श्री संत गाडगेबाबा

प्रबोधनकारांचे गाडगेबाबांशी स्नेहाचे संबंध होते. गाडगेबाबा अधूनमधून त्यांच्या घरीही येत. गाडगेबाबा हयात असताना लिहिलं गेलेलं हे चरित्र. गाडगेबाबांच्या शिष्यांनी हे काम मागे लागून करवून घेतलं. हे महत्त्वाचं काम खरं, पण प्रबोधनकारांनी हे काम थोडक्यात आटोपलेलं दिसतंय. बाबा तेव्हा जिवंत असल्यामुळे त्यांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन अधिक तपशीलात करणं शक्य होतं. बाबांच्या मृत्युनंतर पुढच्या आवृत्त्यांमधे त्याविषयी लिहून पूर्ण करण्याची जबाबदारीही इतरांनाच पार पाडावी लागली. गाडगेबाबा मिशनतर्फे या पुस्तकाचं पुनर्मुद्रण सुरू असतं. त्यामुळे हे पुस्तक काही ठिकाणी आजही उपलब्ध असतं.

-----------------------------------

सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभलें । करीं धरियेले गाडगे काठी ।। डोई शुभ्र केस उडती वा-याने । चिंध्या प्रकाशाने चमकती ।। कीर्तनाचे रंगी डुल्लतो प्रेमानें । भजनानंद म्हणे ढेबूजीचा ।। लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी अनुहाताचा करुनी टाळ । मन मृदंग विशाळ ।। बुद्धि तुंब्याचा करूनी वीणा । विवेकाची दांडी जाणा ।। इन्द्रिय खुंट्या करूनी स्थिर । हरीनामाचा गजर ।। तुका म्हणे आदि अंत । वाचे बोलावा भगवंत ।। - तुकाराम लेखक – प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे प्रकाशक – श्री गाडगे महाराजा मिशन (रजि.) नाशिक प्रकाशन – मार्च १९५२ किंमत अडीच रुपये

-----------------------------------

देवडीवरचा मुजरा साधु संत महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकावू वाटतात. हातातही धरणार नाहीत कोणी, कारणे उघड आहेत. चालु घडीच्या समाज जीवनाचे बिनचुक मार्गदर्शन करण्यासारखे असतेच काय मुळी त्यात? आजवरच्या अनेक साधू संतांनी देव देवता धर्म व्रते दाने तीर्थयात्रा यांचेच प्रचंड बंड माजवून लोकांना देवखुळे नि धर्मवेडे बनवले. मोक्षाच्या भरंसाट कल्पनांनी कोटिकोटी अडाणी स्त्री पुरुषांना संसारातून उठवून भिकेला लावले. दगड माती धातूंच्या मुर्तींचे भजन पूजनाचे लोकांना वेड लावून त्यांना माणसांतून उठवले. माणुसकीला पारखे केले. माणसांपेक्षा दगड धोंडेच भाग्यवान ठरले. अन्न – अस्तर – आस-याला आंचवलेल्या माणसांसाठी त्यांची तरतुद करण्याऐवजी, देव देवळांच्या उभारणीसाठी आणि ऐदी बैरागी गोसावी भट भिक्षुकांना निष्कारण पोसण्यासाठी अब्जावधी रुपयांची खैरात चालु झाली. माणसांपेक्षा फत्तरी देवदेवतांची आणि त्या परान्नपुष्टांची प्रतिष्ठा वाढली, तिरस्करणीय बुवाबाजीचा जन्म येथेच झाला. माणुसकीची अवहेलना आणि बदनामी करणा-या या परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचे यत्न अनेक शहरी सुधारकांनी आजवर पुष्कळ केले. पण त्या बुद्धीवादी यत्नांची आंच लक्षावधी खेड्यांत पसरलेल्या अडाणी बहुजन समाजांपर्यंत जाऊन कधी पोचलीच नाही. आणि मुख्य अडचणीचा प्रश्न तर या कोटिगणती खेडूतांचाच आहे. त्यांच्या आचार विचारात आरपार क्रांति घडवण्यासाठी येथे पाहिजे जातीच. नुसता ‘जातीचा’ असूनही भागणार नाही. तर ज्या पूर्वीच्या साधू संतांनी देव-धर्म विषयक भ्रमिष्टवादाचा फैलावा केला, त्यांचाच ‘मातीचा’ तो असल्याशिवाय, क्रांतीचे हे महान कार्य तडीला जाणार नाही.

श्री. गाडगे बाबा त्यानि तसल्याच जातीचे नि मातीचे चालू घडीचे महान क्रांतिकारक ‘साधू’ आहेत. पण त्यांना कोणी साधू संत महाराज म्हटलेले खपत नाही. संतांविषयी त्यांना अपरंपार आदर, संत कोणाला म्हणावे, यावर अनेक पूर्व संतांचेच दाखले देऊन ते प्रवचन करू लागले, म्हणजे त्यांची रसवंती विलक्षण प्रेमादराने नाचू लागते “कुठे ते ज्ञानोबा तुकाराम एकनाथ कबिरासारखे मोठमोठे संत आणि कुठे मी? कोणत्या झाडाचा पत्ता?” ही कबुली त्यांच्या प्रत्येक कीर्तनात असते. देवकोटी किंवा संतकोटीपेक्षा साध्यासुध्या मानवकोटीचेच जिणे पत्करून मानवतेची कट्टर अभेदाने सेवा करित राहण्यातच मानव जन्माचे सार्थक आहे, हा बाबांच्या आचार धर्मातला एक ठळक कटाक्ष. त्यांची धर्मविषयक मते आजकालच्या सुधारकांनाही लाजवतील इतकी उत्क्रांत आहेत. स्पष्टच म्हणायचे तर, अस्पृश्योद्धार, पशू-पक्षि-हत्या बंदी, अमानुष नि खुळचट रूढींचे उच्चाटन आणि आजकाल महत्त्व पावलेला खराट्याचा धर्म, महात्मा गांधीजींच्या आतल्या आवाजात स्फुरण पावण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी गाडगेबाबांनी प्रत्यक्ष प्रचारात आणि चारात आणलेला होता.

फरक इतकाच की गांधीजींच्या लहानसान हालचालींच्या मागेपुढे प्रसिद्धी-तंत्राचे पाठबळ मोठे आणि गाडगे बाबांना नेमके त्याचेच वावडे (१) गांजा,