श्री संत गाडगेबाबा: Page 61 of 61

या निरोपाने मी तर चरकलोच. चला मोठे नाही तर छोटे. पण माझ्या नेहमिच्या पध्दतिप्रमाणे वाचकांच्या विचाराना चालना देणारे पुस्तक. शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाईपरायटर खडाडवित. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्यमुख्य ठळक पैलू मी येथेवर चित्रित केले. इंद्र्धनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणार्याख शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन-मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातील ती निरांजन मला सारखी वाकुल्या दाखवीत सुटली, केली सेवा वाचकानी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद. अखेर, गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा, या न्यायाने ही चरित्र-लेखनाची पत्री श्री गाडगे बाबांच्या चरणा- (अरे हो!पायाना तर ते हातहि लावून देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यांत साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे. गरिबाची शिळीपाकी भाकरी आमटी बाबानी रुचकर मानून दिलेला समाधानाचा ढेकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणारा- मुंबई नं २८ महाशिवरात्र , शके १८७३ ता. २३ फेब्रुवारी १९५२ केशव सिताराम ठाकरे.