ग्रामण्यांचा इतिहास : Page 10 of 132

अंधाराशिवाय आणखी कांहीं दिसेल, असा आम्हांस भरवंसा वाटत नाहीं. चां.का.प्रभू समाज संख्येच्या मानानें जितका लहान आहे, त्यापेक्षां त्याच्या पराक्रमाचा इतिहास अत्यंत विस्तृत आणि मोठा आहे. अल्पसंख्यांक समाजाने राष्ट्राच्या मोठमोठया उलाढालीच्या इतिहासांत प्रामुक्यानें झळकत राहिल्याचें उदाहरण निदान भरतखंडाच्या इतिहासांत तरी याच समाजाचें होय. शिवावतारापूर्वीच्या चारदोन शतकांचा इतिहास पाहिला तरी त्याच्याहि उपलब्ध विस्कळीत आणि संकीर्ण पृष्टांत चां.कां.प्रभूंची राजकीय क्षेत्रातींल कर्तबगारी बिनचूक आढळून आल्याशिवाय राहत नाहीं. संख्येच्या प्रचंडत्वानें पूर्वी व आतांहि जगाची छाति दडपून टाकणारे असे अनेक समाज आजलाहि दाखवितां येतील कीं ज्यांच्या प्राचीन इतिहासाचें संशोधन करु लागल्यास कित्येक शतकांची पानें जरी डोळे फाडफाडून चाळलीं तरी त्या संबंधी एक अक्षरसुध्दं कोठें धड सांपडण्याची मारमार पडते आणि या दृष्टिनें विचार केला तर चां.का.प्रभू समाज हा लोकसंख्येच्या दृह्िटनें अल्पतम असतांहि त्याचा पराक्रम प्रत्येक स्वकीय किंवा परकीय ''शाही'' च्या इतिहासांत प्रामुख्यानें दृग्गोच्चर व्हावा ही एकच गोष्ट त्याच्या राष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. 13. चां.का.प्रभूंचा प्राचीन इतिहास आजलाहि बराच उपलब्ध आहे; परंतु तो सांप्रत संकीर्णावस्थेंत असल्यामुळें आणि आधुनिक इतिहासकारांनी तो अर्वाचीन पध्दतींत संकलित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न न केल्यामुळें, खुद्द या ज्ञातींतील एखाद्या जाडया इतिहासशास्रास जर प्रश्न केला कीं 'तुमचा इतिहास काय व कोठे आहे तो दाखवा पाहूं?' तर त्याला देखिल एका विवक्षित 'स्टँडर्ड' ग्रंथाकडे बोट दाखविता येत नाहीं. काही मजकूर या पुस्तकांत, त्याच्या पुढच्या दुसऱ्या पुस्तकांत, आणखी राहिला तो तिसऱ्या पुस्तकांत, अशा स्थितींत तो इतिहास पांगलेला आहे. बरें, ज्यांनीं स्वज्ञातीच्या इतिहासाचा ठाव पाहण्याचा कांहीं यत्न केला, त्यांना 'मायथॉलजी'च्या भोळसट प्रेमानें इतके कांहीं ग्रस्त केलें कीं त्यांच्या विवेचनानें जी एकदां ब्रह्मदेवाच्या नाभिकमलाच्या मुळाशीं दडी मारली, तेथून त्यांची धडपणें अझूनहि सुटका झाल्याचें दिसत नाहीं. पौराणिक काथ्याकुटाच्या सांबाऱ्याचे भुरके मारण्यांत ही इतिहासकार मंडळी एकदां गुंग झाली कीं मग त्यांना ऐतिहासिक सृष्टींतील घडामोडीकडे दृष्टि फेंकायला फुरसदच रहातानाहीं; आणि एकदां कां ही पुराणप्रिय मंडळी शब्दांच्या व्युत्पत्यांचा कीस काढूं लागली कीं ''हैहय कुलोत्पन्न क्षत्रिय'' म्हणजे 'घोडयांचे वंशज' येथपर्यंतच त्यांची मजल न जातां श्रीविष्णूला एखाद्या घोडयाचा अवतार घ्यावयास भाग पाडून मातोश्री लक्ष्मीलाहि घोडी बनविण्यास चुकत नाहींत. इतिहास-संशोधनाची धमक असूनसुध्दं आमच्यांतील पुष्कळ चांगले चांगले संशोधक या पुराणप्रियतेच्या फाजील आवडीमुळें इतिहास-सेवनाच्या बाबतींत कुचकामाचे ठरले आहेत, यापासून आमच्या आधुनिक विद्वनानीं पुष्कळ धडा घेण्यासारखा आहे. 14. आजपर्यंत ऐतिहासिक संशोधनाकडे दुर्लक्ष करुन पुराणांतल्या वंशावळी आणि भाकडकथांचा कीस काढण्याकडे आमच्यांतीक बऱ्याच विद्वनांची पुराणप्रियता फाजील प्रमाणांत गुंतल्यामुळें मध्यंतींच्या अनेक शतकांतील इतिहासाचे दुव्वे आज निष्काळजीपणाच्या अंधारांत हुडकणें फार बिकट होऊन राहिले आहें. पाश्चिमात्या शोधक आणि मेहनती युरोपियन इतिहासकारांनी आणि फिरस्त्यांनी जर या विस्कळीत दुव्यांची नीट जोपासना केली नसती, तर आजला चां.का.प्रभूँच्या प्राचिन इतिहासाचें तोंड उजळ करण्याची कोणत्याहि महत्वाकांक्षी अर्वाचीन इतिहासकाराला धडगतच नव्हती. आधुनिक चिकित्सक, संशयखोर आणि मनस्वी मार्मिक विचक्षण वृत्तीला निरुत्तर करण्याच्या कामीं पौराणिक विवेचनाची पुराणांतीलीं वांगी कितपत उपयोगी पडतील, याचा आमच्या 19व्या व 20व्या शतकांतील विद्वान पुराणाभिमान्यांनीं किंचित् पोक्त विचार करावयास नको होता का? या बाबतींत त्यांच्या हातून इतिहासाची जी हेळसांड झाली, ती भरुन यावयास त्यांची पौराणिक काथ्याकुटांची बाडें काडीमात्र उपयोगीं पडत नाहींत. अर्थात् त्यांच्या साऱ्या ग्रंथलेखनाची किंमत आजच्या पिढीच्या दृष्टिनें मातीमोलच ठरत आहे. याबद्दल कोणाहि सह्रदयांस खचित वाईट वाटल्याशिवाय राहणार नाहीं. स्वज्ञातीच्या इतिहासाकडे असें दुर्लक्ष झाल्यामुळें आणि प्राचीन इतिहासाचे सर्व दुव्वे इतस्तत: अनेक ग्रंथात विखरुन पडल्यामुलें, आज आमच्या हाडवैऱ्यांना आणि हितशत्रूंना आमच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासावर वाटेल घाणेरडे आरोप करण्यास बरेच फावलें आहे! आणि याबद्दल जर खरोखर कोणी जबाबदार असतील तर आमचेच आधुनिक चां.का.प्रभू इतिहासकार होत, यांत मुळींच संशय नाहीं. 15.