श्री संत गाडगेबाबा: Page 2 of 61

भांग, अफू, दारू, व्यभिचारासारख्या व्यसनांचा कडवा निषेध, (२) शेतकरी कष्टकरी जनतेला साक्षरतेचा, साक्षेपाचा, अखंड उद्योगाचा, सहकाराचा आणि काटकसरीचा अट्टहासी उपदेश (३) सावकारशाहीच्या नि भांडवलशाहीच्या कचाट्यात चुकूनही न जाण्याचा इषारा आणि (४) माणुसकीला बदनाम करणा-या रूढीरिवाज नि देवकार्ये यांपासून दूर राहण्याचा उपदेश, हे गाडगे बाबांच्या गेल्या ४५ वर्षांच्या प्रचारकार्यातले मुद्दे लक्षात घेतले, तर त्यांना समाजवादी सत्यशोधक म्हणायलाही काही हरकत नसावी. फरक एवढाच, शहरी चळवळ्ये फक्त शहरातूनच समाजवादी तत्त्वांची नुसती पुराणे सांगत वावरत असतात आणि गाडगे बाबा लाखलाख गणतीच्या खेडुती बहुजन समाजांच्या जीवनाशी समरस एकवटून, स्वतःच्या आचरणाने त्यांनाही आपल्यामागे घेऊन जात असतात. धर्मपंथ असो वा धर्मग्रंथ असो, त्यातल्या यच्चयावत् दांभिक फिसाटांचा कडकडून निषेध करणारा आणि देशकालवर्तमानानुसार जनतेला निर्मळ माणुसकीचा नवा आचारविचार-धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा किंवा महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढे त्यांची ही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवील असेही वाटत नाही.

त्यांच्या निःस्पृहतेला नि निरिच्छतेला निरुपमा हेच विशेषण छान शोभते. अशा महान तपस्वी नि कट्टर कर्मयोगी महात्म्याच्या चरित्रलेखनाचे काम माझ्याकडे अवचित नि अयाचित आले. सन १९५०च्या सप्टेंबरात बाबांचे २-३- शागीर्द एकाकी माझ्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले. `श्री गाडगे बाबांचे चरित्र मी लिहावे’ अशी त्यांनी विनंती करताच, देव-धर्म-साधूंविषयी माझ्या निश्चित मतांचा आराखडा मी त्यांच्यापुढे स्पष्ट मांडला. ``तर मग, हे काम करण्यासाठी आम्ही बाबांच्या भक्तमंडळींनी केलेली तुमची निवड बिनचूक बरोबर आहे.’’ असा त्यांचा एकच अभिप्राय पडला. ३-४ वर्षांपूर्वी सहज एकदा केवळ जिज्ञासा म्हणून दादर कॅडेल रोडवरील एका वाडीत झालेले गाडगे बाबांचे कीर्तन दूर बाजूला उभे राहून मी ऐकले होते. बस्स. यापेक्षा त्यांचा माझा फारसा कधी संबंधच आलेला नव्हता. वृत्तपत्रकार नात्याने, अर्थात, त्यांच्या क्रांतिकारक समाजवादी चळवळीकडे माझे लक्ष होतेच होते. माणसांनी माणसांशी माणसासारखे वागावे कसे आणि हा मानवधर्म आचरताना आत्मोद्धाराबरोबरच समाजोद्धारही कसा साधावा, याचा गाडगेबाबांच्या कीर्तन-प्रचाराबरोबरच त्यांनी पंढरपूर आळंदी देहू नाशिक वगैरे ठिकाणी उभारलेल्या धर्मशाळा सदावर्ते पाणपोया नि बोर्डींगे यावरून मी चांगलाच कानोसा घेतलेला होता. गाडगेबाबांविषयी अनेकजणांकडून आठवणींची पुष्कळ पुडकी मजकडे आली. त्यांच्या कार्यांच्या तपशिलांची लेखी छापील बाडेच्या बाडे टेबलावर येऊन पडली. शेकडो फोटोग्राफही आले. या पुस्तकात त्या सगळ्यांचा पुरस्कार करणे कठीण.

चरित्राची आणि कार्याची सर्वसाधारण रूपरेषाच या पुस्तकात देणे मला शक्य झाले नाही. कदाचित पुढेमागे बाबांचे एक मोठे चरित्र, आठवणींचा संग्रह, कीर्तनांतली प्रवचने आणि फोटोंचे आल्बम श्री गाडगे बाबा मिशनतर्फे प्रसिद्ध करण्याचा कानोसा मला लागलेला आहे. विवेचनाच्या ओघात देव देवळे धर्म वारकरी पंथ आणि आध्यात्मादि भानगडी या विषयी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल माझा मी जबाबदार आहे. लोकोत्तर कर्मयोगी महात्म्यांची जीवनकथा पारिजातकाच्या परिमळासारखी मातीलाही सुगंधी करतो. श्री गाडगेबाबांच्या या कथानकाशी मी घेतलेला तन्मयतेचा तो आनंद वाचकांनाही लाभो. मुंबई नं. २८. महाराष्ट्राचा नम्र सेवक श्री एकनाथ षष्ठी केशव सीताराम ठाकरे ता. १७ मार्च १९५२ शुद्धिपत्र अशुद्ध शुद्ध पृष्ठ ७ ओळ १९ कोतेगावी लाखपुरीच्या पृष्ठ ३१ ओळ ७ बिल्वपत्रे वाहिली नमस्कार केला.

`मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही प्रकरण १ ले ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ``सखू माहा कारभार अटपला! मराले शेवटी मी लोकाच्या उंबरठ्यात ईऊन पळलो! मेल्यावर मळ जायाले पैसा लोकाचाच; कायनं आली असिल हे अवदसा? देवका-याच्या दारुनं! काहाचे हे देव अन् काहाचे ते दगळा गोटवाईचे देवकारे? दारूच्यापाई घरदार, वावर जमिन मान मयराद्याले सोळल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले. आता माहा आईक. आताच्या आता तो खंडोबा ती आसरा अन् सर्वच्या सर्व देवपाटातले दगळगोटे दे फेकुन भुलेसरीत. आखीन एक काम आपल्या लाळाच्या डेबुले वारा नोको लागु