ग्रामण्यांचा इतिहास

कदाचित प्रबोधनकारांचा सर्वात महत्त्वाचा ठरावा एवढं संदर्भमूल्य या पुस्तकाला आहे. विशेषतः वैदिक धर्मविधी केल्या म्हणून विविध जातींना भिक्षुकांनी कसं छळलं, याचा हा साधार इतिहास आहे. ग्रामण्य म्हणजे वाळीत टाकणं किंवा धार्मिक शिक्षा. त्यांचा इतिहास ना आधी कोणी लिहिला, ना नंतर. अशा लिखाणानं भिक्षुकशाहीचा झेंडा मिरवणा-यांना चार पावलं मागे यावं लागलं आणि सामाजिक अभिसरण पाच पावलं पुढे सरकलं.

प्रबोधनकार ठाकरे समग्र वाय्ड्मय - खंड पाचवा

संपादक श्री.पंढरीनाथ सावंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

निवेदन

महाराष्ट्राने भारताला नेहमीच परिवर्तनाची दिशा दिली आहे. जिद्दीने आणि चिकाटीने अविरतपणे सहकार्य हाती घेऊन त्यासाठी जीवन वेचणारे नररत्ने याच भूमीत तेजाळून निघाली आहेत. मराठी भाषेचा, साहित्याचा आणि वक्तृत्वाचा दैदीप्यमान आविष्कार प्रबोधनकार ठाकरे यांच्या शैलीत दिसून येतो. प्रबोधनकार ठाकरे मराठी अस्मितेचे वीर शिरोमणी आहेत. अत्यंत परखड भाषेत सडेतोड विचार मांडण्याची त्यांची खास शैली अद्वितीय आहे. प्रबोधनकारांचे शतक सर्वत्र झुंजण्याचे, लढण्याचे शतक होते. प्रबोधनकारांच्या ''एक लुहारकी'' या बाण्याने त्यांनी अनेक घाव केले. आज सामाजिक परिवर्तनाची जी गोड फळे आपणांस दिसत आहेत, समाजमनाची जी वैचारिक पातळी दिसते आहे त्यात प्रबोधनकार ठाकरे यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांच्या लिखाणाला सामाजिक क्रांतीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. मार्गदर्शक समाजक्रातीकारांचा हा दस्तावेज आपल्या हाती देताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला आनंद होत आहे.

आम्ही स्वत: प्रबोधनकार ठाकरे यांचे घणाघाती वक्तृत्व ऐकले आहे. त्यांच्या साहित्याचे मनन परिशिलन केले आहे. पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी प्रबोधनकारांच्या अपूर्व निष्ठेतून त्यांच्या समग्र साहित्याच्या संपादनाचे कार्य घेतले. त्यांच्या अथक परिश्रमातून मराठी भाषेचे हे 'देशीकार लेणे' साकारले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रभारी सिचव, श्री उ.बा.सूर्यवंशी; श्री.प्र.शं.मोरे, संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय तसेच श्री.ज.शं.साळवी व श्रीमती छा.दि.गोडांबे आणि मंडळाचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल आभार. प्रा.रतनलाल सोनग्रा, मुंबई, अध्यक्ष दिनांक 29 डिसेंबर 2004. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. प्रकाशकाचे दोन शब्द जाती मत्सराने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. हाच प्रकार या उप्पर तसाच चालू राहणे बरे नव्हे, म्हणून त्याचे खरेंखुरे राक्षसी स्वरुप देशबांधवांसमोर मांडण्यास ते या निरर्थक वादापासून देशाचा बचाव करण्याचा काही तरी योग्य मार्ग शोधून काढतील, या आशेने हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक प्रसिध्द करण्यात येत आहे.

जातिमत्सराचा नायनाट होऊन आमच्या सर्व देशबंधूंची मने एक देशीयत्वाच्या उज्ज्वल विचारांनी भरुन यावी; निरनिराळया जातींची सामाजिक व धार्मिक बाबतींतील मनुष्यकृत कृत्रिम बंधने शिथिल व्हावी, निदान राष्ट्रीय कामगिरीत एका आईची सर्व लेंकरे या नात्याने प्रयत्न करण्याच्या कामात त्यांचा अडथळा उत्पन्न होऊ नये इतकी तरी त्याची व्याप्ती संकुचित व्हावी आणि ऐनकेन प्रकारेण परस्परांचा काया वाचा मने द्वेष करण्याची करण्याची कबुली अत:पर कोणांतही उत्पन्न होऊं नये. हा या पुस्तक प्रकाशनाचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकात ऐतिहासिक सत्याचे निरुपण स्पष्ट केले आहे. रुचिभिन्वत्वाने ते कित्येकास आवडेल, कित्येकांस आवडणार नाही. त्याला आमचा इलाज नाही. आम्हाला पुणे भारत इतिहास-संशोधक मंडळासारख्या अहंपणाचा ताठा मिरविण्याचा अधिकार नाही किंवा इच्छाही नाही. पुस्तकात नजरचुकीने किंवा अन्य कारणाने इतिहासविषयक काही चुका किंवा विधाने कोणी विद्वजनांनी सप्रमाणात नजरेस आणुन दिल्यास त्यांचा आम्ही साभार स्वीकार करुं आणि दुसऱ्या आवृत्तींत ती सुधारणाही करु.

प्रस्तुत पुस्तकावर नियतकालिकांत टीका किंवा चर्चा करणाऱ्यांनी कृपा करुन त्या पत्राचा अगर मालिकाचा अंक आमचेकडे अवलोकनार्थ पाठविण्याची मेहेरबानी करावी. वास्तिवक शिष्टसांप्रदायाप्रमाणे हे काम त्याच प्रकारचे असते. पण इतकी उदारमानसिकता आमच्या पत्रकारांत मुळीच आढळून येत नाही. फार काय अंक पाठविण्याबद्दल पत्राने विनंती केली असतानाही त्याचे उत्तर मिळत नाही. उपोध्दतालरोता लिहिलेला बराच मजकूर पुस्तकांची पृष्ठसंख्या अवसानाबाहेर काढल्यामुळे आयत्यावेळी बाजूला ठेवावा