आई थोर तुझे उपकार

आजी आणि आई यांचा प्रबोधनकारांवर खूपच प्रभाव होता. त्या दोघींच्याच संस्कारांनी प्रबोधनकार घडले. स्त्रियांच्या उद्धारासाठीची त्यांची कळकळ, स्त्रीविषयीचा उदार दृष्टिकोन यात ते काळाच्या खूप पुढे होते. या विचारांची एक तिरीप आई या छोटेखानी पुस्तिकेत दिसते. प्रबोधनच्या नवमतवादी ग्रंथमालेत आई थोर तुझे उपकार ही पुस्तिका छापून आली होती. पण हा दीर्घलेख प्रबोधनकारांच्या इतर अनेक पुस्तिकांप्रमाणेच ‘प्रबोधन’मधे सर्वात आधी छापून आला होता.

------------------------------

मातृदिनाप्रीत्यर्थ प्रबोधनाची वार्षिक भेट

आई थोर तुझे उपकार

लेखक मुद्रक व प्रकाशक-

केशव सीताराम ठाकरे ३४५, सदाशिव,

पुणे शहर

किंमत- बिनमोल

------------------------------

आई

जग हे जितके चमत्कारिक आहे, तितकेच ते चमत्कारपूर्ण आहे. विधात्याने निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे आणि विश्वविधात्याच्या करणीवर ताण करून दाखविण्यासाठी मनुष्यांनी सुद्धा या नानारत्ना वसुंधरेला ‘अहं ब्रह्मास्मि’ या प्रत्यक्ष जाणिवेने नाना आश्चर्याणि वसुंधरा बनविण्याची शिकस्त चालविली आहे. कल्पनेच्या समुद्रमंथनातून निर्माण केलेली अनंत चमत्कारिक रत्ने माणसांनी वसुंधरेच्या या अजब अजायबखान्यात व्यवस्थित मांडून ठेविली आहेत. ती पाहिली की आपले हृदय कौतुकाने भरून येते. मनोवृत्ती विस्मयाने चकित होते आणि स्तुतीचा निदान एक तरी गोड उद्गार निघावा म्हणून जिव्हा योग्य शब्द योजनेसाठी वळवळते. पण ‘वाहवा’ एवढ्या उद्गारावरच वाक्शक्तीची मजल खुंटल्यामुळे अखेर हळहळते. आग्र्याचा ताजमहाल, मिस्र देशांतले पिरामिड, स्वच्छंद वातावराला हुकमी संदेशवाहक बनविणारा मार्कोनिग्राम किंवा बिनतारी टेलीफोन, दूरस्थ किंवा कालवश झालेल्या माणसांची भाषणे व आल्हादकारक गाणी वाटेल तेव्हा वाटेल तेथे प्रगट करणारा फोनोग्राफ, इत्यादी अनेक मनुष्यनिर्मित चमत्कारांची शाब्दिक संभावना करिताना, हृदयात उचंबळणा-या कुतूहल-लहरींचा थयथयाट व्यक्त करताना, माणसाची वाक्शक्ती ‘वाहवा’ या एकाच शब्दोच्चाराच्या उंबरठ्यावर कुंठित होते.

निसर्गनिर्मित चमत्कारांविषयीही हाच प्रकार, उदाहरणार्थ, आपण उषःकालचा चमत्कार कवीच्या काव्यमय चष्म्यांतून पहाण्याचा यत्न करू. एका विशेष चैतन्याच्या अवर्णनीय सुगंधाने ज्याचे अणुरेणू परिमळयुक्त झाले आहेत, असा प्रभातीचा प्रबोधक वातावरणाचा जलधी मंदमंद वायूच्या रहाळ्या मारीत आहे. सृष्टीदेवता त्यात जलविहार करीत आहे. इतक्यात ‘भगवान् सविता आले की काय?’ हे पाहण्यासाठी तिने आपला हसरा टवटवीत चेहरा जलपृष्ठावर काढताच दवकण तिच्या मस्तकावर मौक्तिकांचा सडा पाडीत आहेत. जलविहारामुळे भिजून चिंब झालेला सृष्टीचा केशकलाप पिळून स्वच्छ पुसण्यासाठी किरमिजी अरुणाचे रेशमी फर्द उषादासीने झटकन् पुढे करून, दाही दिशा उजणा-या तेजाचा सुगंधी विश्वंभर धूप सर्वत्र प्रसृत केला आहे. धूपाच्या घमघमाटात मग्न असताच, भगवान सूर्यनारायण आपला एकच हात पुढे करून सृष्टीच्या निटिलावर सुवर्ण कुंकुमाचा रेखीव टिळा रेखीत आहे. बोलबोलता सा-या विश्वाची नजर चुकवून देवीने भजरी सहस्ररश्मी पैठणी परिधान केली आहे. अंगावर दिसतो न दिसते असा विरळ धुक्याचा शालू पांघरला आहे.

अवघ्या तीन पावलांत सा-या त्रिभुवनाचा आक्रम करीन, या विजयाकांक्षेने फुरफुरलेले आले लालबुंद मुखबिंब भगवानजीने क्षितिजपटलाच्या वर काढताच, उत्फुल्ल सुमनदलांच्या द्वारे सृष्टी दिव्य स्मितहास्य करीत आहे. अंगावर पांघरलेला धुक्याचा शालू अलगज उडवून आलिंगनासाठी सवित्याने पसरदेले विश्वस्पर्शी विशाळ बाहू पाहून, चंडोलादि गायकगण ‘आस्ते कदम’ च्या ललका-या तारस्वरांत भिरकावीत आहेत आणि या अतिप्रसंगाचा बोभाटा सा-या विश्वात दुमदुमल्यामुळे सृष्टीदेवता विनयाच्या सात्विक मुरडणीने लाजली आहे. हा सर्व हृदयस्पर्शी चमत्कारिक देखावा पाहून मानवांच्या वाक्शक्तीने मुग्धतेच्या आड लपून आपल्या अंतस्थ कुतूहलाचे व्यक्तीकरण पाणी भरल्या डोळ्यांनी करण्यापलीकडे अधिक काय करावे बरे? मुळी विश्वविधाताच जर गूढ व अकल्पनीय, तर त्याची विश्वरंगभूमीवर उधळलेली नाना आश्चर्याणि वसुंधरा तितकीच गूढ व अवर्णनीय का असू नये? पण या वसुंधरेच्या चमत्कार-खाणीचाही गर्वपरिहार करणारा एक अद्वितीय चमत्कार आहे. चमत्कार वाटतो तो हाच की या चमत्काराचा व प्रत्येक भूतजाताचा अत्यंत निकटचा संबंध असूनसुद्धा त्या चमत्काराचा चमत्कार आम्हांला भासू नये, हे किती चमत्कारिक? खरोखर मानवी दुनिया बुद्धिमत्तेच्या चौकसपणाचा कितीही डौल मिरवो, ती फारच चमत्कारिक खरी. साता समुद्रापलीकडे दिसते, पण