श्री संत गाडगेबाबा: Page 12 of 61

नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखळीच्या ताख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुस-याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेऊन. कसा घरीजिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. जाता की नाही इथनं सारे? जीव घेऊन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहून बघ्यांचीही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दांनो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही असा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली. अजि म्यां ब्रह्म पाहिले. यमाचा काळदण्ड सावित्रीने आपल्या स्वयंभू तेजाने जसा अचानक परतवला, तसलाच प्रकार हंबीररावच्या डेबुजी नातवाने केलेला पाहताच सावकारशाही वचकाचा शेकडो वर्षांचा फुगाच फुटला. अरेच्चा, सावकाराला असा आडवून तुडवताही येतो म्हणायचे? हा नवाच पायंडा डेबुजीने व-हाडच्या शेतकरी जनतेला प्रथमच शिकवला. बिचारा तिडके सावकारही सपशेल पाणथळला. डेबुजीचे उदाहरण उद्या बाकीच्या शेतकरी कुळांनी गिरवले तर आपले काय होणार? या भीतीने त्याच्या तोंडचे पाणी पळाले. डेबुजीला आवरा म्हणून उपदेश करणारी मंडळीच आता त्याची पाठ थोपटायला हंबीररावाकडे धावली. माणसातला कर्दनकाळ म्हणून पिढ्यानपिढ्या गाजलेला सावकाराचा दरारा डेबुजीने एकाच थपडीत मातीमोल केल्यामुळे, पुढे तडजोडीचा मार्ग बंद झाला. दापुरी गावात यायलाही त्याला तोंड राहिले नाही. काही दिवस गेल्यावर, तिडके सावकाराने मध्यस्थांची परवड घालून डेबुजीशी तडजोड करण्याची खूप तंगडझाड केली. ``ज्याचा दाम खोटा असेल त्याने सावकाराच्या कोर्टकचेरीच्या दरडावणीला भ्यावे. माझा हिशेब उघडा नि चोख आहे. वसूल घेतो नि पावती देत नाही? पटवीत नाही? आणि गुमान येतो जमीन कबजा घ्यायला? त्या जमिनीचे मामानी रोख पैसे दिले तरी खरेदीखत केले नाही. काय, कायद्याला डोळे आहेत का फुटले? कायदा काय असा चोरांना पाठीशी घालतो होय. जा म्हणावं तुलाकाय करायचं असंल ते करून घे. आम्ही त्याची एक दिडकी लागत नाही.’’ डेबुजीच्या या बोलण्याला कोणालाही खोटे पाडता येई ना. अखेर मूळ मालक म्हातारा हंबीरराव याला कसाबसा मथवून, सावकाराने गहाण जमिनीपैकी १५ एकर जमीन परत देऊन, आता काहीही देणे राहिले नाही, अशी दुकानपावती देऊन वांधा मिटवला. हंबीरराव, सखुबाईला आनंद झाला, पण ``तुमचे तुम्ही मालक आहात. मी एक तसूभरसुद्धा तुकडा त्याला दिला नसता.’’ हे डेबुजीचे तुणतुणे कायम राहिले. उपाशी रहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नकारे बाबानो, ही गाडगेबाबांची प्रत्येक कीर्तनातली आरोळी लक्षावधि लोकांनी आजवर ऐकली नि रोज ऐकतात. तिच्यामागे हा जुना इतिहास आहे, हे त्यांना आता तरी नीट उमजावे म्हणून या कथेचा किंचित विस्तार करून सांगितली. डेबूजीचा देवीसिंग झाला. सावकार-सापाचे नरडे दाबून सर्वस्वाचा मणि त्याच्या मस्तकातून खेचून काढण्याच्या अपूर्व यशाने दापुरी पंचक्रोशीत डेबुजीला गावकरी नि शेतकरी मोठा मान देऊ लागले. ते आता त्याला देवीसिंग या बहुमानवाचक नावाने संबोधू लागले. एक वर्षातच हंबीररावच्या घराण्याची कळा बदलली. कपाशी, ज्वारी, गहू, जवसी, करडी, तुरीचे पीकही महामूर आले. अंदाजे एक हजार रुपयांची लक्ष्मी घरात आली. आंगणात धान्यांचे कणगे उभे राहिले. धनधान्य कपडालत्ता, दूधदुभते यांची चंगळ उडाली. गावकीच्या हरएक भानगडीत लोक डेबुजीला सल्लामसलतीसाठी मानाने बोलवायचे. या बदलामुळे डेबुजी गर्वाने ताठून