श्री संत गाडगेबाबा: Page 3 of 61

दिऊ त्या देवदेवीचा. निर्मय राहुदे त्याला या देवदेवी अन् देवका-याच्या पापापासुन. अरेरे काहाचे हे धरम अन् कुयधरम? या खोट्या देवाईले कोंबळे बक-याईचे इनाकारन कापन्याच्या पापी फंदात मी पळलो नसतो त दारुच्या नांदात कायले गोयलो असतो? लोकाईले काम्हुन बदलामी देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरो होता तथुरोक मले त्याहीनं दारुसाठी कोरलं. लोक असेच असतात सखू. पन आता माह्या डेबुजीले संभाळवो बरं? तो पिसाट, देवाले न माननारा झाला तरी बरं होईन.

पन त्याले या बकरेखाऊ अन् दारुपिऊ देवाचा नांद लागु देऊ नोको बरं?’’ देवकार्याची फलश्रुति ``सखू, माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देवकार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मानमरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हा-यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला ये देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून. अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म! या खोट्या देवांना कोंबडी बक-याचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्याजवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकडखावू दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस.’’ इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला. सखूबाईने हंबरडा फोडला.

व-हाडातील अमरावती तालुक्यातील कोतेगावची ही सन १८८४ सालची गोष्ट. झिंगराजी हा शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचा नातू. घराणे सुखवस्तू. जातीने परिट, तरी मुख्य व्यवसाय शेतीचा. गोठा गाई-म्हशी-बैलानी डवरलेला. परीट जमात मागासलेली. तशात नाक्षर. अनेक अडाणी रूढी, भलभलती कुलदैवते, त्यांना नेहमी द्याव्या लागणा-या कोंबडे-बकरे-दारूचे नवस, यांचा कहर माजलेला. कोणी कितीही शहाणा असला, विचारी असला, तरी जमातीच्या मुर्वतीसाठी वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बक-याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे, असा त्यांचा सामाजिक दण्डक. घरातल्या हव्या त्या ब-या वाईट भानगडीसाठी खंडोबाला आसरायीला किंवा गावदेवाला संतुष्ट करायचे म्हटले का आलीच कंदुरी नि दारू. मूल जन्माला आले, करा कंदुरी. तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला आला, बोलवा भगताला देव खेळवायला, कापा गावदेवापुढे कोंबडे, दाखवा दारूचा नैवेद्य, लावा त्याचा आंगारा का म्हणे होणारच ते खडखडीत. देवकार्य केले म्हणजे पाहुण्यांच्या बरोबरीने यजमानानेही दारूचा एक घोट तरी घेतलाच पाहिजे. घेतला नाही, तर देव कोपणार, अंगावर नायटे-गजकर्ण उठणार, घरादाराचे वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्मसमजुतीपुढे मोठमोठ्या मानी माणसांनाही –इच्छा असो वा नसो – मान वाकवून दारू प्यावीच लागते. देवकार्यच कशाला? पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी (मटणाचा बेत नसला तरी) दारूची बाटली आणलीच पाहिजे. दारू देणार नाही तो यजमान कसला नि घरंदाज तरी कसला? सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली, तर बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा? बरीच वर्षे त्याने दारूचा मोह टाळून, संसार-व्यवहार कदरीने केला. अखेर आजूबाजूच्यांच्या नादाने तो देवकार्यांच्या निमित्ताने अट्टल दारूड्या बनला. दारूचे व्यसन लागायचाच काय तो अवकाश असतो. ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू भोके पडून, ती केव्हा सफाचाट रसातळाला जाईल, हे ज्याचे त्यालाही समजत उमजत नाही. सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुप्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार, शेतवाडी, गुरेढोरे, आधीच वाटेला लागलेली. विष खायलाही फद्या जवळ उरला नाही. जवळ बायको सखूबाई आणि सन १८७६ साली जन्माला आलेला एकुलता एक मुलगा डेबूजी. दोन वेळा साज-या व्हायची पंचाईत,