श्री संत गाडगेबाबा: Page 11 of 61

बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यांनी कोर्ट कचे-यांच्या पाय-या चढाव्या आणि गोरगरिबांनी ठोशांनी न्यायाचा ठाव घ्यावा’ इतक्या कडेलोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली. पांचशे कोसात सावकाराचा दरारा सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजा-याने डेबुजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला - ``डेबुजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदळीच्या दारी झुले हत्ती. वाघाच्या तडाक्यातनं माणूस एकाद वेळ शीरसलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं? छे! नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महा कर्दनकाळ. पांचशे कोसात याचा दरारा. गाभणी गाभ टाकते.’’ डेबुजी – अरे मोठा वाघ का असे ना तो. चौदा वरसं शेत आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कबजा घेऊ देणार. वेळच पडली तर अस्तन्या वर सारून करीन काय वाटेल ते. सोनाजी – डेबुजी, हा आततायीपणा काही कामाला येणार नाही. अरे, खैरी गावचे नि आपल्या इथले जाठ लोक म्हणजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची प्राज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांचीही हड्डी पिळून मळून त्यांना गोगलगाय करून टाकलंय. पहातोस ना? मग तुझा एकट्याचा रे काय पाड? तुझ्यामागं आहे कोण? येणार कोण? या भानगडीत तू पडू नये हे बरं. म्हाता-या हंबीररावनेही सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. ``पोरा, काय चालवलंयस हे तू. शेताचा कबजा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटंल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ हे माझ्या गळ्याची, या गावात आपल्या बाजूचे कुणी नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडा नाही. कशाला घेतोस बाबा समर्थाशी होड? व्हायचं असंल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडं भरला दरा तो गाव बरा समजून हवं तिथं जाऊ, कुठंही दोन कपडं धुवून पोट भरू. पण या सावकाराला आडवा जाऊ नको रे बाबा.’’ धरा त्याला... काढा बाहेर डेबुजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबुजी मोठ्या पहाटेलाच शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखूबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७-८ औत, बैल, नांग-ये, ९-१० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. जुंपा रे आपले बैल, घाला शेतात नांगर आणि तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा. सावकाराने आरोळी दिली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबुजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव व सखुबाईने रडकुंडी येऊन डेबुजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. धरा त्याला, काढा बाहेर, डेबुजी या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला ``हनमंत्या, हो पुढे. हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेताबाहेर.’’ असा निर्वाणीचा हुकूम केला. जा गुमान मागं, नाहीतर - हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भइडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून, ``हनमंत्या’’ डेबुजी गरजला. ``तुझ्या जिवाची तुला पर्वा नसंल, पोराबाळांची आशा नसंल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आताजिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेलास समज तू. तुझ्यामागं तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुमान मागं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.’’ हनमंत्या कचकला नि जागच्याजागी थबकून उभा राहिला. सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा