद्धांतांबरोबर आपल्या आचाराविचारांची गति ठेवण्याची दूरदृष्टी – नव्हे, लायकीच – मानवी प्रवृत्तींत नसल्यामुळें, तिचा इतिहास नेहमींच कालव्यतित्यानंा चिघळत असतो. मानवी प्रवृत्तीची ही कालव्यतितता किंवा पुराणप्रियता मुख्यत्वें हिंदुस्थानात व विशेषत: हिंदूत जशी ठळकपणें पहावयास मिळते, तशी जगांत इतरत्र कोठेंहि मिळणार नाहीं. या एका पुराणप्रियतेमुळें हिंदुस्थानाचें आणि हिंदूंचें जितकें नुकसान झालेंलें आहें. तितकें परचक्रांनींहि केलेलें नाहीं. आजला हिंदूं लोकांची जी काहीं विशिष्ट नष्टाचर्य्यावस्था आहे, तिच्या मुळांशी याच एका दोषाचें बीज पडलेले आहे; आणि जोपर्यंत या बीजाचा बीमोड होणार नाहीं, तो पर्यत हिंदूंचा जगाच्या चढांओढींत टिकावही लागणार नाहीं. परंपरेचा अभिमान निराळा आणि पुराणप्रियतेचा ताठा निराळा. पहिल्यांत जेवढी सात्विक शुद्धता हातीं लागते, त्याचा दसपट तामसी घाण दुस-यांत आढळते. पुराणप्रियतेंत परंपरेच्या अभिमानाचें मिठ पडलेले असतें, ही गोष्ट खरी; परंतु पुराणप्रियतेच्या तामसी तत्वांत त्या मिठाचा सात्विकपणा तेव्हांच विरघळून नाहींसा होतो. परंपरेचा अभिमान ऐतिहासिक महत्त्वाच्या दृष्टीनें कितीहि क्षम्य आणि प्रशंसनीय असला, तथापि त्यांत पुराणप्रियतेच्या हट्टीपणाची खाजकुहिली पडतांच व्यावहारीक सृष्टींत तो अक्षम्य, निंद्य आणि हानीकारक ठरल्याशिवाय कधींहि रहात नाहीं. परंपरेचा ताठा आणि अनुवंशिक संस्काराची कल्पना, हीं दोन खुळें कोणत्याहि पराक्रमी राष्ट्राची शक्ती खच्ची करुन टांकण्यास पुरेशी आहेत. पुराणप्रियता ऊर्फ परंपरेचा फाजील ताठा म्हणजे काळाच्या ओघाबरोबर चालण्याची नाखुषी आणि अनुवंशिक संस्काराची कल्पना म्हणजे शुद्ध तर्काची कादंबरी पुराणप्रियता म्हणजे नव्या घोड्यावर जुनाच खोगीर बळजबरीनें लादण्याचा अट्टाहास आणि अनुवंशिकत्वाचे थेर म्हणजे जुन्या नव्या गोष्टी अदूर दृष्टीनें एकाच ठरीव साच्यांत दडपिण्याचा मूर्खपणा. राष्ट्राच्या किंवा व्यक्तीच्या वयामानाचें प्रमाण लक्षांत न घेता पुराणप्रियता त्याला बोंडल्याबोंडल्यानेंच दूध पाजण्याचा हट्ट धरते; तर अनुवंशिक संस्कार—कल्पनेची एकाक्ष राक्षसी सांचेवजा गुणधर्माच्या काल्पनिक स्थिरतेच्या मृगजळावरच तहान भागविण्याची मानवी समाजावर बळजबरी करते. (२) हें कांहीहि असलें तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की निसर्गप्रवृत्ति आणि मानवी प्रवृत्ति यांतल्या विरोधांतूनच जगाच्या इतिहासाची उत्पत्ति झाली आहे, होत आहे आणि पुढेंहि होतच राहील. या विरोधाच्या झटापटींनींच मानवी सृष्टीचा इतिहास रंगून निघालेला आहे, आणि या विरोधांतील विरोध तत्व काढून टांकून त्यांत एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न जरी ज्ञानी जन करीत असले, तरी इतिहासाची सारी रुचि या विरोधानेंच स्वादिष्ट बनविली आहे. हें मात्र कबूल करणें प्राप्त आहे. निसर्गाची कांटेतोल प्रगमनशीलता आणि मानवांची दुराग्रही अप्रगमनशीलता या दोन गोष्टी कितीही परस्परविरोधी असल्या, तरी जीवसृष्टीच्या इतिहासाचा आत्मा या भेदाच्या विरोधानेंच चैतन्यपूर्ण केलेला असतो. जीवसृष्टी अत्यंत चलनप्रिय आहे आणि मनुष्यप्राणी हा जात्याच रुचिवैचित्र्याचा मोठा भोक्ता आहे. तथापि त्याचें रुचिवैचित्र्य,त्याची अमर्यादित महत्वाकांक्षा आणि सा-या ज्ञात सृष्टीवर हुकमत चालविण्याची त्याची कधींहि माघार न घेणारी निश्चयी वृत्ति, या सर्वावर ईश्वरदत्त एका देणगीचा