श्री संत गाडगेबाबा: Page 8 of 61

उघडत नाहीत. काय पाहून मुलगी द्यायची? `डेबूजी माझा नाती, चंद्रभानजीचा भाचा, त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी, मग त्याची सोयरीक जमायला हरकत कसली? शब्द टाकायची थातड, पाहुण्यांची वरदळ लागेल आमच्या आंगणात.’ हा हंबीररावाचा नि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसांत दूर झाला. `मुलगा चांगला आहे हो, पण त्याच काय पाहून आम्ही मुलगी द्यावी? ना जमीन ना जुमला. ना घर ना दार.’ येई तो पाव्हणा हाच नकार देऊन चालता होऊ लगाल. मानी माणसाला नकार सहन होत नाहीत. चंद्रभानजी म्हणजे दापुरीतला एक पुढारी शेतकरी. गावात त्याचा शब्द खाली पडत नसे. नकारांनी पाणथळून न जाता, त्याने खटपटींचा जोर वाढवला आणि कमालपूर येथील धनाची परटावर आपले वजन पाडले. त्याला मुलगा पसंत पडला. पण त्याची बायको काही केल्या रुकार देई ना. हो ना करता १८९२ साली डेबुजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले. घरात सौ. कुंताबाई सून आल्यामुळे, सखुबाईच्या वठलेल्या जीवनाला पालवी फुटली. चंद्रभानजीवर सावकारी पाश सुखवस्तु घरंदाजांवर कर्जाचे पाश टाकण्याच्या सावकारी युक्त्या जुक्त्या अनेक असतात. तशात तो सुखवस्तु नाक्षर आणि मानपानाला हपापलेला असला तर सावकारी कसबात तो तेव्हाच नकळत अडकला जातो. दापुरे गावच्या शिवाराच्या पूर्वेला पूर्णानदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिडके नावाच्या सावकाराचा एक ५ एकर जमिनीचा सलग तुकडा होता. जमीन होती उत्तम पण तिची ठेवावी तशी निगा न ठेवल्यामुळे ती नादुरुस्त नि नापीक झाली होती. तिडके सावकाराने तो तुकडा चंद्रभानजीला विकला. विकत घेताना काही रक्कम रोख दिली नि बाकीची रक्कम दोन वर्षांत हप्त्याने फेडण्याचे ठरले. मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर केला नाही. ``कागदाशिवाय अडलं आहे थोडंच? जमीन एकदा दिली ती दिली. माणसाची जबान म्हणून काही आहे का नाही?’ असल्या सबबीवर कागद आज करू उद्या करू यावरच दिवस गेले. दोन वर्षांत डेबुजीने त्या जमिनीची उत्तम मशागत करून ती सोन्याचा तुकडा बनवली. दोन वर्षात देण्याचे हप्तेही फेडले. तो सावकार चंद्रभानजीला हवे तेव्हा हव्या त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला. त्या सावकाराच्या इतर कुळांच्या देण्याघेण्याच्या भानगडी चंद्रभानजीच्या सल्ल्याशिवाय मिटेनाशा झाल्या. सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची एवढी मोहिनी टाकली की चंद्रभानजीच्या शब्दाशिवाय सावकार कोणाचे ऐकेनासा झाला. भोळसट चंद्रभानजी गर्वान फुगला. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी कुळधर्म, देवकार्य, उत्सव, मेजवान्यांचा थोट उडवण्यासाठी तिडक्याकडून रातोरात वाटेल त्या रकमा मागवीत गेला. तिडक्याची तिजोरी आपलीच गंगाजळी असा जरी त्याला भ्रम झाला, तरी तिडके होता जातीचा सावकार. त्याने एकूणेक एक रकमेचा जमाखर्च लिहून ठेवला होता. एक दिवस तो त्याने चंद्रभानजीला गमती गमतीने दाखवला आणि या भरंसाट कर्जाच्या फेडीसाठी दे आपली सारी जमीन खरेदी लिहून, असा पेच टाकला. चंद्रभानजीचे डोळे खडाड उघडले. त्याच्या डोळ्यापुढे अंधारीच आली. सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले. त्याने ५६ एकर जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतायची त्याला मुभा मिळाली. सावकारशाहीची जादू डेबुजीला किंवा घरात कोणालाही ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही. शेताचे धान्य कपाशीचे पीक तर घरात महामूर येते, पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या डोळ्यांसमोर घेऊन जातात का नि कशाला? याचा डेबुजीला बरेच दिवस काही थांगच लागेना. घरासमोर कपाशीचा पर्वत उभा रहावा. धान्यांचे डोंगर एकावर एक चढावे आणि एकाद्या दिवशी उठून पहावे तर आंगण मोकळे! अखेर चंद्रभानजीच्या गहाणाचे बेण्ड गावात फुटले. गावातही कुजबूज उठली. घरंदाज म्हणून मिरवणा-या शेतकरी पुढा-याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट. वरचेवर सावकराकडून रोख रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे, खर्चासाठी रोकड रकमांची तंगी पडू लागली. अंगावरच्या नित्याच्या खिडूकमिडूक दागिन्याशिवाय बासनातले ठळक नद दूरगावी नेऊन त्यांचे टक्के करण्याचा चंद्रभानजीने तडाका चालू केला. त्याची प्रकृतीही ढासळत गेली. अखेर