लोकमान्य ते महात्मा: Page 3 of 11

प्रतापसिंह महाराज यांनीही केला होता. या प्रकरणात साता-याच्या परिघावर विखुरलेल्या ब्राह्मण संस्थानिकांनी महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेतली व त्यांची सूत्रे बाळासाहेब नातू यांनी हलवली. महाराज प्रतापसिंह यांना रंगो बापूजी गुप्ते या कायस्थ मानक-याने साथ दिली. शिवराय-बाळाजी आवजी व प्रतापसिंह–रंगो बापूजी अशा या जोड्याच दाखवता येतात. शाहू छत्रपतींच्याही मागे कायस्थ दिवाण रघुनाथराव दिवाण सबनीस होतेच. इतिहासाची अशीही पुनरावृत्ती होत असते.
प्रतापसिंह यांना झालेल्या मनःस्तापाची कारुण्यपूर्ण माहिती केशवराव ठाकरे यांनी शाहू छत्रपतींनी दिली, तेव्हा छत्रपती सद्गगदित झाले व त्यांनी या विषयावर ग्रंथ लिहायची सूचना केली. अच्युतराव कोल्हटकर यांनीही या सूचनेचा सतत पाठपुरावा केला. ठाकरे यांचा ‘प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी’ हा ग्रंथ उशिरा का होईना प्रसिद्ध झाला, चांगला गाजलासुद्धा. शिवाय या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानेही दिली. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात ब्राह्मणेतरांमधील चांद्रसेनीय कायस्थ असे अग्रेसर होते.
परंतु प्रतापसिंग यांचा लढा आणि शाहू छत्रपतींचा लढा यांत एक महत्त्वाचा फरक होता. प्रतापसिंह यांनी वेदोक्ताचा अधिकार उच्चकुलीन मोजक्या क्षत्रिय मराठ्यांपुरता असल्याचे मानले. त्यामुळे त्यांच्या लढ्याची सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. याउलट शाहू महाराजांनी वेदोक्ताचा हक्क खानदानी मराठ्यांपुरता न ठेवता तो व्यापक व्हावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मराठेतर जातीही आपण क्षत्रिय असल्याची भूमिका घेऊन वेदोक्त मागू लागल्या. खिलाफत मुसलमानांच्या तर वेदोक्त ब्राह्मणेतरांच्या प्रतिष्ठेचे मुद्दे बनले.

***

स्वतः शाहू छत्रपतींचे टिळकांच्या निधनानंतरचे वर्तन मात्र सौजन्य आणि सभ्यतेला धरून होते. टिळक, ‘सरदारगृहा’त आजारी आहेत, हे समजल्यावर छत्रपतींनी टिळकांच्या चिरंजीवांना श्रीधरपंतांना पत्र लिहून टिळकांनी हवापालट म्हणून मिरज या कोरड्या हवेच्या ठिकाणी महाराजांच्या बंगल्यात विश्रांतीसाठी राहायला यावे, असे कळवले होते. इतकेच नव्हे, तर त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी वासुदेवराव तोफखान्यांना पुण्यात श्रीधरपंतांकडे पाठवलेली होते. ‘पन्हाळा लॉज’मध्ये खास माणूस बसवून टिळकांच्या प्रकृतीविषयी ताजे वृत्त दर तीन तासांनी ट्रंककॉलने जाणून घेण्याची व्यवस्थाही छत्रपतींनी केली होती. साहजिकपणे टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर ‘सरदारगृहा’त पोहोचलेली सर्वात पहिली शोकप्रदर्शक तार छत्रपतींची होती.
अशा तारा, शोकप्रदर्शन या गोष्टी औपचारिक राजकीय शिष्टाचाराच्याही भाग असतात. त्यामुळे तो कोणी फारसा गंभीरपणे घेत नाही. परंतु टिळकांच्या मृत्यूनंतरची शाहूंची खरीखुरी प्रतिक्रिया ‘प्रबोधन’कार ठाक-यांनी ‘माझी जीवनगाथा’ या आत्मवृत्तात नोंदवली आहे, ती अधिक महत्त्वाची आहे. टिळक अस्वस्थ आहेत, हे समजल्यावर महाराजांनी आपले दोन-तीन दिवसांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले.
‘‘सुमारे ११ वाजता महाराज जेवायला बसले होते. तोच टिळकांच्या मृत्यूची बातमी येताच थाळा दूर लोटून महाराज आचवायला उठले आणि ‘संस्थानातल्या सा-या कचे-या ताबडतोब बंद’ करण्याचे हुकूम सोडण्याबद्दल दिवाणसाहेबांना खास निरोप गेला. दिवाणसाहेब येताच महाराज म्हणाले, ‘मास्तर, मर्दानी माणूस गेला! आता कोणाशी आपण लढा देणार? त्याच्यामागे सगळा सारा पोरकटांचा बाजार.’
छत्रपती या प्रसंगी ‘मरणान्ति वैराणि’ या भारतीय परंपरेला अनुसरूनच वागले, असे म्हणावे लागते.

***

ब्राह्मणेतरांचे आणि हिंदुत्ववाद्यांचे व विशेषतः टिळकांची परंपरा सांगणा-या हिंदुत्ववाद्यांचे संबंध कसे होते, याचाही विचार करायला हवा. या काळात ब्राह्मणेतर गांधींबरोबर नव्हते, हेही सांगायला हवे. गांधींबरोबर जायचे की नाही, या वादातील अनुकूल-प्रतिकूल पक्ष हे ब्राह्मणांमधीलच होते, हे विसरता कामा नये. कडवे टिळकवादीही ब्राह्मणच आणि कडवे गांधीवादीही ब्राह्मणच. नंतरच्या काळात ब्राह्मणेतर काँग्रेसमध्ये गेले, हे खरे असले, तरी गांधीवादी म्हणून त्यांच्यातील कोणाची ओळख सांगता येईल, असा प्रश्न विचारला, तर उत्तर शोधताना बराच विचार करावा लागेल.
ब्राह्मणेतर पक्षातील मंडळी गांधींबरोबर नसली, तरी गांधी हे स्वतः ब्राह्मणेतरच असल्यामुळे आणि त्यांनी टिळकपक्षीय ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शह दिल्यामुळे त्यांना गांधींबद्दल कौतुकमिश्रित आदर होता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुजेक ब्राह्मणेतर हे स्वतः धर्माने हिंदु असले आणि त्यांच्यातील केशवराव ठाकरे यांच्यासारखी काही मंडळी हिंदुत्वाची अभिमानीही असली, तरी संघादि हिंदुत्ववादी संघटना या ब्राह्मणी असल्याचे त्यांचे मत होते. त्यांच्यातील काहींना तर क्षत्रियत्वाचा अभिमान होता. पुण्यात टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव ब्राह्मणी

संदर्भ प्रकार: