लोकमान्य ते महात्मा: Page 6 of 11

जवळकर एकटाकी घेत आणि दुस-या दिवशी वाचकांना जुगलबंदी वाचायला मिळे.
मत्सर, द्वेष आणि संशय यांनी प्रदूषित झालेल्या अशा जातीय वातावरणात ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तक बाहेर पडले. ती या सा-याची परमावधी होती. ठाकरे सांगतात, ‘जेधे-जवळकर जरी दररोज माझ्या भेटीला सदाशिव पेठेत यायचे, तरी या चोपड्याबद्दल मात्र त्यांनी मला कसलाच सुगावा लागू दिला नाही.’
रस्त्यावर ओरडत जाऊन पुस्तक विकणा-या मुलाकडून ठाकरे यांनी ते पुस्तक आठ आणे किंमत देऊन खरेदी केले. घरी जाऊन वाचले. ‘बामण-बामणेतर वादाने आधीच मनस्वी तापलेल्या पुण्यात टाकलेला हा जवळकरी बॉम्ब आणखी आग भडकवणार,’ याविषयी त्यांना संशयच रला नाही. त्याप्रमाणे तो भडकलादेखील. ल. ब. भोपटकरांनी लेखक, प्रकाशक आणि प्रस्तावनालेखक म्हणजे जवळकर, जेधे आणि बागडे यांच्यावर रीतसर फिर्याद गुदरली व त्यामुळे या त्रयीची तुरुंगात रवानगी झाली. तो दिवस शनिवारचा असल्यामुळे निदान दोन-तीन दिवस तरी त्यांना जामीन मिळणार नव्हता. ठाकरे काहीही सांगत असले, तरी तेव्हाच्या अनेक ब्राह्मण नेत्यांना हे पुस्तक स्वतः केशवराव ठाकरे यांनीच लिहिले, असे वाटत होते. ‘मजूर’मधील लेखही त्यांना ठाकरे यांच्याच हातचे वाटत; कारण काल परवा रटफ शिकू लागलेली ही मरगठ्ठी थोडीच इतके सफाईदार, शैलीबाज, ठसकेदार मराठी लिहू शकतील?’ असे त्यांना वाटे. ‘देशाचे दुष्मन’ या पुस्तकातील भाषा आणि विधाने पाहून तर त्यांनी सिद्धांतच काढला की, हे काम ठाकरे यांच्याशिवाय दुस-या कोणाचेही नाही. जवळकर खटल्याची सुनावणी चालू असताना भोपटकर वकील गुरगुरत म्हणाले, ‘या पुस्तकाचे लेखक म्हणून जवळकरांनी जरी आपले नाव घातले असले, तरी खरा लेखक कोण आहे, तो लवकरच आम्ही बोर्डावर आणणार आहोत.’ ठाकरे हे ‘जेधे-जवळकरांचे सूत्रधार’ असल्याची तेव्हा टिळक पक्षीयांची समजूत असल्याचे ठाकरे यांनीच नमूद केले आहे.

***

समाजाच्या नकारात्मक कार्यामुळे व समाजाच्या नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे नाराज भाऊरावांनी ‘कु-हाड’ नावाचे साप्ताहिक काढण्याची घोषणा केली. घोषणापत्रात ते म्हणतात, ‘आता कोणाची भीडभाड धरून चालणार नाही. जो उठतो, तो भोळ्या अज्ञान रयतेला फसवून स्वतःची तुंबडी भरतो. ब्राह्मणेतर म्हणवतो आणि जातिभेदाचा धिंगाणा घालतो. सत्यशोधक म्हणवतो आणि नवीन भिक्षुकशाहीचे थेर माजवतो; पण रयतेचा खरा वाली कोण? समशेरबहाद्दरांनी समशेरी परजल्या, लेखणीबहाद्दरांनी लेखण्या झिजवल्या, बड्याबड्यांनी आपल्या जिव्हा सुकवल्या, फंडगुंडांनी आपापल्या झोळ्या भरल्या, लबाड टोळभैरव स्वयंसेवक बनले, ऐदी श्रीमंत जनतेचे अहंमन्य पुढारी बनले. स्वार्थापुढे कोणाला काही दिसत नाही.’’
संकल्पित ‘कु-हाड’ पत्राचे संपादक भाऊराव पायगोंडा पाटील ऐतवडेकर यांनी अलंकारिकतेने या पत्रकात स्वतःला ‘कु-हाडीचा दांडा’ म्हणवून घेतले आहे. हा दांडा आता वर उल्लेखिलेल्या ‘सर्वांचा यथास्थित समाचार घेण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रात आपल्या स्पष्ट बोलाचा धुमाकूळ घालणार आणि रयतेच्या वतीने तिच्या वाजवी हक्कांसाठी बेमुर्तपणे झगडणार... कु-हाडीला ब्राह्मण मान्य नाही, ब्राह्मणेतर मान्य नाही, सत्यशोधक मान्य नाही, कोणी नाही. जातिभेद आणि पक्षभेद रसातळाला नेऊन रयतेच्या लोकशाहीला खडबडून जागृत करीन, नाहीतर बोथट होऊन सांदीला पडेन, हीच कु-हाडीची प्रतिज्ञा!’’
साप्ताहिक ‘कु-हाड’ची ही जाहिरात ता. १ नोव्हेंबर १९२३ च्या ‘प्रबोधन’ पत्रातून प्रकाशित झाली होती. ‘प्रबोधन’चे संपादक केशवराव ठाकरे भाऊरावांप्रमाणेच सत्यशोधक ब्राह्मणेतर असून भाऊरावांचे घनिष्ट मित्र होते. त्यामुळे भाऊरावांच्या या उपक्रमाला त्यांचाही पाठिंबा असणार, हे उघड आहे. ब्राह्मणेतर चळवळीत या वेळी कौन्सिलातील राखीव जागेच्या वाटणीवरून वाद चालले होते व फूटही पडत होती. पक्षातील मराठ्यांच्या वर्चस्वाविरुद्ध इतर जातींच्या ब्राह्मणेतरांनी उघडउघड बंड पुकारले होते; परंतु खुद्द मराठ्यांमध्ये तरी ऐक्य होते काय?
१९२४ मध्ये गांधी चिपळूणकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले होते. तेव्हा केशवरावांच्या निमंत्रणावरून त्यांनी जेधे मॅन्शनमध्ये जाऊन पानसुपारीचा स्वीकार केला. ही गोष्ट गायकवाड वाड्यातील मंडळींना आवडणारी खासच नव्हती. तो काळ मेळेवाल्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याचा होता. ‘सत्यशोधक की ख्रिस्तसेवक’ आणि ‘देशाचे दुष्मन’ अशा शिवराळ चोपड्यांचा व ‘मजूर’ आणि ‘संग्राम’ असा गालिपत्रांचा होता. या काळात ‘जागरूक’कार कोठारी केळकरांच्या पक्षाकडे सरकत असले,

संदर्भ प्रकार: