लोकमान्य ते महात्मा: Page 2 of 11

शाहू छत्रपतींनी विश्वामित्र व प्रतापसिंहाच्या पुढे पाऊल टाकून एक वेगळी सृष्टीच निर्माण केली. जीर्णमतवादी ब्राह्मण शंकराचार्य बदलायला तयार नाहीत. उच्चशिक्षित नवा शंकराचार्यही त्यांचाच कित्ता गिरवतो, तर हा घ्या आता क्षत्रियांचाच शंकराचार्य! मराठा क्षात्रजगद्गुरू. वेदोक्ताने सुरू झालेल्या नायट्याचा हा ‘कलशाध्याय’ होता. इतिहासाचार्य राजवाड्यांचे समाधान आता अर्थातच संपुष्टात आले असणार, हे उघड आहे. क्षत्रियाच्या वेदोक्ताला आता ब्राह्मणांची गरज उरली नव्हती!

***

स्वतः ‘प्रबोधन’कारांनीही या नव्या पीठाविरुद्ध लिहिले. काही मराठा पत्रकार ‘ठाकरे आपले नव्हेत,’ असे म्हणू लागले. प्रबोधनकार ठाक-यांनी खुद्द छत्रपतींनाही ऐकवले, ‘‘महाराज, हा नवीन क्षात्रपीठाचा उपद्व्याप अखेर ब्राह्मणेतरी संघटनेला भोवल्याशिवाय रहाणार नाही. तशातच आपण क्षात्र म्हणजे फक्त जातीय मराठे, हा खुलासा केल्यामुळे तर अफाट मराठेतर बहुजन समाजाच्या विश्वासाला आपण जबरदस्त धक्का दिलात. एकीकडे सत्यशोधक तत्त्वांची तळी उचलून धरायची आणि दुसरीकडे खास मराठा जातीयांसाठी क्षात्रगुरूंचे नवीन धर्मपीठ उभे करायचे, या भानगडीचा आदी अंत आपणच जाणे.’’
असा सडेतोड सवाल महाराजांपुढे टाकताच बराच वेळ ते विचारात मग्न राहिले. नंतर म्हणाले, ‘‘तू म्हणतोस, ती डेंजर्स आहेत खरी, पण मी त्यांचा पुरता बंदोबस्त करणार आहे.’’
त्यानंतर छत्रपती फार काळ जगले नाहीत व बंदोबस्त करायचा राहून गेला. ‘डेंजर्स’नी आपले स्वरूप दाखवायचे, ते मात्र दाखवलेच.

***

टिळक आज असते, तर त्यांनी कोणत्या मताचा स्वीकार केला असता, अशा नंतरच्या एका चर्चेत त्यांनी ‘टिळक फॅसिस्ट मताचा अंगिकार करते झाले असते.’ असे सुचवले व खळबळ माजवून दिली. ग. त्र्यं. माडखोलकर हे खरे तर केळकरांचे शिष्यच; पण तेही या विधानाने अस्वस्थ झाले व त्यांनी त्याचा जाहीर प्रतिवाद केला. त्यांचे स्वतःचे मत ‘टिळक साम्यवादी झाले असते’ असे होते.
‘प्रबोधन’कार केशवराव ठाकरे यांनी टिळकांच्या जीवनचरित्राचे दोन भाग केले आहेत. पहिला मंडालेपूर्व व दुसरा मंडालेउत्तर. मंडालेपूर्व टिळक हे सनातनी व स्थितिवादी होते, तर मंडालेउत्तर टिळकांचा सनातनीपणा व स्थितिवाद कमी होऊन ते बदलत्या परिस्थितीत अनुकूल प्रतिसाद द्यायला तयार झाले, असे ठाक-यांचे म्हणे आहे.
ठाक-यांचे हे मत बरोबर असेल किंवा नसेलही; परंतु विलायतेला जाण्यापूर्वीचे टिळक व विलायतेतून आल्यानंतरचे टिळक यांच्यात मात्र फरक करावाच लागतो. या फरकाच्या काही मुद्यांची नोंद डॉ. फडक्यांनी केलेली आहे.
टिळक बोल्शेव्हिकांची भलावण करू लागले. ‘मुंबई भांडवलवाल्यांची नसून
कष्टक-यांची आहे.’ असे ते २९ नोव्हेंबर १९१९ला परळच्या मैदानावर गिरणीकामगारांनी दिलेल्या मानपत्राचा स्वीकार करताना म्हणाले, ‘मार्च १९२० मधील अजमेर येथील राजकीय परिषदेत बोलताना ‘इंग्लंडप्रमाणे बोल्शेव्हिक अन्य देश जिंकून त्यांना गुलाम बनवीत नाहीत, अशी त्यांनी ग्वाही दिली. इतकेच नव्हे, तर ‘हिंदू आणि मुस्लिम धर्मांची मूलतत्त्वे बोल्शेव्हिकांच्या तत्त्वांसारखीच आहेत. बोल्शेव्हिकांची तत्त्वे अनादी असून त्यांचे गीतेच्या विचारांशी साम्य असल्याचे’ ही ते म्हणू लागले.
एके काळी ‘पोर्तुगीज मेसमनच्या हातचा चहा घेतला’ असे आगरकरांनी लिहिताच त्यांना न्यायालयात खेचायला निघालेले टिळक सिंधच्या दौ-यात सर्व जातींच्या लोकांबरोबर पंक्तीत बसून जेवू लागले. मुसलमानाने बनवलेला चहा मुसलमान स्वयंसेवकाने आणून दिला, तरी चारचौघात राजरोस पिऊ लागले. अशा नोंदी करीत ‘दुर्दैवाने त्यांच्या चरित्रकारांनी पुढे कधीही टिळकांच्या या बदलत्या भाषेची तसेच वागण्याचीही दखल घेतली नाही,’ असा शेरा फडके यांनी मारला आहे. अशी दखल न घेणे निरागस चूकभूल होती की त्यांच्या राजकारणाचा भाग होता, हे नक्की सांगता येणे कठीण आहे.
मंडालेहून परतलेले टिळक गणपतीच्या मिरवणुकीप्रमाणे मोहरमच्या मिरवणुकीतही अग्रभागी राहिले, याची नोंद चरित्रकार करोत किंवा न करोत, गुप्त पोलिसांनी केलेली आहे.

***

जगन्नाथ महाराज की बाळा महाराज, या दत्तकपुत्र प्रकरणामुळे उपस्थित झालेल्या टिळक-शाहू वादाचे पर्यवसान वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहूविरोधी भूमिका घेण्यात झाले. महाराष्ट्राच्या महाभारतात दत्तक पर्व आणि वेदोक्त पर्व फार महत्त्वाची आहेत. टिळकांनी शाहूविरोधी भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातल्या सनातन्यांना फार मोठे बळ मिळाले.
वस्तुतः शिवकालात प्राप्त करवून घेतलल्या वेदोक्ताचा हक्काची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न सातारा गादीचे छत्रपती

संदर्भ प्रकार: