लोकमान्य ते महात्मा: Page 9 of 11

हिंदुहिताच्या बुरख्याआडून केलेले ब्राह्मण वर्चस्ववादाचेच राजकारण असल्याचीही त्यांची खात्री होती.
ठाकरे यांचा हा दृष्टिकोन ‘प्रतापसिंह आणि रंगो बापूजी’ या त्यांनी गांधीहत्येपूर्वी अवघ्या १५ दिवस अगोदर प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून प्रकट झालेला आहे. हा ग्रंथ लिहून पुरा करण्याचे वचन ठाकरे यांनी शाहू छत्रपतींना छत्रपती मृत्यूशय्येवर असताना ५ मे १९२२ रोजी दिले होते. ते ठाकरे यांनी पाळले. ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या ‘सिंहावलोकना’ या भागात प्रबोधकारांनी सन १८१८ ते १८५७ या कालखंडाचा आढावा घेतला आहे. ठाकरे यांनी सिंहावलोकन लिहिले, तेव्हा फाळणीच्या निमित्ताने गांधींवर भरपूर टीका होत होती व महाराष्ट्रातील सावरकरांचे हिंदुसभावाले अनुयायी या टीकाकारांमध्ये अग्रेसर होते. ठाकरे यांनी सरळसरळ सावरकरांवरच हल्ला चढवला आहे. ते लिहितात, ‘‘मराठी क्रांतिकारक तात्याराव सावरकर यांनी सन १९०८ मध्ये (म्हणजे ऐतिहासिक सत्याला मुरड घालून इतिहासाची चैतन्यप्रेरक कादंबरी किंवा काव्य बनवण्याचे आणि हिंदवी अथवा ब्राह्मण वीरवीरांगनांच्या अंगी असतील नसतील ते सारे सद्गुण चिकटवून, त्यांना ‘अप टु डेट’ राजकारणी जाणिवेचे देशभक्त बनवण्याचे युग चालू असताना) लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाच्या कालपरवाच्या पुनर्जन्मापासून तर तो प्रकार पुन्हा बेगुमान नाचू लागला आहे.’’
ठाकरे यांचा कटाक्ष सावरकरांनी राष्ट्रीय इतिहासाच्या लेखनातून केलेल्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या उदात्तीकरणावर आहे, हे वेगळे सांगायला नको. या देशभक्तांच्या बलिदानाबद्दल ठाकरे आदर व्यक्त करतात, पण त्यांचा लोकसत्ताक राज्य स्थापण्याचा इरादा होता, अशा अनैतिहासिक मांडणीवर ते आक्षेप घेतात. हाच आक्षेप ते वासुदेव बळवंत व खुद्द सावरकरांच्या ‘अभिनव भारत संस्थे’वरही घेतात. आणखी एक मौज म्हणजे सावरकरांनी आपल्या या ग्रंथात रंगो बापूजी या चांद्रसेनीय कायस्थ प्रभूला ब्राह्मण बनवला. त्याचाही समाचार ठाकरे घेतात. सावरकरांनी ही गोष्ट नजरचुकीने झाल्याचा खुलासा केला, हा भाग वेगळा. पण तरीही त्यांचे खाजगी चिटणीस दामले यांनी, ‘यापूर्वी ठाण्याच्या आठवले यांनी ही चूक निदर्शनास आणली होती, परंतु पुढे छापखान्यात मजकूर गेल्यावर काय भानगड झाली न कळे!’ असे ठाकरे यांना कळवले. त्यावर ठाकरे यांची प्रतिक्रिया, ‘सगळ्याच भानगडी! त्यात या भानगडीचे काय एवढेसे?’
ठाकरे यांच्या मते ‘‘आम्ही सांगू तोच खरा इतिहास, ठरवू तोच प्राणी देशभक्त, आमचेच पंचांग लोकमान्य, स्वदेशाभिमान काय तो आम्हांला ठावा, आम्हीच तो गावा नि इतरांना सांगावा, ब्राह्मणेतर कधीच गेले नाहीत त्या गावा, असा जो कांगावा या दांभिक हिंदुत्वनिष्ठांच्या ’राष्ट्रीय’ ठणठणाटात दिसून येतो, त्यात सत्याभिमान, इतिहासभक्ती, साहित्यसेवा, हिंदूंचा उद्धार, लोकशाहीची विवंचना वगैरे काहीही नसून मयत पेशवाईच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुनरुद्धाराचा दुर्दम्य अट्टहास मात्र दिसून येतो.’’
पूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि गांधींच्या चळवळीत काय भेद आहे, हे स्पष्ट करताना ठाकरे लिहितात, ‘‘वासुदेव बळवंतांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय, अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय, एकजात सारे ब्राह्मणच होते. खरा हिंदुस्थान शहरात नसून खेड्यापाड्यांत आहे. तो शेतकरी, कामक-यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय या शहरी शहाण्यांच्या पोशाखी चळवळी फुकट आहेत, हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनवण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरदस्त शक्ती कशी बनली, हा इतिहास तुमच्या-आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही. जातपात, धर्म, स्पृश्यास्पृश्य, धर्म, यच्चयावत
सा-या भेदांना महात्मा गांधींच्या काँग्रेसने सफाचट तिलांजली देऊन ख-याखु-या लोकशाहीचे, लोकशाही हिंदी स्वराज्याचे स्वप्न आज सिद्ध करून दाखवल्यामुळे पेशवाई राज्याच्या पुनर्घटनेने हिंदुस्थानला आबाद करण्यास सजलेल्या जातीयवादी संघांना चालू घडीच्या राजकारणात द्वारपालाचीही जागा नाही.’’
स्वातंत्र्य मिळाले, तरी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा समंध अद्याप खाली उतरला नव्हता, हे ठाकरे यांच्या या पुस्तकावरून लक्षात येते व या पार्श्वभूमीवर गांधीहत्या आणि नंतरच्या प्रतिक्रियाही समजावून घेता येतात.

***

प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी यांच्यावरील केशवराव ठाकरे यांचा ग्रंथ १४ जानेवारी १९४८ या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळात प्रसिद्ध

संदर्भ प्रकार: