लोकमान्य ते महात्मा: Page 4 of 11

आहे, किंबुहना गणपती हे दैवतच ब्राह्मणांचे आहे, या भावनेतून क्षत्रियांनी गणेशोत्सव न करता पर्याय म्हणून मुंबईत क्षत्रयोचित नवरात्र उत्सव सुरू करणा-यांमध्ये प्रबोधनकार ठाकरे आघाडीवर होते.
महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजीला आपले दैवत बनवले होते. आता शिवाजी स्वतः ब्राह्मणेतर असल्याने ब्राह्मणेतरांना व त्यातल्या त्यात मराठ्यांना शिवप्रेम वाटणे अगदी साहजिकच होते; परंतु हिंदुत्ववादी संघटनांनी वाढवलेले रामदासस्तोम त्यांना मान्य नव्हते आणि दुसरा मुद्दा असा की, अपवाद वगळता बहुतेक ब्राह्मणेतर हिंदू-मुसलमान प्रश्नाच्या बाबतीत संघादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांबरोबर नव्हते. या संदर्भात ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे यांनी २७ जून १९२७ च्या अग्रलेखात व्यक्त केलेली हिंदू संघटनेच्या चळवळीविषयीची भूमिका प्रातिनिधीक मानावी लागेल. ते म्हणतात, ‘‘आम्ही स्वतः या चळवळीला राष्ट्रीय संकट म्हणतो, याच कारण ही चळवळ हिंदूंचे संघटन करू शकत नाही; पण हिंदू-मुसलमानांत कायमची दुही मात्र ती निर्माण करीत आहे. हिंदू समाज आज सर्वस्वी दुबळा व असंघटित बनला आहे. हिंदू समाजात पाडण्यात आलेले उच्चनीच भेद आणि धर्माच्या नावावर माजवण्यात आलेली अनेक थोतांडे हीच हिंदू समाजाच्या आजच्या अधःपतनाची खरी कारणे आहेत. ही कारणे सर्वस्वी नष्ट झाल्याखेरीज हिंदू समाजाचे संघटन होणे किंवा त्याच्यातला दुबळेपणा निघून जाणे ही गोष्ट केवळ अशक्य आहे.
ब्राह्मणेतरांमध्ये मराठा जातीचे लोक बहुसंख्य असल्यामुळे आणि स्वतः शाहू महाराज मराठा असल्यामुळे या चळवळीत मराठ्यांचे प्राबल्य असणे साहजिक होते. स्वतः महाराजांपुरते बोलायचे झाल्यास क्षात्रजगद्गुरूपदी मराठा नेमण्याचा प्रसंग सोडला, तर त्यांनी मराठा-मराठेतर असा भेद केल्याचे दिसून येत नाही. पण तरीही चळवळीतील मराठा वर्चस्वाविरुद्ध कुरबुर पहिल्यापासूनच कमीअधिक प्रमामात चालू असायची. बोले, बागडे, मानूरकर, सबनीस, गुप्ते, ठाकरे, लठ्ठे, कोठारी, पाटील असे भंडारी, शिंपी, लिंगायत, कायस्थ, जैन, माळी समाजातील मातब्बर मराठेतर ब्राह्मणेतर तेव्हा कार्यरत होते आणि मराठा वर्चस्वाचा वास आला की, त्याबद्दल नाक मुरडूनच नव्हे, तर स्पष्टपण नापसंती व्यक्त करायला त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. वा. रा. कोठारी, मुकुंदराव पाटील, केशवराव ठाकरे ही मंडळी विलक्षण स्वाभिमानीही होती. प्रसंगी स्वतः शाहू छत्रपतींनाही खडे बोल सुनवायला ती कचरत नसत. बोले आणि कोठारी पुढे हिंदू महासभेत गेले. ठाकरे हिंदू महासभेत गेले नाहीत; परंतु ब्राह्मणप्रभुत्ववाद वगळता उरलेला हिंदुत्ववाद त्यांना अमान्य व्हायचे काही कारण नव्हते.
***

जेधे मॅन्शन कार्शील झाल्यावर परिस्थितीत पालट झाला. शरीरबळात ब्राह्मणेतर कमी नव्हतेच. त्याच्या आधारे ते जहालांच्या सभा उधळू लागले. एकदा तर खुद्द टिळकांनाच सभा सोडून जावे लागले, हे आपण पाहिले आहेच. शिवाय ब्राह्मणेतरांनी आता मेळेही काढले. ‘जागरूक’, ‘विजयी मराठा’ ही वर्तमानपत्रे होतीच. त्यात दिनकरराव जवळकर नावाच्या नव्या दमाचा तरुण कोल्हापूर गाजवून पुण्यात दाखल झाला. त्याची लेखणी फारच तिखट होती. ‘जागरूक’कार कोठारी यांचे प्रा. वा. गो. काळे यांच्यासारख्या नेमस्तांकडे जाणे-येणे असे. त्यांनी नेमस्त आणि ब्राह्मणेतर यांची युती करण्याची शक्कल लढवली, ती सुरुवातील तरी चांगलीच लाभदायक व फलप्रद ठरली. हा सारा प्रकार जहाल राष्ट्रवादी मंडळींना अनपेक्षित होता. एवढ्यानेही भागत नव्हते म्हणून काय, केशवराव ठाकरेही पुण्याला आले. त्यामुळे या संघर्षाला चांगलीच धार आली. ब्राह्मणेतरांचा हल्ला बोथट करण्यासाठी केळकरादिकांनी मग नलावडे, गुंजाळ, फुले, आवटे अशा ब्राह्मणेतरांना पुढे आणले. अर्थात ब्राह्मणेतरांच्या छावणीत या मंडळींची संभावना भटाळलेले, ‘ब्राह्मणांचे बगलबच्चे’ अशा शेलक्या शब्दांनी होत असे, हे वेगळे सांगायची गरज नाही. उलट ब्राह्मणेतरांना व सत्यशोधकांना धर्मद्रोही, देशद्रोही व मिशन-यांचे हस्तक असे संबोधले जाई.

***
पुण्यातील ब्राह्मणेतरांच्या पक्षाला आता मुंबईकर केशव सीताराम ठाकरे हे नव्या दमाचे कायस्थ येऊन मिळाले. ‘कोदंडाचा टणत्कार’ हे पुस्तक लिहून त्यांनी ब्राह्मण इतिहासकारांपुढे आव्हान उभे केले होते. साता-याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि त्यांचे एकनिष्ठ सेवक रंगो बापूजी यांची कहाणी व्याख्यानांमधून सांगून ठाकरे या राजाचा सनातनी ब्राह्मणांनी कसा छळ केला, याचा पाढाच वाचायचे. त्यांची व
साता-याचे सत्यशोधक भाऊराव पाटील

संदर्भ प्रकार: