श्री संत गाडगेबाबा: Page 6 of 61

दापुरी गावच्या पूर्णा नदीच्या हिवाळ्या-उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा. गावातली बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळी माणसे धडाड पाण्यात उड्या मारताहेत, सरासर पोहताहेत, पाणतळी खोल बुडी मारून भरारा वर येताहेत, मजा आहे मोठी. आले डेबूजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते का नाही, याचा कसला सुद्धा विचार न करता, स्वारीने घेतली धडाड उडी डोहात. आणि मग – आणि मग – आणि मग? कसचे काय अन् कसचे काय! लागला गटांगळ्या खायला. घाबरला. ओरडू लागला. आजूबाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेसा दिसताच एका दोघांनी पकडून काठावर आणला. उपचार केले तेव्हा सावध झाला. ``पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला?’’ जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई, मामा, आजोबा धावत आले. ``कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा’’ म्हणून आईने डेबूजीला पोटाशी धरले आणि ``भलभलत्या फंदात पडायची गाढवाला फार खोड’’ म्हणून मामाने दिली भडकावून एक डेबूजीच्या. ``खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकसील तर, तंगडी मोडून टाकीन.’’ असा सज्जर दम भरला. माणसाला अशक्य काय आहे? नेपोलियनप्रमाणेच डेबूजी गाडगे बाबांच्या कर्तव्यकोशात अशक्य हा शब्दच नाही. बरोबरीचे सवंगडी धडाधड उड्या मारतात, सपासप सरळ्या मारीत या काठचे त्या काठाला जाता, मनमुराद डुंबतात आणि मी का वेड्या अनाडी बावळटासारखा त्यांच्याकडे पहात नि त्यांचे कपडे संभाळीत काठावर बसू? छट्! हे नाही चालायचे. पोहायला मला आलेच पाहिजे. दोन प्रहरी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून, पाण्यात उतरून डेबूजी दररोज पोहण्याचा यत्न करू लागला. एक दोन महिन्यांच्या आतच त्याचा आत्मविश्वास बळावला आणि पोहण्याचा, तरंगण्याचा, बुडी सराळ्या मारण्याच्या नाना प्रकारात त्याने एवढे प्रावीण्य मिळविले की त्या बाबतीत गावचा नि आसपासचा एकही आसामी त्याच्याबरोबर टिकाव धरीनासा झाला. पावसाळ्यात नदीला महामूर पूर आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना नि जनावरांना वाचवण्याचे कर्म महाकठीण, मोठमोठ्या पटाईत पोहणारांची अक्कल थरथरू लागायची. पण डेबूजी तडाड उडी घेऊन कमाल शहामतीने त्यांना सफाईत तडीपार खेचून काढायचा. असाच एकदा पूर्णेला पूर आला असता, पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी नावाच्या मित्राने डेबूजीशी पैज मारली. लोक नको नको म्हणत असताही दोघांनी टाकल्या धडाड उड्या. नदी तर काय, एकाद्या खवळलेल्या महासागरासारखी रों रों करीत, गरार भोवरे भिरकावीत तुफान सोसाट्याने चाललेली. सहज भिरकावलेला लाकडाचा ओंढा धड शंभर पावले सुद्धा सरळ जाई ना. भोव-यात गचकून झालाच तो बेपत्ता! आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात मारीत पाणी तोडीत! काठावरच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय होतय नि काय नाही. डेबूजी तर रंडक्या मुंडक्या अनाथ आईचा एकुलता एक मुलगा. कुणी भरीला घातला नि कुणी चिथावले? नसता आपरमात अंगी लागायचा. बरे, घरच्या मंडळींना कळवायचे, तर ती वेळही निघून गेलेली. आता कोणी घरून आलेच तर काठावरच्या लोकांनाच शिव्याश्राप खावे लागणार. सखुबाई तर काठावरच माथे फोडून घेणार. लोक थिजल्या डोळ्यांनी नुसते पहाताहेत तोच हां हां म्हणता पार दूरवरच्या पैलथडीवरून डेबूजीची भीमगर्जना ऐकू आली. ``आलो रे आलो, सफाईत येऊन पोहोचलो.’’ पण त्याचा तो पैजदार दोस्त? अरेरे, तो कुठेच दिसे ना. कशाचा दिसतो तो? काठाजवळ जाता जाताच एका भोव-याच्या गचक्यात तो सापडला नि बुडाला. त्याचे प्रेत पुढे सहा मैलांवर कोतेगावी काठाला लागलेले आढळले. पोहण्याप्रमाणेच आट्यापाट्या, हुतुतु, लगो-या, गोट्या आणि कुस्त्या या कलांतही डेबूजी दापुरीच्या पंचक्रोशीत कुणाला हार जाईनासा झाला. घरचे खाणेपिणे तसे म्हटले तर यथातथाच. पण अखंड कष्टांची नि श्रमसाहसाची आवड उपजतच त्यांच्या अंगी बाणल्यामुळे, डेबूजीची देहयष्टी पोलादी कांबीसारखी टणक कणखर बनत गेली. ना