ग्रामण्यांचा इतिहास : Page 5 of 132

इदन्न मम'' म्हणून आपल्या द्वैतभावाची आहुती राष्ट्रकार्याच्या कुंडांत देत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांत राजकीय क्रांतीचा थयथयाट सुरु असून, वातावरणाच्या लहरी त्या कालिकानृत्याचा दणदणाट हिंदुस्थानाच्या किनाऱ्यावर हरघडी आणून आदळीत असल्यामुळे, इकडील मंडळींच्या वृत्ति चैतन्यपूर्ण होवू लागल्यास आश्चर्य तें काय? स्वयंनिर्णयासारखी सत्ययुगांतील तत्त्वें चालू कलियुगात सुध्दं अवतरलेली पाहून 'कली' चें काळें करुन त्याठिकाणी 'सत्य' शब्द कोणी घातल्यास या अदलाबदलीचा पुसट संशयसुध्दं कोणार येणार नाहीं. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे राष्ट्रीयत्वाचा खरा अर्थ हिंदुस्थानांतील यच्चावत् जनतेच्या खालच्या थरापर्यंत-कोणाला समजो या न समजो-आजकाल राष्ट्रीयत्वाचा चौघडा वाटेल त्या कोपऱ्याला कान द्या तेथून ऐकू येतच आहे. शुद्रातिशुद्रांच्याहि पंक्तिस बसायला आम्ही तयार आहोंत, असे शेकडो सह्यांचे जाहीरनामे उच्चवर्णातील (?) ब्राह्मणलोक आज फडकावीत आहेत. अशा परिस्थितीत हे तुमचे ग्रामण्याचें बंड कशाला उपस्थित करता? त्याचें आतांच काय नडले आहे? ही खाजवून खरुज काढण्यात काय हांशील आहे? अशा प्रकारचे प्रश्न आम्हांला विचारण्यांत येत आहेत व येतीलहि. प्रश्न दिसण्यात गोंडस आणि विचारक्षम दिसतात खरे. आणि ते विचारणाऱ्यांच्या सध्देतूबद्दल साशंकता धरणे हे महत्पाप आहे. परंतु विचाराणाऱ्यांनी एकंदर परिस्थितीचा करावा तितका विचार केलेला नसल्यामुळें, सद्विचारांचा झटक्यासारखे हे प्रश्न त्यांना सुचणें फारसे अस्वाभाविक नाहीं. एकतर ऐतिहासिकदृष्टया या ग्रामन्यांच्या इतिहासाचें महत्त्व या पृच्छकांना नाकबूल करुन तर चालायचेंच नाही. दिव्याच्या उजेडाच्या एतिहासाबरोबरच त्याच्या अंधाराचाहि इतिहास पुढे आला पाहिजें, हे त्यांना मान्य केल्याविना सुटकाच नाही; नाहीतर आमच्या इतिहासाचें एक अंग अर्धांगवायूनें लुलें पडलेलें आहे इतकें तरी उघडपणें संकोच न धरितां इतिहासाच्या शिरोभागीं नमूद करुन ठेवले पाहिजे! णग असला लुलापांगळा एकांगी इतिहास असला काय आणि नसला काय सारखाच!! चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींच मनावर उपदेशाचा विशेष परिणाम करितात. कॉमेडीपेक्षां ट्रॅजेडीच जास्त परिणामकारक होते. आपल्या राष्ट्रीय इतिहासांतील चांगला भाग अधिकाधिक उज्वल करणें जसें आपले कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे त्यांतले वाईट भाग आपल्या प्रत्यक्ष वर्तनाने सुधारुन त्याऐवजीं चांगल्या शतकृत्यांची भर घालणें हेंहि आपलें अनिवार्य कर्तव्यच आहे. राष्ट्राचा किंवा समाजाचा इतिहास सर्वांगसुंदर करण्याचा हाच एक मार्ग आहे; दोष लपवून सद्गुणांचाच नेहमीं पाढा वाचणें हा नव्हे! गतकालांतील सामाजिक किंवा राजकीय पातकांना चव्हाटयावर आणण्याचे नीतिधैर्य ज्या राष्ट्राला नाही, त्यानें आजनम् इतर सुधारक राष्ट्रांच्या कोंपरखळया खातच कोठेंतरी कानाकोपऱ्यांत पडून राहिलें पाहिजे. 6. वाईट गोष्टींचें उच्चाटन करण्यास कचरणारी मंडळी संस्कृतीचा महत्त्वाचा मुद्दा नीटसा लक्षांत घेत नाहींत. कोणत्याहि राष्ट्राचा, त्यांतील निरनिराळया समाजांच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा असेल तर त्या राष्ट्राच्या गुणदोषांची समप्रमाणांत छाननी झालीच पाहिजे. काळाच्या प्रवाहामुळें राष्ट्र नवीन नवीन अनुभवानें कितीहि उन्नत झालें आणि दुसऱ्या अनेक राष्ट्रांच्या निकट परिचयामुलें त्याच्या सर्व कल्पनांत कितीही क्रांती झाली, तरी त्याच्या भवितव्यतेचा ताळा पडताळून पहाण्यास त्याच्या मूळ संस्कृतीचा सर्व इतिहास नीट अवगाहन करावा लागतो. युरोप खंडातील सुधारणेचा आणि शिक्षणाचा आशिया खंडातील राष्ट्रांनी कितीहि पूर्णपणें स्वीकार केला, तरी त्यांचा परिणाम दोनहि खंडांतील राष्ट्रांवर सारख्याच प्रमाणावर होणे शक्य नाही. औषध जरी एकच असलें, तरी प्रत्येक व्यक्तिच्या प्रकृतिमानाप्रमाणेंच त्याचा परिणाम घडून यायचा. व्यक्तिची प्रकृति आणि राष्ट्राचीसंस्कृति ही जवळजवळ सारखीच. त्याचप्रमाणे बदललेल्या मनूप्रमाणें नव्या मन्वंतराचे संदेश जरी एकाच सांच्यांत आणि एकच स्वरांत सर्व समाजांच्या तोंडातून एकसमयावच्छेदेंकरुन उमटत असले तरी त्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायच्या वेळी प्रत्येक समाज आपापल्या बऱ्यावाईट पूर्व संस्कृतीच्या वळणावर गेल्याशिवाय खास रहात नाहीं. हा निसर्गाचा नियम असो वा नसो; इतिहासाचा अनुभव मात्र असा आहे खरा. 7. ग्रामण्याच्या इतिहासानें एक गोष्ट मात्र स्पष्ट रीतीने सिध्द केली जाईल, ती हीच कीं गतकाळच्या इतिहासांत ज्या ज्या समाजांनी या देशाच्या राजकीय क्षेत्रांत काही नांव कमाविलें, त्यांची वैयक्तिक प्रवृत्ति आणि विशेषत: संस्कृति काय होती, याची वाचकांना चांगली खात्री पटेल. सध्या एकदेशीयत्वाचें वारे आसेतूहिमाचल