लोकमान्य ते महात्मा: Page 10 of 11

झालेला असला, तरी त्याच बीजारोपण ठाकरे यांनी शाहू छत्रपतींना दिलेल्या वचनाच्या वेळीच १९२२ मध्ये झाले होते. त्याच्याही पूर्वी ठाकरे यांनी शाहू छत्रपतींना प्रतापसिंहाची आणि रंगो बापूजींची कर्मकहाणी जेव्हा ऐकवली होती, तेव्हाच शाहू महाराजांचे अंतःकरण हेलावून गेले होते व त्याच विषयावर व्याख्याने देऊन ब्राह्मणेतरांमध्ये जागृती निर्माण करण्याची सूचना त्यांनी ठाकरे यांना केली होती.
त्यानुसार ठाकरे यांनी सातारच्या राजवाड्याच्या परिसरात दिलेली व्याख्याने महाराष्ट्रात तुफान गाजली. त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळाली. ब्राह्मणेतर चळवळीला या निमित्ताने एक नवे हत्यार उपलब्ध झाले.
परंतु ब्राह्मण–ब्राह्मणेतर वादाच्या पलीकडे जाऊन प्रतापसिंह व रंगो बापूजी यांच्या हकिगतीकडे पाहिले असता निखळ मानवी संबंधाच्या पातळीवरही कोणाही सहृदय माणसाची सहानुभूती त्यांना मिळू शकते. ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर हे अस्सल चित्पावन ब्राह्मण, परंतु त्यांनीही ठाकरे यांची बाजू घेऊन त्यावेळी ते चालवीत असलेल्या ‘टिळक’ पत्रातून तसे लिखाण केले. इतकेच नव्हे, तर जेव्हा जेव्हा त्यांचा व ठाकरे यांच्या भेटीचा योग आला, तेव्हा तेव्हा ‘काय बाबा, आमच्या रंगो बापूजीचे काय झाले?’ हा त्यांचा प्रश्न बिनचूक ठरलेला. त्यांच्या अकाली मृत्यूपर्यंत हे टुमणे सारखे चालू असे.
समकालीन राजकारणाच्या संदर्भात इतिहासाचा अन्वयार्थ नेहमीच लावण्यात येत असतो व त्याचा हत्यार म्हणून उपयोगही करण्यात येत असतो, याला रंगो बापूजीचे प्रकरण अपवाद असायचे काही कारण नाही. ठाकरे यांनीही मुळात या प्रकरणाची मांडणी तशीच केली होती. गांधी व त्यांचे टिळकपक्षीय ब्राह्मण विरोधक हा समकालीन संदर्भ त्याला त्यांनी स्वतःच पुरवला होता. त्यांची उपरोक्त सातारा व्याख्याने ऐकणा-या कवी तुकाराम आणि सदानंद या मराठा शाहिरांनी त्यावर पोवाडे रचून त्यांचा खेड्यापाड्यात प्रचार केला. या पोवाड्यांमधील काही ओळी समकालीन राजकारणावरच आहेत –
‘स्वराज्य आधि होते ते घालवून।
बसले आपापल्या जागी जाऊन।
गांधी महाराजांना पुढे करून।
स्वराज्याता मागता भटजी आपण।
लाज कशी नाही दादा।।’
‘आवटे-गुंजाळ जसे पुण्याला।
लागले भटांच्या नादाला।
अप्पासाहेब तसाच भटजीला।
सामील झटपट झाला।।’
‘केळकर नरसू केसरीवाला।
असहकारितेस रुकार दिला।
दुटप्पी नेहमी वागण्याला।
चळवळीस राजीनामा दिला।।’
१९२२ चे ठाकरे यांचे हे संदर्भ १९४८ च्या जानेवारीतही सुटले नव्हते. युद्धाच्या सिंहावलोकनात ते लिहितात, ‘‘सत्तावनी वीरांना सरंजामशाहीपेक्षा देशाच्या राजकीय मोक्षाची विशेष कल्पना काहीच नव्हती. महाराष्ट्रात तर पेशवाईच्या म्हणजेच ब्राह्मणी सत्तेच्या पुनर्घटनेशिवाय ब्राह्मण क्रांतिकारकांच्या मस्तकात दुसरे वेडच नव्हते. आजही ते नाहीसे झालेले नाही. महात्मा गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी हे लोक स्वतःला ‘राष्ट्रीय’ म्हणवीत असत. यांचा पक्ष राष्ट्रीय, सभा राष्ट्रीय, पुढारी राष्ट्रीय, त्यांची व्याख्याने राष्ट्रीय, वर्तमानपत्रे, कीर्तने, ग्रंथ, गणपतीचे मेळे सर्व काही राष्ट्रीयच राष्ट्रीय. आता नेमका तोच ‘राष्ट्रीय’ शब्द शिवी म्हणून काँग्रेसी राजकारणाला वापरून ते आता ‘हिंदुत्वनिष्ठ म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात.’’
‘‘पेशवाईचा नायनाट झाल्यानंतर देशोद्धाराच्या सबबीखाली राज्यक्रांती घडवण्यासाठी जे जे धाडसी ब्राह्मण पुढे आले, त्यांनी शिवाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. गुप्त संघटना, शपथा, दीक्षा, कवायती वगैरे... वासुदेव बळवंतांनी तेच केले आणि ‘अभिनव भारता’च्या तात्याराव सावरकरांनीही तेच केले.’’ असे सांगून ठाकरे पुढे लगेचच, ‘‘दोघांनाही ‘विनायको प्रकुर्वाणाम् रचयामास वानरम्’ असाच अनुभव आला, असा शेरा मारतात.
ठाकरे यांच्या मते ‘लोकोत्तर राष्ट्रवीरांच्या नुसत्या नकला करून इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्याचा अट्टहास करणा-यांनी कालौघाबरोबर मानवी जीवनाची नि कर्तव्याची मूल्येही भराभर बदलत असतात, इकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शिवाजीने धर्माच्या नावाने हाक मारून हिंदूंना स्वराज्यप्राप्तीसाठी चवताळून उठवले आणि औरंगजेबाचा पाठकणा ठेचला. त्या काळाला ते ठीक झाले. आज कोणी त्याच मंत्राने हिंदू संघटन करण्याची फुशारकी मारील, तर काही साधणार नाही. शिवाजीच्या काही गोष्टींच्या नुसत्या नकला करणा-यांना त्याने आपला लोकसंग्रह केवढ्या सर्वस्पर्शी तत्त्वांवर, किती निःस्वार्थी बद्धीने आणि जनतेचा विश्वास संपादून केला, याचे मर्म अजूनही उमगलेले दिसत नाही.’’
ठाकरे यांच्या विवेचनातील शेवटचा म्हणजे लोकसंग्रहाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो टिळकांना अचूक समजला होता. सावरकारांची गाडी कोठे घसरली असेल, तर इथेच. सावरकारांच्या

संदर्भ प्रकार: