भिक्षुकशाहीचे बंड

प्रबोधनकारांच्या वज्रप्रहार ग्रंथमालेतील हा महत्त्वाचा ग्रंथ. सामाजिक इतिहास नव्याने मांडण्याची त्यांची खासियत या पुस्तकातूनही स्पष्टपणे दिसून येते. नवा विचार, ठाम मते, खंडीभर पुरावे आणि रोखठोक भाषा ही याची वैशिष्ट्ये मानायला हवीत.

 

खंड पाचवा- भिक्षुकशाहिचे बंड

।। सत्यात् नास्ति परोधर्म ।।

भिक्षुकशाहीचे बण्ड वज्रप्रहार ग्रंथमालेचा हा पहिला ग्रंथ केशव सीताराम ठाकरे वक्तृत्वशास्त्र, कोदण्डाचा टणत्कार, कुमारीकांचे शाप ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास, लाईफ अॅन्ड मिशन ऑफ रामदास,हिन्दु धर्माचें दिव्य, इ. ग्रंथाचे कर्ते यांनी लिहून प्रसिध्द केला.

किंमत फक्त दोन रुपये. पुस्तकें मागविण्याचा पत्ता : केशव सीताराम ठाकरे वज्रप्रहार कार्यालय, २०, मिरांडाची चाळ दादर - मुंबई.

प्रत्येक प्रतीवर ग्रंथकाराची इंग्रजी सही पाहून ग्राहकांनी ग्रंथ घ्यावा. सही नसलेली प्रत चोरीची समजून घेऊ नये. हें पुस्तक मुंब-भायखळा –परेलरोड, घर नंबर ३५४४ तत्वविवेचक छापखान्यात रां विठ्ठल तानाजी मोडक यांनी छापिलें, तें रा. केशव सीताराम ठाकरे यांनी २० मिरांडाची चाळ मुंबई नं. १४ येथें प्रसिद्ध केले. ALL RIGHT RESEREVSD.

प्रस्तावना

पुस्तक म्हटलें म्हणजे त्याला प्रस्तावना पाहिजे आणि शक्य असेल तर ती पुस्तककर्त्यापेक्षा कोणीतरी निराळ्या लेखकानें लिहलेली असली पाहिजे असा समज अलीकडे सर्वत्र अगदी दृढमूल झालेला दिसतो ; किंबहुना अशी अगदीं परंपराच पडल्या सारखी दिसते. रा. केशवराव ठाकरे चांगले वाचनमग्न असून महाराष्ट्रभाषेला हवी तशी वळविण्याचें सामर्थ्य त्यांच्या लेखणीच्या आंगी आहे. असें असतां त्यांच्या सारख्याच्या पुस्तकालाहि निराळा प्रस्तावनालेखक लागावा याचें कारण तरी हा समजच असावा असें वाटतें आणि रा. ठाकरे जरी आपल्या ह्या पुस्तकांत परंपरेच्या भक्तांची निदा करितात तरी आपल्या पुस्तकाला दुसरा प्रस्तावनलेखक शोधून, प्रत्यक्षपणें ह्या नव्या परंपरेची तळी उचलण्यालाच कारणीभूत होतात हें पाहून मानवी प्राण्याच्या परंपराप्रियतेबद्दल कौतुक वाटल्यावांचुन राहात नाहीं. लेखक ह्या नात्यानें रा. ठाक-यांचा आणि माझा परिचय होऊन एका तपापेक्षां अधिक काळ लोटला. त्यांचे विचारपरिप्लुत ग्रंथांचे वाचन जितके दांडगें आहे. तितकेंच तें लक्ष्यपूर्वक झालेलें आहे. त्यांच्या अंत:करणाची तळमळ त्यांच्या लेखणीच्या ठिकाणी बाणांचें आणि वज्राचे सामर्थ्य उत्पन्न करीत असल्यामुळेंच त्यांचा कोदंडाचा टणत्कार आज अखिल महाराष्ट्राच्या द-याखो-या दुमदुमून टाकण्यास समर्थ झाला आहे. आतां त्यांचा हा वज्रप्रहार आपल्या आघातानें, धर्माच्या नांवाखाली स्वत:चे स्तोम माजविणा-या भिक्षुकशाहीच्या काळजाचा थरकाप उडविणार आहे. वस्तुस्थिति ही अशी असल्यामुळें रा. ठाक-यांच्या पुस्तकाला प्रस्तावनेची-निदान माझ्या तरी प्रस्तावनेची-मुळीच आवश्यकता नव्हती. पण अतिपरिचय असूनहि त्यांच्या शब्दांची अवज्ञा मला नाहीं. मीहि ह्या पंरपरेच्या भोव-यात सांपडलो आणि रा. केशवरावांच्या शब्दाला मान देऊन निमूटपणे लहानशी प्रस्तावना लिहली.

‘भिक्षुकशाहीचे बंड’ हिंदु समाजातच आहे असे नाहीं. परमेश्वर जसा अखिलचराचर व्यापक आहे, तो जेथें नाही असें ठिकाणच जसें कोठें नाहीं. तसे ह्या भिक्षुकशाहिचे बंडहि सर्वत्र आहे, तें जसे हिंदूमध्यें आहे तसेच पारशांमध्ये आणि मुसलमानांमध्येहि आहें. तें खिस्त्यांत आहे, जैनात आहे. आणि फार तर काय पण नास्तिक म्हणुन मानिल्या गेलेल्या बौद्धातहि तें आहें. ‘भिक्षुकशाहीचे बंड’ जसे हिंदुस्थानांत आहें तसेंच आज सा-या जगाने सुधारणेच्या शिखरावर नेऊन बसविलेल्या यूरोपांत आणि अमेरिकेंतहि तें आहे. जगाच्या पाठीवर असा एकहि समाज नाहीं, ह्या पृथ्वीवर असा एकहि धर्म नाहीं. आणि ह्या भूपृष्टावर असा एकहि देश नाहीं कीं जेथे भिक्षुकशाहीचे बंड नाहीं. भिक्षुकशाहिच्या ह्या बंडाला जशी स्थलाची मर्यादा नाहीं-तें जसें मर्यादाबाधित आहे—तशीच त्याला कालाची मर्यादा नसल्यामुळें तें त्रिकालाबाधित आहे. ज्या परमेश्वराच्या मुखातूंन वेद निर्माण झाले, त्याच परमेश्वराच्या किंवा त्याच्या वंशजांच्या हातानें ह्या बंडाचा पाया खोदला गेला असल्यामुळें वेदांइतकें जरी नसलें तरी तें अनादीच आहे असें मानण्याचा प्रघात पडलेला आहे. ब्राह्मणकाळीं यज्ञयागादि आणि पुराणकाळीं व्रत वैकल्यें आणि तीर्थयात्रादि दगड धोंड्यांनी, ह्या बंडाचे जोतें तयार झालें असल्यामुळें प्राचीन काळांतील त्यांचे अस्तित्व चांगलेच भासमान होतें. इतिहास—काळांत तर