लोकमान्य ते महात्मा: Page 5 of 11

यांचीही चांगली मैत्री होती. त्यांचे व जवळकरांचे सख्य जमायला वेळ लागायचे काहीच कारण नव्हते. त्यांनी ‘प्रबोधन’ नावाचे पत्र सुरू केले. ‘प्रबोधनकार’ हे बिरुद त्यांना कायमचेच चिकटले. तो दिवस होता १६ ऑक्टोबर १९२१.
‘प्रबोधन’कार पहिल्यापासूनच ब्राह्मणेतरांमधील हिंदुत्वनिष्ठ प्रवाहाचे प्रतिनिधित्व करीत होते, याचा निर्देश यापूर्वी केलेला आहेच. ‘प्रबोधन’च्या पहिल्याच अंकातील त्यांच्या ध्येयनाम्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. ते म्हणतात, ‘आजचा प्रसंग असा बिकट आहे की, हिंदूंना सा-या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटकाच अशी आहे की, हिंदूंच्या संस्कृतीची मान सा-या जगाच्या राजकारणाच्या चाकात सापडलेली आहे. चालू घडीचा मामला असा आहे की, सर्व भेदभावांच्या सफाई संन्यास करून हिंदुजनांना निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणा-या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिंदुत्व, आपले आत्मराज्य कायम ठेवून, हिंदू साम्राज्याच्या विशाल आकांक्षांनी हिंदी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून टाकले पाहिजे.’’
‘प्रबोधन’ पत्र हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे असूनही ब्राह्मणांनी त्याला ब्राह्मणेतरांचे पक्षपाती असे जातीय पत्र ठरवले. ‘ब्राह्मणांना अचकट विचकट शिव्या देणारे वृत्तपत्र’ म्हणून ‘प्रबोधन’ला क्षुद्र ठरवण्याचा खटाटोप करणा-या क्षुद्रांबद्दलची चीड ठाकरे आत्मवृत्तात व्यक्त करतात.
भाऊराव पाटील आणि केशवराव ठाकरे साता-याकडे धनजीशेठ कूपरकडे काम करीत. ठाकरे यांनी पुण्यात बुधवार पेठेतील एक छापखाना विकत घेतला व नातूंच्या घरात भाड्याने जागा घेऊन पाक्षिक ‘प्रबोधन’ची प्रसिद्धी ते पुण्यातून करू लागले. तेव्हाची सार्वत्रिक भावना कशी होती, ते त्यांच्याच शब्दांत वाचण्यासारखे आहे. ‘‘ब्राह्मणेतर चळवळीतला एक नाठाळ लेखक नि वक्ता ठाकरे पुण्यासारख्या ब्राह्मणनगरात येऊन प्रकाशनाचे ठाण मांडतो म्हणजे काय? तशात एक जातिंवत ब्राह्मण त्याला आपला छापखाना देतो किंवा विकतो म्हणजे तरी काय? सारा चळवळ्या ब्राह्मणवर्ग माझ्या हालचालींवर काकदृष्टी ठेवून बसला. तोवर ब्राह्मणेतरी चळवळ पुण्यात चालायची म्हणजे (कै.) श्रीपतराव शिंदे यांच्या साप्ताहिक ‘विजयी मराठा’ आणि जेधे, जवळकर यांच्या नव्या दमाच्या चळवळी इतक्याच. तशात हा ठाकरे आता येथे आल्यावर मग हो काय? शुक्रवार पेठेला विशेष जोर चढणार! तशात मी पुण्यात पाऊल ठेवताच केशवराव जेधे, जवळकर, राजभोज आणि विशेष म्हणजे श्रीधर टिळक इत्यादी मंडळींच्या बैठका रोज माझ्या माडीवर होऊ लागल्यामुळे तर त्यांच्या अंदाजाला विशेष पालवी फुटू लागल्यास नवल कसले?’’
ठाकरे पुढे सांगतात की, ‘‘येनकेन प्रकारेण ठाकरे यांचे पुण्यात बस्तान बसू द्यायचे नाही, असे ठरवून सनातनी कंपूने छापखान्याच्या मूळ मालकाला हाताशी धरून कायदेशीवर कारवाईचा आव आणून छापखान्याची नासधूस करून त्याला टाळे ठोकले. अशा बिकट प्रसंगी काका गाडगीळ आणि वासूकाका जोशी यांची मदत घेऊन ठाकरे यांनी त्यावर मात केली. छापखाना त्यांच्या हातून निसटला खरा; पण तो त्यांनी मूळ मालकालाही पचू दिला नाही. अर्थात, त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला आणि जिद्दीने व जोमाने त्यांनी नवा छापखाना सदाशिव पेठेत घातला. ‘बुधवारातून हुसकावला, लेकाचा सदाशिव पेठेत उपटला’ म्हमून कारवाईखोर नारोसदाशिवशनवा-यांच्या अंगाचा तिळपापड उडाला. तो काळच तसा होता. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत आडवा विस्तव जात नव्हता. खरा जातीयवाद त्या काळीच उफाळला होता.’’
‘विजयी मराठा’, ‘प्रबोधन’ यांच्या जोडीस आता जवळकरांनी लाडांना हाताशी धरून ‘मजूर’ काढले. ‘मजूर’मधील टीकेला उत्तर देण्यासाठी भोपटकरांचा ‘भाला’ अपुरा पडू लागला म्हणून गणपतराव नलावडे यांना पुढे करून ‘संग्राम’ नावाचे पत्र काढण्यात आले. ‘मजूर’-‘संग्राम’च्या टकराटकरीने पुणे दणाणून गेले. दोन्ही पत्रे शनिवारी निघायची. विशेष म्हणजे त्या दिवशीच्या ‘संग्राम’मधील अग्रलेखातील टीकेला प्रत्युत्तर देणारा अग्रलेख त्याच दिवशीच्या ‘मजूर’मध्ये छापून यायचा. या चमत्काराची चर्चा सर्वत्र चाले. ‘मजूर’च्या कर्णपिशाच्चाचे रहस्य फारच मजेदार आहे. ‘संग्राम’ची छपाई वासूकाकांच्या ‘चित्रशाळा प्रेस’मध्ये होत असे. तेथील मराठे कंपोजर फायनल प्रुफांच्या दोन प्रती काढत. त्यातली एकीचा चोळामोळा-गुंडाळा करून चित्रशाळेच्या खिडकीतून बाहेर रस्त्यावर टाकून देत. ‘मजूर’ छापखान्यातील प्रभाकर चित्रे नावाचा तरुण कामगार रात्री आठच्या सुमारास काळोखात सायकलवर फेरी मारून प्रुफांचा बोळा उचलून पसार होई. त्यातील मजकुराचा समाचार

संदर्भ प्रकार: