ग्रामण्यांचा इतिहास : Page 4 of 132

महाराष्ट्राचे हे राष्ट्रीय दुखणे आता चव्हाटयावर बांधण्याचा उपक्रम करीत आहोत. 4. ग्रामण्य शब्दाची व्युत्पत्ति जर शोधली तर हा शब्द धेडगुजरी दिसतो; म्हणून सर्वमान्य शब्दकोशात अजून त्यास मिळावे तें स्थान देण्यात आलेलें नाही. याचे कारण असें आहे की 'ग्रामण्य' या शब्दाचा इतिहास जसा अतिव्यापी तसा त्याचा अर्थसुध्द अतिव्यापी आहे. ग्रामण्य म्हणजे बहिष्कार असा अर्थ एका मराठी कोशाकाराने दिलेला आहे. परंतु बहिष्कार म्हणजेच ग्रामण्य जर मानलें तर 'स्वदेशी चळवळीने इंग्रजी व्यापारावर ग्रामण्य उभें केलें' अशी वाक्यरचना करायला हरकत नसावी. पण त्याला कोणी ग्रामण्य म्हणत नाही. ग्रामण्य शब्द ऐकतांच मनांत ज्या ज्या कल्पना उद्भृत होतात, त्या त्या सर्व एका शब्दांत व्यक्त करुन दाखविणारा शब्द ग्रामण्याशिवाय खुद्द मराठीत नाही, मग इतर भाषांची तर गोष्टच नको! ग्रामण्य म्हणजे ग्रामण्य!! व्युत्पत्तीच्या काथ्याकुटांतून मोकळे होऊन आपण जर ग्रामण्याच्या प्रत्यक्ष स्वरुपाकडे दृष्टी फेंकली तर त्यांत 'वेदोक्ताचें बंड' हे एक मूळ खूळ आहे, असे आपल्याला दिसेल. फार काय पण ग्रामण्याच्या एकंदर व्याप्तीची जर कसोशीने आणि चौकस बुध्दीनें आपण पाहणी केली नाही, तर ग्रामण्याच्या पितृव्याचा आरोप वेदोक्तावर करण्याचा कदाचित आपणांस मोह पडेल. वेदोक्त आणि ग्रामण्य हे दोन शब्द दुर्दैवाने इतके जवळ जवळ आणून भिडविले आहेत की ते परपस्पराचे अनुषंगीय आहेत असाहि आपल्याला भास झाल्याशिवाय रहात नाही. वेदोक्ताचे बंड धार्मिक क्षेत्रातलें आहे. मग ग्रामण्याचें बंड शुध्द धार्मिक बंड म्हणावें तरी पंचाईत आहेच! कारण त्याच्या पायाचा शोध केला तर, त्यांत कितीक तरी मोठमोठे चिरे सामाजिक आणि राजकीय खाणीतले दिसतात. बरें, तें सामाजिक म्हणावें तर धार्मिक क्षेत्रांतल्या सोवळया धाबळया, जानव्याची भेंडोळी आणि गोमुत्राचे घडे यांचा सांवळा गोंधळ पाहून तसेंहि म्हणण्यास मनुष्य कचरतो. राजकीय बंड म्हणावें तर आजपर्यंत ग्रामण्याचा एकहि चळवळया छत्र मोर्चेले उडवीत सिंहासनाधिष्टित शककर्ता झाल्याचें इतिहासांत नमूद नाहीं उलट राजकीय चबुतऱ्यावरुन ग्रामन्यांच्या धुडगुसाकडे पाहूं लागले तर ही सारी भानगड सामाजिक स्पर्धेची आहे असें दिसते-क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन प्रमुख समाजातला हा तंटा आहे. यात राजकीय भानगडीचा अंशहि नाही, असेंहि विधान करणे धोंक्याचें आहे; कारण ग्रामण्यांच्या सणंगातून राजकीय रेशमी धागे इतर सामाजिक आणि धार्मिक धाग्यांच्या बरोबरीनें सरसहा गुंफलेले स्पष्ट दिसतात. एकूण ही ग्रामण्याची भानगड अंजिरी रंगाच्या शालूसारखी आहे असें म्हणणें प्राप्त आहे. तिच्या हालचालीच्या प्रत्येक झुकण्याबरोबर निरनिराळे तऱ्हेतऱ्हेचे रंग प्रेक्षकाच्या नजरेस येतात; अर्थात ती अमूकच एका विवक्षित रंगाची आहे असें धाडसी विधान न करिता, ती सर्वरंगपरिपूर्ण आहे, असें म्हणून आपण पुढें प्रयाण करावें हेंच बरें! 5. सांप्रत सर्व भरतखंडावर नव्या मन्वंतराचा उष:कालीन् प्रकाश पडला असून, राष्ट्र खडबडून जागें झालें आहे. ''प्रचलित मनु-संदेश ऐकुनी थरारला देश!'' ''अझुनी आम्हीं कां न त्यजावा उदासीन वेष॥'' अशा प्रकारचे जागृतीचे दिव्य संदेश देशाच्या कानाकोपऱ्यांतसुध्द आपल्या गंभीर ध्वनींचा पडसाद उमटवीत आहेत. या अवाढव्य हिंदी द्वीप-कल्पाच्या असंख्य प्रांतांतील नानाविध जातींची मनें एकाव्यापक राष्ट्रीय ध्येयाच्या बिंदूवर अगदीं खिळून राहिलीं आहेत. हिंदु आणि मुसलमान, ख्रिस्ती आणि पारशी, जैन आणि लिंगायत अशा प्रकारची भाषा आतां पाठीमागें पडून तिचें ठाणें हिंदी देशबांधव या शब्दप्रयोगाने पटकाविले आहे. जातिभेदाचे अभेद्य तट फोडण्यास कंबर कसून सरसावलेले पाथरवट व सुरुंग्ये तटाची क्षुलज्क कपरीहि फोडूं न शकल्यामुळें जरी हंताशवदन झाले, तरी त्यांनीहि आतां या नवीन मन्वंतरांत जातिभेदाच्या शनिवार वाडयाचा तट राहिला तर राहो, पण निदान तटाभोवती जातिमत्सराच्या होळया पेटवून आपल्या असूयेचा शिमगा करुन घेऊ नका, म्हणून जाहीरनामे काढिले आहेत. ज्या ज्या समाजांनी गेल्या दोन दशकांत असूयेच्या चुडी हातांत घेऊन महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षेच्या टोलेजंग प्रासादास चोहींकडून आग लावण्याचा उपक्रम केला, तोच समाज आजच्या राष्ट्रीय उत्क्रांतीच्या 'महापर्वणीं'त सर्व राष्ट्राला वंदन करुन ''राष्ट्रायै स्वाहा इदंराष्ट्र