भिक्षुकशाहीचे बंड: Page 2 of 94

त्याच्या प्रभाव सोरटी सोमनाथापासून पर्वतीच्या रमण्यापर्यंत सर्वत्र निदर्शनास येतो. प्रस्तुत काळीं तर जगज्जेत्या म्हणविणा-या इंग्रज बहाद्दुरांना देखिल ‘बाप दाखवा नाहीं तर श्राद्घ करा’ म्हणून छातीठोक सांगणा-या लोकमान्य पुढा-याच्या प्रायश्चितावरुन त्याचें अस्तित्व जितके प्रत्ययास येतें तितकें तें दुस-या कशावरूनहि येत नाही !

सारांक्ष भिक्षुकशाहीचे बंड वेदकाळापासून आज तागायत अव्याहतपणें चाललें आहे आणि यापुढे, भविष्यकाळीं देखील, जोपर्यंत जनता लोकेषणा, वित्तेषणा इत्यादि ईर्षणांच्या अथवा वासनांच्या वा-याने झुलत राहील तों पर्यंत भिक्षुकशाहीचे बंडाचे निशाण त्याच वा-याच्या सोसाट्यानें जनतेच्या छातीवर सारखे फडफवत राहील. जनतेच्या छातीवर फडकवणारें हें बंडाचें निशाण, तिच्या छातीत अपमतलबी लोकांकडून निदर्यपणें भोंसकण्यांत आलेला हा विषारी जांबिया, काढून टाकण्याचे आजवर अनेकांनी अनेक वेळां प्रयत्न केले. पण ह्या बंडखोरांनी प्रथम श्रुतीच्या अमृततुल्योदकांत विष कालवून चर्तुवर्ण पद्घतीला वेदांचा आधार दिला आणि आपली उत्पत्ति विराटपुरुषाच्या मुखापासून झाली असें ठरवून आपलें श्रेष्ठत्व आणि इतरांचे कनिष्टत्व प्रस्थापित केलें. अर्थात् श्रुतीलाच कवटाळुन बंड मोडणारांचा हा हल्ला व्हावा तसा यशस्वी झाला नाहीं. पुढें त्यां बंडाचे नेतृत्व जैमिनीच्या हातीं गेले. आणि त्यानें कर्ममार्गाचें थोतांड माजवून सुखाला लालचावलेल्या मनुष्यजातीला आपल्या काबूंत आणिलें व भिक्षुकशाहीला चरण्य़ाकरतां एक अत्यंत विस्तृत असें कुरण निर्माण केलें ! कापिल महामुनीनें ह्या कुरणाची जाळपोळ उडवून सांख्यमताचा प्रसार केला. पण पुढे त्याला नास्तिकांत दडपून समाजावर चरण्याचा आपला हक्क हे बंडखोरव यथास्थित गाजवूं लागले. बुद्घानें त्यांना चांगलाच हात दाखविला पण तोहि हिंदुस्थानच्या कर्मभूमींत नास्तिकच ठरला ! येथें ब्राह्मणाला दिलेले दान जर परलोकीं मृत पितरांना पोंचतें, तर प्रवासात कांहींएक बरोबर घेऊन न जाण्याविषयीं वडिलांना विनंति करून पुत्रानें रोजच्या रोज त्यांच्या नावें ब्राह्मणभोजन घालावें म्हणजे त्यांची खाणावळ शोधण्याची आणि जवळ अवश्य त्या वस्तु बाळगण्याची दगदग चुकेल असें म्हणून श्राद्धादिकांची टेर उडविणा-या आणि ‘भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कुत :’ असा नि: संदिग्ध प्रश्न विचारणा-या चार्वाकाचीहि ह्या भिक्षुकांनीं तीच वाट लावली. पुढें या बंडखोरांचे नायकत्व मंडणमिश्राकडे आलें. सकाम कर्ममार्ग, हें ह्या बंडखोर भिक्षुकशाहीचें निशाण, तें मंडणमिश्रानें आपल्या हातांत घेतलें आणि त्याच्या घरच्या शुकारारिका देखील आपल्या मधुर स्वरानें ह्या निशाणाचीं स्तुतिस्तोत्रें गाऊं लागल्या !

हें सर्व यथास्थित झालें. पण लवकरच भिक्षुकशाहीच्या दुर्दैवानें आद्य शंकराचार्य उदयाला आले. त्यांनी ब्रह्मचर्यानंतर एकदम संन्यास घेऊन आश्रमधर्माचा आणि संन्याशाला वर्णावर्णाचा विधिनिषेध नाहीं असे सांगून वर्णधर्माचा फोलपणा जनतेच्या निदर्शनास आणिला आणि मंडणमिश्राशीं भिक्षुकशाहीच्या बंडाच्या त्या पुढा-याशीं वादविवाद करुन त्याच्या त्या सकामकर्मरूपी निशाणाच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या व उपनिषत्प्रणित ज्ञानमार्गाचे पुनरुज्जीवन केलें, मंडणमिश्राला संन्यास देऊन सुरेश्वरायाचार्य बनविले आणि ह्या भिक्षुकशाहीच्या बंडाचें अखिल मानवजातीस चौ-यांशींच्या फे-यांत ढकलणारें हें निशाण, आर्यावर्तांत पुनश्य कोठेंहि फडकावलें जाऊ नये म्हणून त्याचा चारहि बाजूस चार धर्मपीठें स्थापन करून त्यांपैकी एका पीठावर आचार्य म्हणून त्याची योजना केली ! पण आद्य शंकराचार्यानीं केलेली ही योजना त्यांच्या पश्चात् फार दिवस टिकली नाही. वेदांतसूत्रें, उपनिषदें आणि भगवदगीता ह्या प्रमुख धर्मग्रंथाचे त्यानीं लावलेले अद्वैतपर आणि त्यागपर अर्थ, त्यांतुनच विशिष्टाद्वैत आणि द्वैतपर अर्थ, निर्माण करणारे नवे नवे आचार्य निर्माण होऊन शंकराचार्यांच्या पश्चात् थोडक्याच दिवसात मागे पडलें ह्या आचार्यानीं आपली स्वतंत्र पीठें निर्माण केलीं आणि त्यांच्या अनुयायी वर्गहि एकसारखा वाढत चालला ! शंकराचार्यांच्या पीठांची उडालेली ही तारांबळ पाहून पुन: बंडखोर भिक्षुकांनी आपलें डोकें वर उचलेले आणि तत्कालिन सर्व पीठाधिस्थित आचार्यांच्या वेसणीं आपल्या हातांत घेऊन, ते त्यांना हवे तसे नाचवूं लागले. रा. ठाकरे आपल्या प्रस्तुत पुस्तकांत एके ठिकाणीं म्हणतात त्याप्रमाणे हे पीठस्थ आचार्य केवळ पिठाचे पुतळे बनले आणि भिक्षुकवर्ग आपल्या इच्छेप्रमाणें त्यांना घटकेंत मारुती (माकड) बनवूं लागला. असें नसतें तर त्यागी आद्य शंकराचार्यांचा अनुयायी म्हणविणारा सर्व हिंदु समाज, पूर्णपणें