मराठी वाङ्मयकोश

मराठी वाङमयकोश हा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजवरच्या हजारो मराठी लेखकांची माहिती यात आहे. त्यातला प्रबोधनकारांवरचा हा उतारा. यातली माहिती खूपच त्रोटक आहे. अन्य अनेक लेखकांच्या तुलनेत प्रबोधनकारांचं योगदान खूप मोठं असूनही त्यांनी योग्य जागा देण्यात आलीय, असं वाटत नाही. या ग्रंथाच्या संपादक मंडळात मान्यवर अभ्यासक मंडळी असूनही त्यांना प्रबोधनकारांची साधी जन्मतारखेची नोंद मिळू नये, हे आश्चर्यच.

ठाकरे, केशव सीताराम ( १८८५ ते २० नोव्हेंबर १९७३)

इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते. जन्म पनवेल (जि. कुलाबा). शिक्षण पनवेल व देवास, मॅट्रिकपर्यंत. त्यानंतर सरकारी नोकरी, टायपिस्ट, छायाचित्रकार, तैलचित्रकार, जाहिरात व्यवसाय, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे विविध उद्योग त्यांनी केले. पण अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो ‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने. ‘सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट’ करण्यासाठी त्यांनी प्रबोधन नियतकालिक काढले, त्यातून सामाजिक राजकीय विषयी ठाशीव भाषेत परखडपणे मांडले. कुमारिकांचे शाप (१९१९), भिक्षुकशाहीचे बंड (१९२१) हे वैचारिक ग्रंथ व खरा ब्राह्मण (१९३३), विधिनिषेध (१९३४), टाकलेले पोर (१९३९) ही नाटके त्यांनी समाजप्रबोधनासाठी लिहिली. सातारचे पदच्युत राजे प्रतापसिंह यांना इंग्रजांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट इंग्लंडपर्यंत जाऊन झगडणारा त्यांचा स्वामिभक्त सेवक रंगो बापूजी यांचा साद्यंत इतिहास त्यांनी प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी (१९४८) या ग्रंथात वर्णिलेला आहे. याशिवाय त्यांची इतिहासविषयक अन्य पुस्तके अशीः ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास (१९१९), हिंदवी स्वराज्याचा खून (१९२२), कोदंडाचा टणत्कार (दु. आ. १९२५) व रायगड (१९५१). संत रामदास (इंग्रजी, १९१८), पंडिता रमाबाई (१९५०), संत गाडगेमहाराज (१९५२) यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे. माझी जीवनगाथा (१९७३) हे आत्मचरित्र व जुन्या आठवणी (१९४८) हे आठवणीवजा पुस्तक हे त्याचे अन्य उल्लेखनीय लिखाण.

ठाक-यांचा बाणा लढाऊ. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, ब्राह्मणेतर चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात त्यांनी हिरिरीन भाग घेतला, तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे.

संदर्भ प्रकार: