ग्रामण्यांचा इतिहास : Page 7 of 132

इतिहास हाच एक गुरु होय, यांत मुळींच संशय नाही. 9. ग्रामण्यांचा इतिहास प्रसिध्द झाल्यास जातिभेदाला विनाकारण चेतना येईल आणि राष्ट्रीय कामगितीत सर्व समाजांचा मिळावा तसा एकोपा मिळणार नाही, असा दुसरा आक्षेप काढण्यांत येतो. हा आक्षेप सयुक्तिकतेच्या बाळशाने जरी गोंडस दिसत असला तरी वास्तविक तो तितका सशक्त नाहीं. जातिभेद असणारच आणि तो असावा हें मत नवीन नसून पुष्कळ विचारवंतांनी हिंदु समाजांचे सूक्ष्मरीत्या परिक्षण करुन हा सिध्दंत काढला आहे. जातिभेद-म्हणजे चतुवर्णव्यवस्थेमुळें निर्माण झालेल्या विविध व्यवसायी समाज समाजांतील सामाजिक आणि धार्मिक बंधनांची जाणीव-ही नष्ट होणें जवळजवळ अशक्य कोटींतील आहे, असा आज तरी सर्वसाधारण ग्रह आहे. जातिमत्सर मात्र मुळींच नसावा आणि तो अलीकडे नष्ट होण्याच्या पंथाला लागलेला आहे, ही फार समाधानाची गोष्ट होय. जातिभेदाबरोबरच जातिमत्सरानेहि आपलें बिऱ्हाड बाजलें कायमचें ठेवावें, हें कोणीही मान्य करणार नाहीं. तथापि पुराणप्रियतेच्या फाजील अभिमानाच्या भरीं भरुन जातिमत्सराच्या होळींत येन केन प्रकारेण तेल ओतणारे कित्येक राजवाडे धूमकेतूप्रमाणें मधूनमधून उपटतातच! जातिमत्सराची मुळें जातिभेदाइतकीं खोलवर गेलेलीं नाहींत, हें तरी एक दु:खात सुख म्हटलें पाहिजें. जातिमत्सराचा इतिहास अगदी अर्वाचीन आहे. प्राचीनकाळच्या चातुर्वण्य व्यवस्थेंत चुरस नव्हती अशांतला प्रश्न नाही, चुरस होती. स्पर्धा सारखी चालू होती आणि परस्पर समाजांत अनेक युध्देहि झालीं. परंतु ह्या स्पर्धेचा पाया ''दुष्मन् चाहि है लेकिन् वोभि दाना दुष्मन चाहि है'' या तत्वावरचा होता. म्हणून चारहि वर्णातील व्यक्तिनां आपापल्या वैयक्तिक संस्कृतीच्या जोरावर वाटेल त्या वर्णाच्या व्यक्तिबरोबर पराक्रमाची वरचढ करुन त्याचा दर्जा पटकावण्याची संधि मिळत असे; आणि याबद्दल कोणीहि त्या बहाद्दराचा उपहास न करितां सर्व जगाकडून त्याच्या उज्ज्वल संस्कृतीचा सकौतुक गौरवचं केला जात असे. त्यावेळच्या वर्णाभिमानाची कसोटी वैयक्तिक किंवा सामुदायिक संस्कृतीच्या परिणतेनें सिध्द होत होती. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातील प्राचीन स्पर्धेचा इतिहास या दृष्टिनें पाहिला म्हणजे सांप्रतचा जातिमत्सर हा अगदी अर्वाचीन आहे, हे सांगणे नको. कित्येक पंडित अर्वाचीन जातिमत्सर प्राचीन चतुर्वर्ण स्पर्धेचे रुपांतर आहे असें म्हणतात; परंतु ही त्यांची निव्वळ वकिली थाटाची विचारसरणी आहे असे म्हणावें लागतें. 10. ज्यावेळी एखादा समाज वर्णनीय राष्ट्राची कामगिरी करुन तद्देशीय इतिहासाला व भाटकवींना आपल्या विविध सद्गुणांचे स्तुतिपाठक बनवितो आणि जेव्हां परकीय इतिहासकारसुध्द त्या स्तुतिगायनाच्या जलशांत स्वत:च्या रसिकतेला पुनित करण्याच्या अहमहमिकेनें येऊन सामील होतात, तेव्हा सहाजीकच त्या समाजाच्या प्राचीन संस्कृतीच्या परंपरेचा शोध लावण्याची तीव्र जिज्ञासा समंजस विद्वानांत उत्पन्न होते. जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हुडकिणाऱ्या संशोधकांची संशोधन-दृष्टि दस्तऐवजी दिवटीच्या अभावीं भूतकालाच्या निबिड अंध:काराला पाहून जरी बाचकून जाते; डोळस इतिहासशास्रयांच्या कालपटलभेदक दुर्बिणी अज्ञात काळच्या तटबंदी भिंतींचा छेद करुन जरी पलिकडे जाऊ शकल्या नाहींत आणि भूतकाळाच्या अंधाराला अधिकच संशयग्रस्त करण्यासाठीं मत्सराच्या काजळीचे डोंगरच्या डोंगर जरी कोणी विश्वामित्राने मध्यंतरी आणून उभे केले, तरीसुध्द जेव्हां त्याच अज्ञात आणि काळयाकुट्ट कालपटलांतून एखादा समाज वर्तमानकालीन इतर समाजांना दिपवून टाकण्याइतक्या स्वयंभू तेजानें फोंफावत बाहेर पडतो, तेव्हां त्याच्या पराक्रमाबरोबरच त्याच्या नैसर्गिक शीलाचा आणि प्राचीन संस्कृतीचा इतिहास स्पष्ट दृग्गोचर होऊं लागतो. हा इतिहास विशेषसा दुव्वेबाज नसल्यामुळें अर्वाचीन दृष्टीला जरी किंचित् गौण भासण्याचा संभव आहे आणि आधुनिक विचक्षण पध्दतीनें जरी त्याची छाननी यथातथ्य होणें शक्य नाही-आणि कोणत्याहि प्राचिन इतिहासावर हे आक्षेप आल्याशिवाय रहातच नाहींत!- तथापि त्याच्या उपलब्ध विस्कळीत दुव्यांवरुनहि विवक्षित व्यक्तिच्या, समाजाच्या किंवा सबंध राष्ट्राच्याही तत्कालीन् शीलाबद्दल किंवा संस्कृतिबद्दल निश्चयात्मक निर्णय काढतां येणें शक्य नाहीं असे मात्र मुळीच नाहीं. या कामी पाश्चिमात्य संस्कृतीचा आणि संशोधन-प्रवृत्तीचा पूर्ण संस्कार झालेली भारतीय शोधकबुध्दि अलिकडे बरीच कुशाग्र बनलेली आहे, यांत तिळमात्र संदेह नाही. इतिहास संशोधन आणि संगोपन या दिव्य मंत्राचा गुरुपदेश जरी पश्चिम दिशेनें पूर्वेच्या कानात पुंच्कला आहे, तरी 'गुरुसे चेला सवाई' या सार्थ म्हणीचें